Saturday, July 27, 2024
Homeलेखसाने गुरुजी : परिचित अपरिचित

साने गुरुजी : परिचित अपरिचित

भाग – ५ : अस्पृश्यता निवारण लढा

जानेवारी १९४७ च्या सुमारास भारतीयाना स्वातंत्र्याचे वेध लागले, आता लवकरच भारत स्वतंत्र होणार हे नक्की झाले. परंतु साने गुरुजींचे स्वप्न होते, जातीभेद आणि स्पृशास्पृशता नसलेल्या धर्मनिरपेक्ष स्वतंत्र भारताचे. म्हणून आता त्यांचे लक्ष होते अस्पृश्यता निवारण लढ्याचे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात जेंव्हा सानेगुरुजी गेले तेंव्हा दरवाज्यात बडव्यांनी त्याना अडवले. नाव विचारले त्यांनी सांगितले “पांडुरंग सदाशिव साने” ब्राम्हण ? चल जा आत, पुढच्याला नाव विचारले त्याने सांगितले अमुक अमुक ब्राम्हणेतर – अस्पृश्य ? चल हो बाहेर ! तिथेच साने गुरुजी थांबले. थोडी बोलाचाली झाली.

गुरुजी गाभाऱ्यात न जाता, दर्शन न घेता त्या अस्पृश्यांबरोबर बाहेर पडले. अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशासाठी त्यांनी आमरण उपोषण जाहीर केले. त्यांचा हा टोकाचा निर्णय ऐकून सगळेच हादरले. सेनापती बापट साने गुरुजींना गुरूंच्या स्थानी, ते आले म्हणाले, “अरे साने, कशासाठी आपला प्राण फेकून द्यायला निघाला आहेस ? हे संपूर्ण महाराष्ट्राला समजावून सांग आणि मगच आमरण उपोषणाचे हत्यार उपस ” सेनापतींची आज्ञा शिरसावंद्य मानून गुरुजींनी महाराष्ट्र अक्षरशः पिंजून काढला. जवळ जवळ तीन महिन्यांच्या या दौऱ्यातील अनेक व्याख्यांनात धर्मातील समानतेचा महान आशय त्यांनी महाराष्ट्रीय जनतेला अत्यंत सोप्या भाषेत सांगितला, आणि दंभाने, अहंकाराने भ्रष्ट झालेल्या धर्मांधांवर त्यांनी अक्षरशः कोरडे ओढले. या दौऱ्यात गुरुजींच्या ओघवत्या वाणीने आणि सोप्या भाषेमुळे अनेक पुरोगामी विचारांच्या गावात अनेक मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली झाली.

गुरुजींची ही व्याख्याने त्यांचे चाहते हरि लिमये यांनी जून १९७१ मध्ये म्हणजेच जवळजवळ ५२ वर्षांपूर्वी “चंद्रभागेच्या वाळवंटी” या ६० पानी छोट्याशा पुस्तक रुपात प्रकाशित केली. काय म्हणाले गुरुजी त्या दौऱ्यात ? हे त्यांच्याच शब्दात …
पंढरपूर म्हणजे महाराष्ट्राचे “हृदय”, महाराष्ट्राच्या जीवनाची “गुरुकिल्ली“. पंढरपूरची कळ दाबली की महाराष्ट्रात प्रकाश पडतो. पांडुरंग, विठूराया, विठ्ठल, विठूमाउली म्हणजे रंग, जाती, धर्म, पंथ यांना कोणतेही स्थान न देणारा देव. “भेदाभेद अमंगळ“ मानणारा देव. अशा विठ्ठलाच्या अस्तित्वाने पावन झालेले स्थान. संतांनी वाळवंटात सर्वांना जवळ केले. आपणही मंदिरात सर्वांना घेऊन जाऊया.

निर्गुण निराकाराला आम्ही सगुण रूप दिले मूर्तीसमोर उभे राहून तिच्यात विश्वंभर बघायचा. मूर्तीत देव बघायला शिकून सर्व मानवी मूर्तीत, सर्व चराचरात देव बघायला शिकायचे. सर्वात तुच्छ म्हणजे दगड, त्या दगडातही आम्ही परमेश्वराचे पावित्र्य नि सौंदर्य बघायला शिकायचे हे यातील रहस्य. दगडाच्या मूर्तीतही देव बघणारे आपण अधिक चैतन्यमय माणसात नाही कां देवत्व बघणार ? तुकाराम गाथेत तुकाराम महाराज म्हणतात “जिकडे तिकडे देखे उभा, अवघा चैतन्याचा गाभा.”
गीता तर म्हणते – जो दुसऱ्याला नीच समजतो, तुच्छ समजतो तो स्वतःच राक्षस आहे “आढ्योपी जनवानस्मी कोन्योस्ती सदृशोमया” – माझ्या सारखा मोठा कोण ? असे म्हणणारे राक्षस आहेत असे गीता सांगते.

