Saturday, July 27, 2024
Homeलेखसानेगुरुजी परिचित - अपरिचित

सानेगुरुजी परिचित – अपरिचित

समारोप

सानेगुरुजी परिचित – अपरिचित या लेखमालेचा आजचा समारोपाचा अंतिम भाग लिहिताना, माझे मन समाधानाने आणि कृतज्ञतेच्या भावनेने भरून आले आहे. याचे श्रेय दोन व्यक्तींना जाते, एक स्वातंत्र्य सैनिक आणि साने गुरुजींचे विद्यार्थी असलेले माझे वडील दामोदर बळवंत उपाख्य मामासाहेब कुलकर्णी आणि दुसरे न्यूज स्टोरी टूडे या वेब पोर्टलचे संपादक मा. श्री देवेंद्र भुजबळ यांना.
स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या आमच्या पिढीला साने गुरुजींच्या दर्शनाचे भाग्य मिळाले नाही परंतु गुरुजींच्या संस्कारात वाढलेल्या माझ्या वडिलांच्या रूपाने नकळत त्यांच्याच विचारांचे बाळकडू मात्र नक्की मिळाले. भुजबळ सरांनी माझ्यावर अतिशय विश्वासाने ही लेख मालिका लिहिण्याची जबाबदारी टाकली. प्रथम या दोघांचे ऋण व्यक्त करते.

माझे वडील दीड वर्षाचे असतांना आईचे छत्र हरपले. त्यांच्या वडिलांची (म्हणजे माझ्या आजोबांची) सरकारी फिरतीची नोकरी म्हणून अमळनेरला प्रताप हायस्कूल मध्ये मुख्याध्यापक गोखले गुरुजींवर मुलाची जबाबदारी सोपवली. शाळेत प्रवेश तर मिळाला पण राहणार कुठे ? तेंव्हा छात्रालयात जागा नसल्याने जवळजवळ दीड ते दोन वर्षे माधुकरी मागून व वार लावून त्यांना जेवावे लागले. सुप्रसिद्ध भिडे वकिलांच्या बंगल्याच्या व्हरांड्यात रात्री झोपायची सोय झाली. बदल्यात वकील साहेबांच्या घरचे व कार्यालयांतील पडेल ते काम करावे लागे. नंतर छात्रालयात नादारीवर जागा मिळाली, आणि जेवणघरात वाढप्याचे कामही मिळाले.

वडिलांच्या आयुष्यातील सुवर्ण योग म्हणजे, छात्रालयात जी खोली मिळाली ती रेक्टरच्या खोली शेजारचीच आणि रेक्टर होते साक्षात “सानेगुरुजी” !

तो काळ स्वातंत्र्य लढ्याचा होता. लढ्याला बऱ्यापैकी वेग आला होता. जनसामान्यात वणवा पेटला होता. स्वातंत्र्याच्या कल्पनेने, देशप्रेमाने, राष्ट्रांभिमानाने पेटलेले शिक्षकगण विद्यार्थ्याना इंग्रजांविरुद्ध लहानसहान कुरापती करायला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहनच देत होते. प्रताप हायस्कुलच्या कौलारू इमारतीवर काही विद्यार्थ्यानी तिरंगा फडकावला. दुसऱ्या दिवशी सकाळी बातमी वाऱ्यासारखी पसरली. तिरंगा डौलाने शाळेच्या मुख्य इमारतीवर फडकत होता. स्वातंत्र्यप्रेमी तिरंग्याला सलाम करायला लोक शाळेबाहेर जमू लागले. इंग्रज सार्जंट आले, चौकशी सुरु झाली. कोणी तिरंगा शाळेवर लावला? मुख्याध्यापकांपासून सर्वांनीच अनभिज्ञता दर्शवली. इंग्रजांचा जळफळाट झाला. एका पोलिसाने तिरंगा खाली उतरवला. सार्जंट थयथयाट करत आला तसाच परत गेला. विद्यार्थ्यांमध्ये कुजबुज सुरु झाली ! सर्वांनाच ठाऊक होते की तिरंगा फडकावण्याचे काम अत्यंत चपळ आणि खिलाडूवृत्तीच्या दामूचेच ! परंतु कोणी चुगली केली नाही. असा राष्ट्राभिमानी आणि तिरंग्यासाठी जीवावर उदार झालेला साने गुरुजींचा “दामू” !
दामोदर – नादारीवर शिकणारा गरीब मुलगा, बुद्धिमान, एकपाठी, खिलाडूवृत्ती या गुणांमुळे शिक्षक वर्गात आवडता विद्यार्थी, साने गुरुजींचा विशेष लाडका ! प्रेमाने गुरुजी त्याला “दामू” म्हणत.

