भाग – ३ : विद्यार्थीप्रिय शिक्षक
१९२४ ते १९३० या काळात अमळनेरच्या प्रताप हायस्कुल मधील सर्वच विद्यार्थ्यांचे शालेय जीवन समृद्ध झाले, कारण याच काळात सानेगुरुजी येथे शिक्षक आणि छात्रालायाचे रेक्टर म्हणून कार्यरत होते.
तो काळ स्वातंत्र्य लढ्याचा होता. खानदेश एज्युकेशन सोसायटी च्या या शाळेचे नांव सुरुवातीला म्हणजेच १९०८ मध्ये “विद्यामंदिर” असे होते. नंतर काही काळ “प्रताप विद्यालय” म्हणून ही शाळा ओळखली जाई व पुढे “प्रताप हायस्कूल” असे शाळेचे नामकरण झाले.
पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी प्रताप हायस्कुल मध्ये रुजू झाले तेंव्हा उच्चशिक्षित, बुद्धिमान आणि जाज्वल्य देशभक्तीची मूर्ती असलेले जगन्नाथ गोपाळ गोखले प्रताप हायस्कुलचे मुख्याध्यापक होते. आई.सी.एस. च्या उच्च शिक्षणासाठी लंडनला गोखले सरांना पाठवण्याचे ब्रिटीश सरकारने ठरवले होते, परंतु सरकारचे हे निमंत्रण विनम्रपणे नाकारून गोखले सरांनी आपल्या देशबांधवांची सेवा करण्याचे व्रत घेऊन शिक्षण क्षेत्र निवडले. सानेगुरुजी त्यांच्याच तालमीत तयार झाले, सानेगुरुजी म्हणत, “अमळनेरचे आणि प्रताप हायस्कूल चे भाग्य थोर की गोखले सरांनी देशसेवेसाठी प्रताप हायस्कूलची निवड केली.”
शाळेत गुरुजींना “साने मास्तर किंवा साने सर“ म्हणून संबोधित. पुढे स्वातंत्र्य लढ्या दरम्यान १९३२ साली धुळ्याच्या तुरुंगात असताना साने सरांचे “साने गुरुजी“ झाले त्याचीही कहाणी वेगळी आहे. सानेगुरुजी शाळेत इतिहास आणि मराठी असे दोन विषय शिकवीत. छात्रालायाचे रेक्टर म्हणून त्यांना “छात्रानंद” म्हणत. छात्रालायातील मुलांवर गुरुजींनी समाजसेवेचे, देशभक्तीचे, माणुसकीचे संस्कार केले. पालकांपासून घरापासून दूर राहणाऱ्या आणि काही आईविना वाढलेल्या मुलाना गुरुजींनी आईची माया तर दिलीच परंतु शिस्तही लावली. हा गुरुजींचा नैसर्गिक स्वभावच होता. आणि गरीब गरजू मुलांची फी आपल्या पगारातून गुरुजी भरत असत. मुले म्हणजे देवाघरची फुले, देशाचे भविष्य ही भावना असल्याने सानेगुरुजी मातृहृदयी शिक्षक म्हणून विद्यार्थी प्रिय होते.
छात्रालायाची बैठी इमारत शाळेपासून काहीशी लांब बाजूला पडली होती. शाळा आणि छात्रालय यामध्ये मोठे मैदान होते. या मैदानावर फुटबॉल, हॉलीबॉलचे आंतर स्कूल व राज्यस्तरीय सामने होत असत. छात्रालायाची बैठी इमारत त्यामुळे वेगळी वाटे, म्हणून आणि आजूबाजूचा परिसर अतिशय रुक्ष आणि काट्या कुट्यानी भरलेला असल्याने छात्रालायाला
“अंदमान” असे नांव पडले होते.
गुरुजी छात्रानंद झाल्यावर या जागेत आमूलाग्र बदल झाला. मुलांच्या मदतीने साने गुरुजींनी परिसरात फुलबाग फुलवली आणि अंदमान चे “आनंदभुवन” झाले. छात्रालायातील वातावरण अगदी खेळीमेळीचे होते. “छात्रानंद” मुलांबरोबर मनमोकळ्या गप्पा मारत. मधाच्या पोळ्याभोवती मधमाशा जश्या घोंघावतात अगदी तसेच छात्रालायातील विद्यार्थी साने गुरुजींच्या अवतीभोवती घुटमळत असत. छात्रालय म्हणजे एक कुटुंबच होत जणू आणि कुटुंब प्रमुख होते सानेगुरुजी !
