भाग – ४ : स्वतंत्रता सेनानी
२९ एप्रिल १९३० रोजी प्रताप हायस्कूल आणि छात्रालय या सीमित कार्यक्षेत्राचा निरोप घेऊन साने गुरुजींनी स्वातंत्र्य लढ्याच्या यज्ञकुंडात उडी घेतली.
धुळ्याजवळ पिंपराळ्याच्या आश्रमातून गुरुजींनी स्वातंत्र्य लढ्यातील प्रत्यक्ष योगदान द्यायला सुरुवात केली. आश्रमाच्या संचालकांनी गुरुजींवर अत्यंत महत्वाची व तितकीच कठीण जबाबदारी टाकली ती म्हणजे स्वातंत्र्याचा प्रचार व प्रसार. साने सर स्वातंत्र्याच्या प्रचारार्थ निघाले. प्रचार दौऱ्यातील व्याख्याने, स्वदेशी, खादी, श्रमदान, स्वावलंबन, प्रभातफेऱ्या, स्वातंत्र्य गीते, स्फूर्ती गीते इत्यादी माध्यमे त्यावेळी स्वातंत्र्याच्या प्रचारार्थ वापरली जात. सत्याग्रहाची मोहीम, सत्याग्रही व स्वयंसेवकांची फौज तयार करणे तसेच आर्थिक मदत गोळा करणे, कारण तरुणांना आकर्षित करून घेण्याची गुरुजींची हातोटीच संचालकांनी हेरली असणार.
गुरुजींवर वाग्देवीचा वरदहस्त होता. जिव्हेवर भारताचा सारा स्वातंत्र्यलढाच अवतरला.गुरुजी बोलू लागले की लोक जीवाचे कान करून ऐकत. एकेक शब्द अंतःकरणाच्या तळमळीतून उमटणारा, श्रोत्यांच्या हृदयाचा ठाव घेणारा. अशा अनंत – अगणित प्रचार सभा साने गुरुजींनी १९३० ते १९३२ दरम्यानच्या दोन वर्षात गाजवल्या. राष्ट्र सेवादलाची सुरुवात झाली.
साने गुरुजींची स्वातंत्र्याच्या प्रचाराची पहिली जाहीर सभा सावदा येथे मारुती मंदिरापुढे झाली. या प्रचारादरम्यान सरकारधार्जीण्या काही टीकाखोरांच्या विरोधाला गुरुजींना तोंड द्यावे लागले. अशाच एका प्रचार सभेत गुरुजींच्या दिशेने कोणीतरी दगड भिरकावला. थोडक्यात डोळा बचावला, पण कपाळाला खोक पडली. परंतु गुरुजी डगमगले नाहीत. उलट त्यांच्या सुरांची धार अधिक तेज झाली. म्हणाले, “इंग्रजांच्या लाठ्या खाऊन मरायचेच आहे. त्याआधी देशबांधवांच्या दगड गोट्यांना खाऊ !”
गुरुजी एका गावातून दुसऱ्या गावात पायाला भिंगरी लागल्यासारखे झपाझप चालत असत. त्यांना गल्ली, मोहल्ला, घराघरात जाऊन लोकांची, जनसामान्यांची मने स्वातंत्र्य लढ्यासाठी तयार करायची होती.
एकदा एक काम हाती घेतले की त्यात सर्वस्व ओतायचे ही साने गुरुजींची वृत्ती. स्वातंत्र्य लढ्यादरम्यान १९३१ साली कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी खानदेशातून महात्मा गांधींना १ कोटी वार सूत अर्पण करण्याचा संकल्प सोडला, तेंव्हा साने सरांनी एकट्या अमळनेर मधून २० लाख वार सूत देण्याचा निर्णय घेतला. ठिकठीकाणी सूतशाळा सुरु झाल्या, घरोघरी चरखे व टकळ्या फिरू लागल्या. साने गुरुजींच्या या सूतयज्ञात अमळनेरच्या सर्व सामान्य नागरिकांनी सुद्धा समिधा अर्पण केल्या, आणि त्यांचा हा संकल्प सिद्धीस नेला. खादीच्या प्रचारासाठी सुद्धा साने गुरुजींनी खूप कष्ट घेतले. प्रसंगी खादीचे गठ्ठे खांद्यावरून नेऊन, हातगाडीवर घालून ते विक्रीसाठी शहरातून प्रभात फेरीही काढत. त्या फेरीत “चरखा चला चलाके लेंगे स्वराज्य लेंगे” तसेच “उठू दे देश, पेटू दे देश” यासारखी स्वातंत्र्याची स्फूर्तीगीते त्यांच्या बरोबरचे विद्यार्थी म्हणत.
स्वातंत्र्य लढ्यात डिसेंबर – जानेवारी १९३१-३२ दरम्यान सविनय कायदेभंगाच्या चळवळी अंतर्गत ब्रिटीश सरकारने महात्मा गांधींना अटक केली. धुळ्याहून जळगावला येतांना आचार्य विनोबा भावेंनाही अटक झाली. सानेगुरुजी कॉंग्रेस कमिटीवर असल्याने त्यांनाही अटक होणे अटळ होते. परंतु गुरुजी ब्रिटीश पोलिसांना बरेच दिवस चकवत होते. ते भूमिगत झाले, पण स्वस्थ बसले नव्हते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने चळवळ सुरूच ठेवली. गांधीजींच्या अटकेच्या निषेधार्थ गुरुजींनी अमळनेरच्या तापीच्या वाळवंटात सभा घेतली. सभेला प्रचंड गर्दी झाली होती. तेथील प्रक्षुब्ध वातावरण पाहून ब्रिटीश पोलीस साने गुरुजींना अटक करू शकले नाहीत.
