९७ वें अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अंमळनेर येथील प्रताप विद्यालयात काल पासून सुरू झाले आहे. पूज्य साने गुरुजींनी प्रत्यक्ष ज्या शाळेत शिकविले, त्या शाळेची ओळख करून घेणे आपल्याला निश्चितच आवडेल.
रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड येथे २४ डिसेंबर १८९९ रोजी साने गुरुजींचा जन्म झाला. त्यांच्या लेखणीचा प्रभाव आजही कायम आहे.
साने गुरुजींनी लिहिलेले “श्यामची आई” हे अजरामर पुस्तक शाळेत असताना मी वाचलं होतं. त्यानंतर ते कितीदा वाचलं, याची गणतीच नाही. तेव्हापासून “श्यामची आई” आणि या पुस्तकाचे लेखक पूज्य साने गुरुजी यांनी माझ्या मनात कायमचं घर केलं.
साने गुरुजी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील प्रताप हायस्कूल मध्ये काही वर्षे शिक्षक होते, तिथे शिकवत असतानाच त्यांनी आपल्या देशाच्या, भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली होती, हे वाचून माहिती होतं, त्यामुळे या शाळेला भेट देण्याची माझी फार वर्षांपासून इच्छा होती. ती काही काळापूर्वी फलद्रुप झाल्याचा मला विलक्षण आनंद आहे.
या शतकोत्तर शाळेचा इतिहास अत्यन्त दैदिप्यमान आहे. पारतंत्र्यात असलेल्या आपल्या देशातील तरूणांमध्ये स्वातंत्र्यप्रियता, निर्भयता, निर्माण व्हावी, त्यांना राष्ट्रीय शिक्षण मिळावे म्हणून विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर या तिघांनी आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी पुणे येथे १८८४ साली डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या पावलावर पाऊल टाकत खांदेशातील पहिलीच असलेली, खांदेश एज्युकेशन सोसायटी अमळनेर येथे स्थापन करण्यात आली. कै.अण्णासाहेब म्हसकर, बाळूकाका भागवत, भिडे वकील यांच्या सहकार्याने १७ जुलै १९०८ रोजी माळ्याच्या मढीत शाळा सुरू झाली.
पूर्व आणि पश्चिम खांदेशच्या मध्यावर अमळनेर असल्याने दोन्ही बाजूचे विद्यार्थी शाळेत दाखल होऊ लागले. त्याच सुमारास राष्ट्रीय विचारांनी भारलेले वासुदेव महादेव भावे गुरुजी नोकरीच्या शोधात धुळे येथे आले होते. तेथे अमळनेर येथील द. वा. ब्रह्मे यांच्याशी त्यांची भेट झाली. अमळनेरला शिक्षणाची फारशी सोय नाही, तिथे तुम्ही याल का ? अशी विचारणा ब्रह्मे यांनी भावे गुरुजींना केली. भावे गुरुजींनी होकार दिला आणि ते अमळनेरला आले.
पुढे ज. ग. गुणे, जांभेकर, नवाथे, ह. कृ.मोहनी, साने गुरुजी, वाड, जठार आदी ध्येयवादी शिक्षकांची मांदियाळी शाळेस लाभली. श्रीमंत प्रताप शेठ यांचा वरदहस्त लाभल्याने शाळेच्या स्वतंत्र इमारती उभ्या राहिल्या.
पांडूरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी १९२४ साली या शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. ते मराठी आणि इतिहास विषय शिकवत. ते शाळेच्या छात्रालयातच रहात. अल्पावधीतच ते विद्यार्थी प्रिय झाले. उनाड, बेशिस्त विद्यार्थ्यांना शिक्षा करण्याची त्यांची अनोखी पध्दत असे. ती म्हणजे त्या विद्यार्थ्यांना शिक्षा न करता ते स्वतःलाच शिक्षा करून घेत.
साने गुरुजींच्या वर्गात एक उनाड, श्रीमंत विद्यार्थी होता. तो वर्गात सर्वांना त्रास देत असे, इतरांवर थुंकत असे. गुरुजींनी त्याला प्रेमाने नीट वागण्याविषयी अनेकदा सांगितले. तरीही तो ऐकेना. मग एके दिवशी गुरुजींनी वर्गाच्या माँनिटरला शाळेच्या कार्यालयातुन छडी आणण्यास सांगितले. हे पाहुन विद्यार्थ्यांना खूप आश्चर्य वाटलं. कारण कुणालाही शिक्षा करणं हे गुरुजींच्या स्वभावात नव्हतं.