साने गुरुजींनी विद्यार्थ्यांना सेवा धर्माची शिकवण दिली, सेवा धर्माचे महत्व समजावले, आणि तेही स्वतःच्या कृतीतून. अमळनेरच्या प्रताप हायस्कुलच्या छात्रालयात गोपाळ नावाचा एक गडी होता. अनाथ होता बिचारा ! आई-वडील, बहिण-भाऊ कोणी नव्हतं त्याला, शाळेच्या आवारात कोपऱ्यात एका लहानश्या झोपडीत तो राही आणि संस्थेचे पडेल ते काम करी. एकदा गोपाळ आजारी पडला. दिवसभरात तो परिसरात दिसला नाही म्हणून साने गुरुजींनी विचारलं, “अरे दामू, तू गोपाळला कुठे पाहिलेस का ? मला आज दिवसभरात दिसला नाही.” दामू म्हणाला, “सर, गोपाळ आजारी आहे, तो त्याच्या झोपडीत झोपला आहे.” गुरुजी ताबडतोब गोपाळला भेटायला गेले. गोपाळला खूपच ताप भरला होता. गुरुजींनी लगेच प्राथमिक उपचार सुरु केले.
गोपाळला ते छात्रालयात आपल्या खोलीत घेऊन आले. डॉ. म्हस्करांचे औषध सुरु केले. ताप उतरेना, गुरुजी रात्र रात्र गोपाळच्या उशाशी बसून असत. निदान झाले, गोपाळला विषमज्वर झाला होता. या मुदतीच्या तापात रुग्णाची फार सेवा करावी लागते. त्याचे मलमूत्र काढून साफ करावे लागते. कारण कधी कधी त्याची शुद्धही हरपते. त्याचा स्वतःवर ताबा रहात नाही. साने गुरुजींनी गोपाळची सगळी सेवा केली. कारण गुरुजींचा शब्दापेक्षा कृतीवर भर असे. परंतु दुर्दैवाने गुरुजींना यश आले नाही. या विषमज्वराच्या आजारात गोपाळचा मृत्यू झाला. सर्वांना खूप वाईट वाटले. रडू आवरेना. अनाथ गोपाळची अंत्ययात्रा निघाली. सर्व शिक्षक आणि विद्यार्थी सामील झाले. गुरुजींनी पार्थिवाला आधी खांदा दिला आणि नंतर मडके धरले. एका गरीब अशिक्षित मजुराचे अंत्यसंस्कार एका उच्चशिक्षित साहित्यिकाने केले. साने गुरुजींनीच गोपाळला अग्नी दिला. नंतर सुतकही पाळले, म्हणाले “गोपाळ माझा धाकटा भाऊच होता“ या प्रसंगातून साने गुरुजींनी सेवाधर्माची आणि माणुसकीची महान शिकवण विद्यार्थ्यांना आणि समाजाला दिली.
प्रताप हायस्कूलच्या छात्रालयाचे सानेगुरुजी रेक्टर होते. छात्रालयातील विद्यार्थ्यांचे ते पालकच होते. गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू राहावे, पैशाअभावी त्यात खंड पडू नये म्हणून गुरुजी दक्ष असत. छात्रालयाच्या जेवणघरात दोन प्रकारचे जेवण असे. एक साधे म्हणजे भाजीभाकरी किंवा झुणका-भाकरी आणि दुसरे स्पेशल. गुरुजी साधेच जेवण घेत. आणि तरीही अधून मधून उपाशी राहून पैसे वाचवून गरीब मुलांची फी भरत. हायस्कूलचे मुख्याध्यापक जगन्नाथ गोपाळ गोखले एकदा भोजनगृहात तपासणीसाठी आले. त्यांनी अन्नाचा दर्जा, स्वयंपाकघर, पिण्याचे पाणी, स्वच्छता इत्यादी तपासले. नंतर हजेरीपत्रक तपासले, साने गुरुजींचे नाव साध्या जेवणाच्या भागात होते, आणि तरी हजेरीपटात दोन-चार दिवसानंतर एकदा गैरहजर असल्याचा शेरा होता. तपासणी नंतर भोजनगृहातून गोखले सर तडक साने गुरुजींच्या खोलीवर गेले, गुरुजींचे नेहमीप्रमाणे खाली मान घालून लिखाण चालू होते. गोखले सर अधिकारवाणीने म्हणाले, “साने… उपाशी राहून जेवणाचे पैसे वाचवून मुलांची फी भरतोस ? उद्यापासून माझ्याकडे जेवायला यायचे ! ”बस्स.. एव्हढे बोलून गोखले सर निघून गेले.
