Saturday, July 27, 2024
Homeलेखसानेगुरुजी : परिचित-अपरिचित

सानेगुरुजी : परिचित-अपरिचित

भाग पहिला

२४ डिसेंबर २०२४ पासून साने गुरुजींच्या शतकोत्तर रजत जयंती वर्षाला सुरुवात झाली.त्यानिमित्ताने ही विशेष लेख माला.
सानेगुरुजींना विनम्र अभिवादन.
– संपादक

साने गुरुजी म्हणजे २४ डिसेंबर १८९९ ते ११ जून १९५० असं अवघं पन्नास वर्षाचं आयुष्य लाभलेला आधुनिक संत, मानवतेचा पुजारी ! स्वतःच्या अनमोल साहित्य संपदेतून पाऊणशे वर्षानंतरही मराठी मनामनात – घराघरात गारुड घालून आहे. केवळ अर्धशतकांत एक आदर्श शिक्षक, तळमळीचा कार्यकर्ता, प्रभावी लेखक, संवेदनशील कवी, फर्डा वक्ता, खंबीर स्वतंत्रता सेनानी, माणूसधर्माचा उदगाता, अशी साने गुरुजींची विविधांगी ओळख जनमानसात आजही ठसली आहे.

साने गुरुजींच्या आयुष्याचा उत्तरार्ध म्हणजे वादळी झंझावात होता. सव्वाशेहून अधिक पुस्तकांचे लेखक, छात्रालय दैनिक, विद्यार्थी, कॉंग्रेस, कर्तव्य, साधना या नियतकालिकांचे संस्थापक-संपादक, शेतकरी व कामगार वर्गासाठी लढे, स्वतंत्रता सेनानी म्हणून अनेक वर्ष तुरुंगवास, “चले जाव” चळवळीत सक्रीय राहून भूमिगत होऊन ब्रिटीश सत्तेविरुद्ध रान उठवणे, स्वातंत्र्य दाराशी आलेले असतांना पंढरपुरचे विठ्ठल मंदिर अस्पृशांसाठी खुले व्हावे म्हणून लढा व प्राणांतिक उपोषण आणि असे बरेच काही !

पण या वादळी झंझावाताची मुळे रुजली ती त्यांच्या आयुष्याच्या पूर्वार्धात. कसा होता हा पूर्वार्ध ? सानेगुरुजी न्यू पूना कॉलेज मधून एम.ए. झाल्यावर तत्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी अमळनेरला आले, आणि खानदेश हीच त्यांची कर्मभूमी झाली. वयाच्या २३ व्या वर्षी अमळनेरच्या प्रताप हाईस्कूल मध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले, पुढे जवळपास सात वर्षे शिक्षकी पेशात आणि शाळेतील मुलांमध्ये ते रमले. परंतु राष्ट्रप्रेम आणि भारतमातेची स्वातंत्र्यासाठी हाक त्यांना अस्वस्थ करी, आणि वयाच्या तिशीत स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी उडी घेतली.

सानेगुरुजींचं बालपण आपल्याला “श्यामची आई” या पुस्तकात वाचायला मिळते, परंतु त्यांनी आत्मचरित्रात्मक आणखी तीन कादंबऱ्या लिहिल्या त्यातून त्यांचं तरुणपण कसं व कुठे गेलं ते आपल्याला वाचायला मिळते. श्याम, धडपडणारा श्याम, आणि श्यामचा जीवनविकास या त्या तीन कादंबऱ्या, १९३६ ते १९३८ या काळात तुरुंगात असतांना लिहिल्या. त्यातील श्यामचा जीवनविकास या पुस्तकाचे हस्तलिखित इंग्रज सरकारने जप्त केले होते. या तीनही पुस्तकांतून साने गुरुजींचे बाल, कुमार आणि युवा या तिन्ही काळातील त्यांची जडणघडण, कौटुंबिक जीवन, भावजीवन, विद्यार्थी जीवन, सखे-सोबती, वैचारिक भरण पोषण तसेच तत्कालीन सामाजिक- सांस्कृतिक-राजकीय परिस्थिती व संस्कृती याचेही दर्शन घडते.

सानेगुरुजी एक उत्तम आणि यशस्वी कथा लेखक होते. गोष्ट म्हणजे मनोरंजन. लहान मुलाना गोष्टी ऐकायला फार आवडतात, आणि साने गुरुजींना लहान मुल प्रिय, त्यांचं एक वाक्य फार प्रसिद्ध आहे “ करे मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे “साने गुरुजींनी अनेक अनंत गोष्टी, लघुकथा, दीर्घकथा, कादंबऱ्या लिहिल्या. त्यांना मुलाना गोष्टी सांगायला फार आवडत. त्यांच्या साहित्यात “साने गुरुजींच्या गोड गोष्टी“ खूप लोकप्रिय झाल्या. या गोष्टी त्यांनी १९४० साली तुरुंगवासात असतांना व काही शाळेत शिकवत असतांना लिहिल्या आहेत. या त्यांच्या अनमोल लेखनाचे दहा भाग – दहा पुस्तक रुपात प्रसिद्ध झाले. गिरगावातील प्रसिद्ध प्रकाशक केशव भिकाजी ढवळे यांनी या साहित्याची प्रथम आवृत्ती १९४१ साली प्रकाशित केली. त्या काळातही प्रथम आवृत्ती लवकरच संपली आणि त्या नंतर या दाही पुस्तकांच्या एकदोन नाही तर तब्बल सव्वीस (२६) आवृत्त्या आणि अडतिस (३८) पुनर्मुद्रणे प्रकाशित झाली. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात या साहित्याच्या हजारोंनी प्रती लाखो लोकांपर्यंत पोचल्या आणि कोट्यावधी लोकांनी हे साहित्य वाचले, त्याची पारायणे झाली, मौखिक पद्धतीने त्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मनोरंजनाचे प्रभावी माध्यम म्हणून पोचल्याही.