ज्ञानेश्वरांनी संस्कृतातील गीता प्राकृतात आणली, ती ज्ञानेश्वरी. यावेळी सनातन्यांनी त्याना विरोध केला. धर्माचे सार ‘आबाल सुबोध’ असे सांगणाऱ्या ज्ञानेश्वरांचा छळ केला. माणसाला जगण्यासाठी जशी भाकरी पाहिजे त्याप्रमाणेच ज्ञानाची व विचारांची भाकरीही मिळाली पाहिजे.
नारदमुनींनी त्यांच्या स्मृतीमध्ये म्हटले आहे, “श्रणवन्तु सर्वे अमृतस्य पुत्राः“ याचा अर्थ असा की कोणी उच्च नाही – कोणी तुच्छ नाही धर्माच्या दृष्टीने सर्व एकसारखेच आहेत.

अहंकाराचा पडदा आपल्या डोळ्यापुढून दूर केलात तर खऱ्या धर्माचा आत्मा तुम्हाला सापडेल. असे वेद म्हणतो “अनहं वेदनं सिद्धी अहंवेदनमापद:“ वेद सर्व धर्मांना ईश्वराजवळ नम्र होण्यासाठी सांगतो. हे सर्व वारकरी पंथाने प्रचारात आणले.
“सतु निरतिशय: प्रेममय” असे परमेश्वराविषयी म्हणतात. ईश्वर प्रेमाचा सागर आहे. तुम्हाला परमेश्वर भेटावा असे वाटत असेल तर प्रेमळ बना. सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करणे, सर्वांना सारखे लेखणे हा ब्रह्मज्ञानाचा आत्मा आहे. बृहन म्हणजे मोठा. ब्रम्हज्ञान म्हणजे मोठी दृष्टी. अशा ब्रह्मज्ञानाच्या आधारावर हरिजनांना जवळ घेणे हे आपले धर्मकर्तव्य आहे. कोट्यावधी भावांना दूर ठेवण्यात स्वधर्म नाही आणि स्वराज्य तर नाहीच नाही ! “प्रभवार्थाय भूतानां“ ही धर्माची व्याख्या आहे. त्या दृष्टीने सात कोटी भावांना दूर ठेवून आनंदप्राप्ती होणार नाही.
संध्येमध्ये आपण म्हणतो “सर्वेषांमविरोधेन ब्रम्ह कर्म सामारभंत“ सर्वांना श्रेष्ठ समजणे हाच आजचा युगधर्म आहे. धर्माचा आत्मा बदलणार नाही, पण रूढी, आचारविचार, चालीरिती बदलाव्याच लागतात, कालमानाप्रमाणे चालीरितीत बदल केला नाहीत तर नष्ट व्हाल.

हिंदुधर्मातील दिव्यता जगाला सांगणारे स्वामी विवेकानंद त्यांच्या हवेलीत आलेल्या वडिलांच्या आशीलांतील स्पृशासस्पृशतेचा भेदभाव पाहून दु:खी होत, अश्रू ढळत. ते म्हणत “हिंदू लोकांनी आपल्याच बंधूंना पशूंच्या स्थितीत नेऊन ठेवले आहे, त्या पार्थसारथ्याच्या या देशात केव्हढे हे पाप ?” स्वामीजींचे गुरु रामकृष्ण परमहंस म्हणत “हिंदू धर्माला, “शिवू नको धर्म“ असे नाव दिले पाहिजे”. बंधूंनो, विवेकानंदांची वेदना, रामकृष्णांच्या उदगारातील तीव्र दु:ख तुम्हाला कळते कां ?
सानेगुरुजी म्हणतात “ गेल्या काही महिन्यांत मी जो प्रचार केला, त्यात अस्पृश्यते विषयी सांगितले. सरकार आता कायदाही करत आहे असे समजते. परंतु मनोबुद्धीतच जी क्रांती झाली पाहिजे ती अद्याप झाली नाही. पंढरपुर मंदिर मोकळे व्हावे, पांडुरंगाच्या पायी हरिजनाना डोके ठेवता यावे यासाठी आज मी एकादशी पासून उपवास करीत आहे. मंदिराच्या व्यवस्थापनाला माझी विनंती आहे की, त्यांनी देवाजवळ सर्व लेकरांना येऊ द्यावे, तशी घोषणा करावी आणि तो पर्यंत माझा उपवास चालूच असेल.