साने गुरुजींच्या अत्यंत स्फूर्तीदायक भाषणानंतर स्वातंत्र्यासाठी द्रव्य सहाय्याचे आवाहन केले, आणि कोण आश्चर्य ! अनेक महिलांनी स्वतःचे दागिने काढून दिले.
तरुण विद्यार्थी हे पाहून भारावून न जाते तरच नवल!
पुढे जानेवारी १९३२ मध्ये अशाच एका तापीच्या वाळवंटातील जाहीर सभेनंतर लोक खवळले, लाठीमारही झाला, त्याचा थोडा प्रसाद विद्यार्थ्यांना सुद्धा मिळाला. या सभेत मुलांच्या साने सरांना अटक झाली. आणि दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षाही झाली साने सरांची धुळ्याच्या कारावासात रवानगी झाली. सरांच्या विद्यार्थ्यांना खूप वाईट वाटले.
तुरुंगवासात विनोबा भावेंच्या सहवासात असताना विनोबांनी सांगितलेली गीताई साने सरांनी लिहून काढली, विनोबाजी कैद्यांना भगवदगीतेतील एक श्लोक मराठीत सांगत आणि त्या श्लोकाचा भावार्थ समजावून सांगत. याच उपक्रमातून अजरामर अशा गीताईची आणि गीता प्रवचने या प्रसिद्ध ग्रंथाची निर्मिती झाली. या गीताईच्या हजारो प्रती प्रकशित झाल्या व वितरीत झाल्या. साने सर तुरुंगात रोज कैद्यांना ज्ञान देणाऱ्या अनेक गोष्टी सांगत, तेंव्हा पासून ते “साने गुरुजी“ या संबोधनाने अजरामर झाले.
फैजपूर कॉंग्रेसची आठवण : स्वातंत्र्य लढ्यादरम्यान महात्मा गांधींनी “खेड्याकडे चला” अशी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना हाक दिली. आणि शंकरराव देवांच्या प्रयत्नाने खानदेशात कॉंग्रेसचे अखिल भारतीय अधिवेशन भरवण्याचे निश्चित झाले. फैजपूर कॉंग्रेसचे बिगुल वाजले. २७ आणि २८ डिसेंबर १९३६ या तारखा निश्चित झाल्या. सावदा आणि फैजपूर या दोन गावांमधील ८० एकर शेत जमीन पक्की करण्यात आली. परिसराला टिळकनगर नांव दिले गेले. खानदेशातील नेते अण्णासाहेब दास्ताने, देवकीनंदन नारायण, जगन्नाथ गोखले, धनाजी नाना चौधरी तसेच महाराष्ट्रातील दिग्गज नेते शंकरराव देव, रावसाहेब पटवर्धन, अच्युतराव पटवर्धन, काकासाहेब गाडगीळ, एस.एम.जोशी, केशवराव जेधे विविध जिल्ह्यांतून फैजपूरला एकवटले. या सर्वांचे पितामह आचार्य विनोबा भावे यांचाही मुक्काम टिळक नगरातच होता.
साने गुरुजी प्रकृती ठीक नसतानाही पुण्याहून अधिवेशनाला आले. ते आले आणि त्यांनी अधिवेशनाच्या आणि कॉंग्रेसच्या प्रचाराचे काम हाती घेतले. गुरुजींची वाणी गावागावातून आणि खेड्यापाड्यातून घुमू लागली. पूर्व आणि पश्चिम खानदेश त्यांनी अक्षरशः पिंजून काढला. स्वयंसेवकही मिळाले, निधीही जमला. साने गुरुजींनी ४५००० सभासद नोंदवून आपला संकल्प पूर्णत्वास नेला. बोलून-बोलून साने गुरुजींचा घसा आणि चालून-चालून पाय दुखत. तेंव्हा विनोबाजी स्वतः त्यांच्या पायांना गरम तेल लावून त्यांची सेवा करत तेंव्हा गुरुजींना फार संकोच वाटे. प्रचार थंडावला. गुरुजींची वाणी व पाय विसावले आणि हात कामाला लागले. त्यांनी हातात झाडू व टोपली घेऊन संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याचे ठरवले. त्यांचे विद्यार्थीसुद्धा त्यांच्या बरोबर होते. साने गुरुजींचे हे प्रचंड योगदान बघून त्यांना अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष करावे असे सर्वानुमते ठरले. हे समजल्यावर त्यांनी जिल्हाध्यक्षांना भेटून कोणतेही अधिकाराचे पद स्वीकारण्यास नकार दिला. म्हणाले “ जर फारच आग्रह केलात तर मी अधिवेशनाला येणारच नाही “ गुरुजींनी चालून आलेला मान सन्मान नम्रपणे नाकारला. कोणतेही चांगले काम निरपेक्षपणे सेवाधर्म म्हणून कोणतीही लाभाची अपेक्षा न ठेवता करावे, ही मोलाची शिकवण गुरुजींनी कृतीतून दिली.
क्रमशः
— लेखन : आशा कुलकर्णी. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800