गुरुजींनी दामूवर आईच्या मायेची पाखर घातली. त्याच्यावर शिस्तीचे संस्कार केले. देशभक्तीचे बाळकडू पाजले. वय वर्ष १२ ते १५ अशा अत्यंत संस्कारक्षम वयात प्रत्यक्ष साने गुरुजींचा निकट सहवास आणि त्यांनी केलेले अनमोल संस्कार यामुळे दामूचे आयुष्य घडले. साने गुरुजींनी आदर्शवाद त्याच्यात ठासून भरला.

१९३४ साली मॅट्रिक झाल्यानंतर शिक्षणाबरोबर दामोदरने शाळा आणि महाविद्यालयात नोकरी केली, केवळ स्वातंत्र्य लढ्याला मदत करण्याच्या उद्देशाने ! पगाराचे २५ रुपये मिळत, दोन रुपये खाणावळीसाठी ठेऊन उरलेले २३ रुपये तुरुंगात असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून त्यांच्या घरी जाऊन दिली जात असे.

असा हा आदर्शवादी उपक्रम १९३४ ते १९३९ अशी ६ वर्षे सातत्याने राबवला, नंतर विवाहामुळे कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्या. १९४२ ते १९४७ दरम्यान सानेगुरुजी ब्रिटिश सरकारच्या ससेमिऱ्या पासून वाचण्यासाठी भूमिगत झाले, आणि वेशांतर करून वणवण करीत असत, अशा कठीण काळात दामोदर आणि पत्नी राधाबाई दोघांनीं धोका पत्करून साने गुरुजींची जबाबदारी घेतली. आपल्या घरात गुरुजींना आश्रय दिला. प्रसंगी त्यांना रात्री अपरात्री पलंगाखाली शिताफीने लपवले. त्यांची सर्वतोपरी काळजी घेतली. त्या मंतरलेल्या काळातील आईवडिलांनी सांगितलेल्या अनंत आठवणी आजही माझ्या मनांत रुंजी घालतात, आणि त्यांचं स्वातंत्र्य प्रेम व देशभक्ती आठवून धन्य वाटतं !

माझे वडील

वयाच्या १२ व्या वर्षी मिळालेली साने गुरुजींची अनमोल साथ वडिलांनी शेवटच्या क्षणापर्यंत सोडली नाही. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे दार अस्पृशांना खुले करण्यासाठी केलेल्या उपोषणाचा प्रसंग असो की कामगारांसाठीचा लढा असो, अगदी “साधना” प्रकाशनाच्या स्थापने पर्यंत गुरुजींच्या प्रत्येक कार्यात वडील अग्रभागी असत.

स्वातंत्र्य लढ्यादरम्यान सानेगुरुजी स्वातंत्र्याच्या प्रचारासाठी व द्रव्य संकलनासाठी गोवोगांव – घरोघर पायाला भिंगरी लागल्यासारखे फिरत. वडील नेहमी गुरुजींबरोबर सावलीसारखे असत. असेच एका घरात गेले असता घरातील गृहिणीने बाहेर येऊन सांगितले “माणसे घरात नाहीत“ गुरुजी पुढे होऊन म्हणाले, “कां ? आपण माणूस नाही कां ?” हे ऐकून ती गृहिणी अवाक झाली. बरोबर असलेल्या आपल्या विद्यार्थ्यांना गुरुजी म्हणाले, “स्त्रियांना माणूस म्हणून वागवायला जो समाज तयार नाही त्या समाजाचे मी करू तरी काय ? आणि स्वतःला माणूसही न मानणाऱ्या या स्त्रियांच्या मानसिकतेचे सुद्धा काय करायचे ? आपण सारे समान आहोत. उच्च-नीच भेदभाव असू नये, स्त्रियांनाही समाजात सन्मानाने वागवले पाहिजे” ही तळमळ गुरुजींच्या ठायी होती.