या पुस्तकांतील सर्वच गोष्टी साने गुरुजींच्या स्वतःच्या नाहीत, तर त्यातील काही त्यांनी त्या भारतातील आणि विदेशातील साहित्यातून वाचलेल्या काही लोककथा हजारो मुलांना घरीदारी, शाळेत, शिबिरात सांगितल्या आहेत. त्या ऐकताना मुले अगदी मंत्रमुग्ध होऊन ऐकत. गुरुजी म्हणत “ गोष्टी म्हणजे खाऊ, हा खाऊ दिला म्हणजे मुले प्रसन्न होतात.”
त्या गोष्टी त्यांनी जशा सांगितल्या तशा लिहून काढल्या.

साने गुरुजीना अनेक भाषा अवगत होत्या. त्यात त्यांच्या मातृभाषे व्यतिरिक्त हिंदी, गुजराथी, बंगाली, तामिळ या भारतीय भाषा तर इंग्रजी, फ्रेंच, रशियन या परदेशी भाषांवर त्यांचे इतके प्रभूत्व होते की अनेक वर्षांच्या कारावासात त्यांनी या भाषांचा अभ्यास केला आणि या भाषांतील असंख्य पुस्तके वाचली. त्यातील वाचलेल्या गोष्टी – कथा – कादंबऱ्या साने गुरुजींनी स्वतःच्या शब्दात लिहिल्या आहेत. या गोष्टींतील अनेक त्यांच्या स्वतःच्याही आहेत. या विषयी सानेगुरुजी म्हणतात “ गोष्टी जरी मी माझ्या भाषेत, मधून मधून नवीन कल्पना, विचार घालून मांडल्या असल्या तरी या गोष्टींचे सारे श्रेय माझे नाही. ते श्रेय मुळ लेखकाचे आहे. वाचकांना या लेखनात गोडी आढळेल ती मुळच्या लेखकाची आहे. निरसता आढळेल ती माझी आहे. मी आपला “फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तव हमाल भार वाही” या संत श्री तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे मी हमाल आहे. माल वाटीत आहे. हा माल सर्वांनी गोड मानून घ्यावा ही प्रभू चरणी प्रार्थना ! “

मला त्या गोड गोष्टींतील काही खूपच भावल्या जसे “ एकाकी मनू “ ही गोष्ट जॉर्ज इलियट या टोपण नांवाने मेरी अन ईव्हान्स या इंग्रजी लेखिकेने लिहिलेल्या कादंबरीतून घेतली आहे. या लेखिकेने अनेक अजरामर कादंबऱ्या लिहिल्या आहेत. तिचे मूळ नांव जवळजवळ लुप्त होऊन ती जॉर्ज इलियट या नावानेच प्रसिद्ध आहे. तिने लिहिलेली “ सिलास मार्नर “ ही कादंबरी साने गुरुजींनी तुरुंगात असतांना जी पाश्चिमात्य पुस्तके वाचली त्यातील एक ! तुरुंगातील सत्याग्रही तरुणांना गुरुजी तुरुंगातील कामे करतांना श्रमांची फुले व्हावीत, म्हणून सांगत त्या कथांपैकी एक आहे. तशीच दुसरी गोष्ट म्हणजे “ ज्याचा भाव त्याचा देव “ ही मूळ कथा स्वामी विवेकानंदांनी बंगाली भाषेत लिहिली आहे आणि त्या कथेचा इंग्रजी भाषेतील अनुवाद भगिनी निवेदिता यांनी केला.

साने गुरुजींचे बंगाली आणि इंग्रजी दोन्ही भाषांवर प्रभुत्व होते. गुरुजींनी ही कथा मराठीत लिहिली, अर्थात हा अनुवाद किंवा भाषांतर नाही तर त्यांनी त्यांच्या विशिष्ठ शैलीत सजवून मांडली आहे. आणिक एक गोड गोष्ट “ घामाची फुले “ या गोष्टीची कल्पना गुरुजींना रामायणातील शबरीच्या आश्रमातील घटनांवरून सुचली, या गोष्टीमध्ये विद्यार्थ्यांना गुरुजी विचारतात सर्वात पवित्र पाणी कोणते, कोणी म्हणत गंगेचं पाणी, तर कोणी म्हणत पश्चात्तापाने डोळ्यातून वाहणारे पाणी. गुरुजी श्रमांचं महत्व समजावून सांगत घामाचं पाणी सर्वात पवित्र, हे मुलांना एका गोष्टीतून पटवून देतात. ती गोष्ट अतिशय बोधप्रद आहे.

साने गुरुजींनी स्वतः महाराष्ट्रातील हजारो मुलांना गोष्टी सांगून त्यांचे मनोरंजन केले. त्यांच्या स्मरणार्थ “सानेगुरुजी कथामाला” सुरु करण्यात आली, कथामालेचे मासिकही दर महिन्यात प्रकाशित होते. सानेगुरुजींच्या चाहत्यांना वाचनीय आणि माहितीपूर्ण लेख वाचायला मिळतात.
क्रमशः

आशा कुलकर्णी

— लेखन : आशा कुलकर्णी. विलेपार्ले, मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८