छडी आणण्यात आली. गुरुजी आता त्या विद्यार्थ्यास बेदम मारतील म्हणून सर्व विद्यार्थी बघू लागले, तर काय आश्चर्य ! त्या विद्यार्थ्यास छडी मारण्याऐवजी गुरुजी आपल्याच हातावर सपासप छड्या मारू लागले. हे पाहून तो उनाड विद्यार्थी रडू लागला. त्याने गुरुजींचे पाय धरले, क्षमा मागितली आणि पुढे कधीच चुकीचे न वागण्याचे वचन दिले.
छात्रालयात एकदा बोलण्याच्या ओघात एका विद्यार्थ्यांने गुरुजींना अमुक एक विद्यार्थी सिगारेट ओढतो असे सांगितले. हे ऐकून गुरुजी अतिशय खिन्न झाले. त्यानंतर गुरुजी दोन दिवस गप्पगप्पच होते. गुरुजी त्यावेळी स्वतः पहाटे चार ते पाच या वेळेत विद्यार्थ्यांसाठी हस्तलिखित वार्तापत्र तयार करून ते वार्ताफलकावर लावत. तीन दिवसांनंतरच्या हस्तलिखितात त्या विद्यार्थ्यांच्या व्यसनाबद्दल दुःख व्यक्त करून, माझा विद्यार्थी व्यसनी झाला, हा माझा अपराध आहे, म्हणून मला कोणी तरी शिक्षा करा रे ! असे आर्त शब्द त्यांनी लिहिले. याचा व्हायचा तोच योग्य परिणाम झाला. त्या व्यसनी विद्यार्थ्यांने गुरुजींची माफी मागितली आणि तो व्यसनापासून दूर झाला. भारतीय संस्कृतीतील आत्मक्लेश या उच्च तत्वाचे गुरुजी विद्यार्थ्यांना असे दर्शन घडवत.
साने गुरुजींचे शाळेतील आणि छात्रालयातील विद्यार्थ्यांवर बारीक लक्ष असे. विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धा जोपासु नये म्हणून ते दक्ष असत. छात्रालयातील काही विद्यार्थी अंध श्रद्धाळू आहेत, हे त्यांना कळाले. परीक्षेत चांगले गुण मिळावे म्हणून हे विद्यार्थी दर शनिवारी एका मंदिरात जात असत. एकदा या विद्यार्थ्यांना त्यांनी वाटेत अडवून सांगितले, अरे, देवाला साकडे घातल्याने देव प्रसन्न तर होत नाहीच उलट आपण आपला मौल्यवान वेळ व्यर्थ घालवतो. आपण आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडल्यास देवाचे आशीर्वाद मिळतील असे सांगून तो वेळ अभ्यासात घालवावा, असे त्यांना समजावून सांगितले.
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्याच्या महात्मा गांधी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत साने गुरुजींनी २९ एप्रिल १९३० रोजी शाळा सोडली. ते पूर्णपणे स्वातंत्र्य लढ्यात उतरले. छात्रालयातील ज्या खोलीत गुरुजी रहात तिथे संस्थेने साने गुरुजी स्मृतीकक्ष उभारला आहे. या कक्षात त्यांची दैनंदिनी, अन्य साहित्य, त्यांचं जीवन दर्शन घडविणारं सुंदर प्रदर्शन आहे.
या शाळेचा १० जुलै १९३४ रोजी रौप्य महोत्सव झाला. तर २१ मार्च १९५९ रोजी सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला. शाळेच्या १९८३ मध्ये झालेल्या अमृत महोत्सवाला तत्कालीन मंत्री सुधाकरराव नाईक, मुळचे अमळनेर येथील विप्रो कम्पनीचे उद्योगपती अझीम प्रेमजी उपस्थित होते. अझीम प्रेमजी यांनी उदारपणे दिलेल्या देणगीतून शाळेत तांत्रिक कक्ष निर्माण झाला. १९९५ च्या सुमारास शाळेत संगणक शिक्षण सुरू झाले. १७ ऑगस्ट २००८ रोजी संस्थेचा शतक महोत्सव खूप उत्साहात साजरा झाला. आज ही येथील शिक्षक अत्यन्त तळमळीने विद्यार्थी घडविण्याची येथील गौरवशाली परंपरा मनोभावे पार पाडत आहेत.
साने गुरुजींना विनम्र अभिवादन.
— लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.
साने गुरुजिंच्या शाळे बद्दल, शिस्तीबद्दल अतिशय छान माहिती मिळाली
साने गुरुजींच्या शाळेची अप्रतिम माहिती! अमळनेरला जाऊन गुरुजींची ती खोली बघण्याची उत्सुकता आहे.
या शाळेची ओळख शमची आई मध्ये झाली होती.
साने गुरुजींची शाळा वाचनीय व संग्रह ठेवावा असा सरजी
गोविंद पाटील सर जळगाव.