अशीच आणिक एक घटना एका मध्यमवर्गीय घरातील. साने गुरुजींना जाणवलं की त्या घरांत वातावरण चिंताग्रस्त व दु:खी आहे. गुरुजींनी आस्थेने विचारले “काय घडले आहे ? की आपण सारे चिंतातूर आहात ? चेहरा हा मनाचा आरसा असतो. आपले चेहरेच सांगताहेत की काहीतरी समस्या तुम्हाला पोखरत आहे !” गुरुजींच्या प्रेमळ विचारपूस करण्याने कुटुंब प्रमुखाला धीर आला. त्यांनी सांगितले की त्यांची मुलगी दिसायला कुरूप असल्याने तिचे लग्न जमत नाही, म्हणून सर्वजण चिंतेत आहेत. हे ऐकून गुरुजींना फार वाईट वाटले. कोणाचेही दु:ख दूर करायला प्राण पणाला लावणारे गुरुजी, त्यांनी मुक्कामी अमळनेरला परतल्यावर त्या कुरूप मुलीच्या वडिलांना पत्र लिहिले, “ मी तुमच्या मुलीशी लग्न करण्यास तयार आहे “ हे समजल्यावर सर्वाना आश्चर्य वाटले. साने गुरुजींनी लग्न करावे म्हणून थोरले बंधू गजानन दादा तसेच बडोद्याच्या मावशीने केलेल्या कळकळीच्या विनवण्यांना ठामपणे नकार देणारे, न जुमानणारे गुरुजी अचानक लग्नाचा विचार करायला लागले, हे काय गौडबंगाल ? गुरुजींना कारण विचारताच ते म्हणाले “ नाही रे नाही, मला अशी एखाद्या मुलीची झालेली अवहेलना बघवत नाही ! तिचे कसे होईल ? तिच्या कुटुंबाचे कसे होईल ? तिला कोण सांभाळेल ? समाज काय म्हणेल ? “ गुरुजी समाजाविषयी बोलू लागले, “ हा समाज एखाद्याला घोड्यावर बसूही देत नाही आणि पायी चालूही देत नाही. गुरुजींना सतत समाजाची चिंता लागलेली असायची. मुलीच्या वडिलांचे गुरुजींना पत्र आले त्यात ते म्हणतात “गुरुजी, माझ्या मुलीचा हात मी आपल्या हातात देऊ शकत नाही, हे लग्न होऊ शकत नाही. कारण तुमचा एक पाय तुरुंगात आणि एक पाय बाहेर, या परिस्थितीत मुलीच्या पोटापाण्याची सोय काय ?”

८० वर्षांपूर्वी लग्नासंदर्भात तरूण मुलींच्या बाबत जे प्रश्न होते ते आजही तसेच आहेत. “मुलीचे लग्न झालेच पाहिजे” हा हट्ट काही समाज सोडायला तयार नाही. आणि तथाकथित समाज महिलांच्या बाबतीतच कां एवढा चौकस बनतो ? तसेच लग्नासाठी सौंदर्याची अट कां ? मुलीच्या असण्यापेक्षा दिसण्याला समाज इतके महत्व कां देतो ? बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरमनाचे सौंदर्य कोणाला कसे दिसत नाही ? अशा प्रश्नांनी सानेगुरुजी व्यथित झाले. इतके कोमल हृदयी होते सानेगुरुजी.

जी व्यक्ती गुरुजींच्या संपर्कात येई त्या व्यक्तीचेच नाही तर संपूर्ण कुटुंबाचे जीवन या विचारधनाच्या प्रकाशाने उजळून जाई.
“३० जानेवारी १९४८ भारताच्या इतिहासातील काळा दिवस “ असे वर्णन गुरुजींनी महात्मा गांधींची हत्या झाली तेंव्हा केले होते. गुरुजी अस्वस्थ झाले. त्यांनी अन्नत्याग केला. आपली मुल्ये आपल्याच डोळ्यांदेखत उधळली जात आहेत हे त्यांना सहन झाले नाही. ते म्हणत “ दामू, अरे या जगण्यात काही अर्थ नाही, आपण समाजात सकारात्मक बदल घडवून आणू शकत नाही. “आपल्या प्राणांची ज्योत गुरुजींनी आपल्याच हातांनी ११ जून १९५० रोजी मालवली. पिंजऱ्यात कोंडलेल्या पक्षाचे हाल पाहवत नाहीत म्हणून त्यांनी आपल्याच हाताने पिंजऱ्याचे दार उघडून प्राण-पाखरू अनंतात भिरकावून दिले.

शरीर रूपाने जरी गुरुजी आपल्यातून गेले असले तरी त्यांचे कार्य, विचार, साहित्य या रूपाने ते अजरामर आहेत. गुरुजींना माझे विनम्र अभिवादन.
समाप्त.

आशा कुलकर्णी

— लेखन : आशा कुलकर्ण. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. सर्व भाग वाचले. धन्यवाद,
    कालच सातवीच्या विद्यार्थ्यास मराठीच्या पाठ्यपुस्तकातील ‘बंधूप्रेम’ धडा शिकवायला सुरवात केली. त्याची मातृभाषा हिंदी आहे. खूप मनलावून ऐकतो साने गूरुजींबद्दल…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८