झालं.. मुख्याध्यापकांची आज्ञा साने गुरुजींना सकाळ संध्याकाळ गोखले सरांकडे जेवायला जाणे भाग होते. गोखले सरांच्या पत्नी शांताबाई फार प्रेमळ, सुगरण अश्या सुगृहिणी, त्यांनी अतिशय मायेने साने सरांना चारी ठाव जेवण वाढले. वरण-भात, भाजी-पोळी, चटणी-कोशिंबीर, दही-ताक ! साने सर कसेबसे दोन दिवस जेवले. तिसऱ्या दिवशी हळूच शांताबाईना म्हणाले “मी, उद्यापासून जेवायला येणार नाही, मी हे श्रीमंती जेवण जेऊ शकत नाही. माझ्या घशाखाली घास उतरत नाही, कारण माझ्या गरीब विद्यार्थ्यांना जे मिळत नाही ते मी कसे खाऊ ?” हे ऐकून शांताबाई व्यथित झाल्या. गोखले सरांना जेव्हा हे समजले ते अवाक् झाले. इतकी संवेदनशील आणि ध्येयवादी व्यक्ती आपल्या शाळेला लाभली या विचारांनी गोखले सर धन्य झाले.
त्या काळात सानेगुरुजी विद्यार्थ्यांसाठी हस्तलिखित वार्तापत्र लिहित असत जेणेकरून विद्यार्थ्यांना जगातील घडामोडी समजाव्या, तसेच बालमनावर राष्ट्रीय विचार बिंबवले जावे. पहाटे ४ ते ५ या वेळेत वार्तापत्राचे एकटाकी लिखाण करत. सुंदर हस्ताक्षरातील ते वार्तापत्र देश विदेशच्या वृत्तांनी भरलेले आणि अर्थपूर्ण सुभाषितांनी नटलेले असे. मुलांना विश्वदर्शन घडवीत असे. साक्षात साने गुरुजींसारख्या थोर साहित्यिकाने या दैनिक हस्तलिखित वार्तापात्रातून संस्कारक्षम वयातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचा खजिना आणि संस्काराची सुगंधी फुलेच दिली.
एकदा साने गुरुजींच्या कानावर आले की त्यांचा एक विद्यार्थी सिगारेट ओढतो, तो व्यसनी झालाय. गुरुजी खिन्न झाले, अस्वस्थ झाले. हे समजल्यावर गुरुजींनी वार्तापत्रात या घटनेचा उल्लेख केला. त्यांनी “माझा विद्यार्थी व्यसनी झाला. हा माझाच अपराध आहे. मी संस्कार करण्यात कुठेतरी कमी पडलो. माझ्या या अपराधाला शिक्षा ही झालीच पाहिजे. मला कोणीतरी शिक्षा करा रे…. !” असे आर्त शब्द लिहिले होते. गुरुजींनी स्वतःलाच शिक्षा करून घेतली. संपूर्ण शाळेत, विद्यार्थ्यांमध्ये, संस्थेच्या कार्यालयात सर्वत्र चर्चा झाली. कोण हा विद्यार्थी ? हे काय घडलं ? अर्थातच परिणाम योग्य तोच झाला. त्या सिगारेट ओढणाऱ्या विद्यार्थ्याने गुरुजींचे पाय धरले आणि माफी मागून त्याने व्यसनापासून दूर राहण्याचं वाचन दिलं ! दोघांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले. अपराध, चूक, नाराजगी, खिन्नता सगळे सगळे या अश्रूंच्या लोंढ्यात वाहून गेले. मळभ दूर झाले. मनाचे अवकाश स्वच्छ सुंदर झाले ! विद्यार्थांनी व्यसनी होऊ नये म्हणून साने गुरुजींची ती तळमळ आज कुठे पहायला मिळेल कां ?
क्रमशः
— लेखन : आशा कुलकर्णी. विलेपार्ले, मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
हा एपिसोड माला विशेष अवडला….