अखेर १ मे १९४७ हा दिवस उजाडला. साने गुरुजींनी एकादशीच्या मुहूर्तावर आपले उपोषण सुरु केले. स्वातंत्र्याच्या तोंडावर हा कसला अपशकून ? म्हणून उपोषणाच्या विरोधात देशभरातून सनातनी मंडळी पंढरपुरात गोळा झाली. बडव्यांनी “जाओ साने भीमा पार, नही खुलेगा विठ्ठल द्वार“ अशा घोषणा करून गुरुजींना त्यांनी काळे झेंडे दाखवले.
तसंच उपोषणाच्या जागेबद्दल राज्यात विरोधकाना मोठ्या प्रमाणावर पाठींबा मिळाला. उपोषणाला जागाच मिळू नये अशी तजवीज त्यांनी करून ठेवली होती. पंढरपूरच्या सनातनी पंडितांच्या दबावाखाली येऊन काही वारकरीही मंदिर प्रवेशा बाबत प्रतिगामी भूमिका घेते झाले. परंतु गाडगे महाराजांच्या विचारांची ध्वजा घेऊन कार्य करणारे कुशाबा महाराज तनपुरे यांनी आपल्या मठात उपोषणाला जागा दिली. हा लढा आज जरी सोपा वाटत असला तरी ७५ वर्षांपूर्वी तो सोपा नव्हता. हा लढा जितका अस्पृश्यता निवारणाचा लढा होता तितकाच मंदिर प्रवेश समतेचा लढाही आहे. “भेदाभेद अमंगळ” असा संत तुकारामांचा संदेश देणारा लढा !

साने गुरुजींच्या उपोषणाच्या काळात ९ मे १९४७ रोजी आचार्य अत्रे यांनी पंढरपूरच्या सभेत भाषण केले. ते म्हणाले “आज पहिल्यांदाच मी पंढरपूरला आलो आहे, मी आज आलो आहे तो देवळातल्या पांडुरंगाच्या दर्शनाला नाही तर, देवळाबाहेर मरणाच्या दारी बसलेल्या आमच्या एका पांडुरंगाच्या भेटीसाठी आलो आहे. दुपारी मी साने गुरुजींना पाहिलं, नऊ दिवसांच्या उपोषणानंतर, त्यांचं शरीर थकून गेलं आहे, जीवनशक्ती अगदी क्षीण होत चालली आहे, क्षणाक्षणाला त्यांची प्राणज्योत मंद होत चालली आहे. त्यांना तुम्ही वाचवणार आहात की नाही ? साने गुरुजींची करुण मूर्ती पाहून दुसरा कोणताच विचार माझ्या मनात येत नाही. दुसऱ्यांना हसवणारा मी, पण आज मलाच रडू कोसळत आहे. आपल्या हरिजन बंधूंना विठोबाच्या मंदिरात प्रवेश नाही याचे दु:ख इतरांपेक्षा गुरुजींना अधिक झाले आहे”.

१ मे ते ११ मे १९४७ असे अकरा दिवस उपोषण चालले. मध्यवर्ती कायदे मंडळाचे तसेच लोकसभेचे सभापती दादासाहेब मावळंकर यांनी मध्यस्ती करून महात्मा गांधींचा गैरसमज दूर केला आणि बडव्यांनाही समजावले, सामाजिक दबाव वाढल्यानंतर जनक्षोभ बघून जीवाच्या भीतीने सनातनी – बडवे मागे हटले, १० मे १९४७ रोजी मंदिर प्रवेशाला मान्यता मिळाली व लढा यशस्वी झाला ! उपोषण सुटले ! सर्वांचे डोळे पाझरत होते. एका पंढरीनाथाने दुसऱ्या पंढरीनाथाला खऱ्या अर्थाने मुक्त केले. देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी पांडुरंगाला स्वातंत्र्य लाभले. ध्येयवादाच्या बळावर शतकानुशतके चालत आलेल्या रूढी परंपरा मोडीत काढता येतात याची प्रचीती आली. अवघ्या महाराष्ट्राला खंबीर साने गुरुजींचे पुन्हा एकदा दर्शन झाले.
मी सानेगुरुजींचा “पंढरीनाथ” असा उल्लेख का केला ? असा प्रश्न काही वाचकांच्या मनात आला असेल, तर त्याचे उत्तर असे की सानेगुरुजींचे मूळ पाळण्यातले ठेवलेले नांव “पंढरीनाथ” होते. शाळेत त्यांच्या शिक्षकांनी प्रवेश देतांना त्याचे “पांडुरंग” केले. बालपणी आई आणि शाळा कॉलेज मध्ये मित्र “श्याम” म्हणून हाक देत. प्रताप हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणून रुजू झाल्यावर ते पां.स.साने होते तर विद्यार्थ्यांमध्ये “साने सर” म्हणून ओळखले जात. पुढे साने सर शाळा सोडून स्वातंत्र्य लढ्यात पडले आणि तुरुंगवासात विनोबा भावेंच्या सहवासात असताना विनोबांनी सांगितलेली गीताई त्यांनी लिहून काढली, आणि कैद्यांना ज्ञान देणाऱ्या अनेक गोष्टी सांगितल्या तेंव्हा पासून ते “साने गुरुजी“ या संबोधनाने अजरामर झाले.

क्रमशः

आशा कुलकर्णी

— लेखन : आशा कुलकर्णी. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments