Saturday, July 27, 2024
Homeबातम्या"सार्थ ज्ञानेश्वरी" चा जीर्णोद्धार

“सार्थ ज्ञानेश्वरी” चा जीर्णोद्धार

पुणे येथील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचे वैकुंठवासी प्राचार्य सोनोपंत उर्फ मामासाहेब दांडेकर यांच्या सार्थ ज्ञानेश्वरी (१९५३ मधील प्रतीचा) जीर्णोद्धार करण्यासाठी ती प्रत शिक्षण प्रसारक मंडळी च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष ॲड. एस. के. जैन यांना मकर संक्रांतीला, दिनांक 15 जानेवारी रोजी सुपूर्द करण्यात आली.

मामासाहेब यांनी लिहिलेल्या आणि संपादित केलेल्या या प्रतीचा जीर्णोद्धार आणि आधुनिक इंटरनेट तंत्रज्ञानाची जोड देऊन निर्मिती केलेल्या अभिनव ग्रंथ स्मारकाचे लोकार्पण संस्थेच्या मा. नियामक मंडळ सदस्यांच्या उपस्थितीत झाले.

प्राचार्य शंकर वामन तथा सोनोपंत उर्फ मामासाहेब दांडेकर (वर्ष १९४५ ते १९५०) तत्त्वज्ञान विषयाचे गाढे विद्वान प्राध्यापक आणि वारकरी संप्रदायाचे प्रणेते होते. त्यांनी या सार्थ ज्ञानेश्वरी ग्रंथाचे संपादन केले होते.

पुण्याच्या प्रसाद प्रकाशनाने वर्ष १९५३ मध्ये प्रकाशित केलेली ही प्रत या महाविद्यालयाच्या ग्रंथालयात उपलब्ध होती. त्यांनी स्वतः, असंख्य विद्यार्थी, प्राध्यापक आणि वारकरी संप्रदायाचे अभ्यासक अशा अगणित वाचकांनी ही प्रत श्रद्धापूर्वक हाताळली असेल. ही प्रत कालांतराने जीर्ण होऊन ग्रंथाची पाने सुटी होत गेली. मधल्या एका कालखंडात ही प्रत ग्रंथालयात दृष्टी आड झाली होती.

या जीर्णोद्धाराची संकल्पना स. प. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी (१९६३-६७) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाचे सेवानिवृत्त प्रमुख (वर्ष २००७) प्रा. डॉ. किरण ठाकूर यांची आहे.

जीर्णोद्धार स्मारकाचे डिझाईन आणि निर्मिती एम. आय. टी. इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, एम आय टी ए डी टी युनिव्हर्सिटी पुणे, चे संचालक प्रा. डॉ. नचिकेत किरण ठाकूर यांनी केले.

जीर्णोद्धाराची सुरुवात आधुनिक बाइंडिंग तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आली. या प्रतीत मूळ एकूण ८५६ पाने आहेत. मूळ आवृत्तीतील रंगीत पाने सुरक्षित ठेवली आहेत. या ग्रंथाला २१. ५ सें मी x १४. ५ सें मी x ६ सें मी आकाराच्या लाकडी बॉक्स मध्ये काचेच्या चौकटीत बंदिस्त ठेवले आहे. ह. भ. प. डॉ सोनोपंत दांडेकर यांच्या स्मारकाची ही बॉक्स महाविद्यालयाच्या ग्रंथालयात दर्शनासाठी ठेवली जाईल. वाचनासाठी स्वतंत्र प्रत उपलब्ध आहे.

ज्ञानेश्वरीच्या मूळ १९५३ आवृत्ती ची अर्काइव्हल लिंक नागपूर येथील अभ्यासक प्रा. डॉ. रमा गोळवलकर यांनी उपलब्ध करून दिली आहे. https://archive.org/details/in.gov.ignca.5728 ही लिंक क्यू आर कोडच्या माध्यमातून वाचकांना उपलब्ध आहे. आधुनिक तंत्राद्वारे मामासाहेब दांडेकर यांच्या ज्ञानेश्वरीचे वाचन जगात कोठेही करता येईल अशी आता व्यवस्था निर्माण झाली आहे.

पालघर येथील सोनोपंत दांडेकर कला, व्ही एस आपटे कॉमर्स आणि एम एच मेहता सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी मराठी विश्वकोशासाठी लिहिलेल्या सोनोपंतांच्या संक्षिप्त चरित्राचा मजकूर प्रसिद्ध करण्यास अनुमती दिली आहे.

या अभिनव ग्रंथ स्मारकाला ग्रंथपाल श्रीमती प्रतिभा साखरे, प्राचार्य डॉ. सुनील गायकवाड आणि शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष ॲड. एस. के. जैन यांचे हातभार लागले, असे प्रा डॉ किरण ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

नचिकेत ठाकूर यांनी वापरलेल्या डिझाईन तंत्राचा वापर करून सर परशुराम महाविद्यालय आणि मुंबईच्या रुईया महाविद्यालयातील ग्रंथालयांमध्ये पडून असलेल्या जुन्या मौलिक ग्रंथांचा जीर्णोद्धार आपली संस्था लवकरच हाती घेईल असे ॲड. जैन यांनी जाहीर केले.

याप्रसंगी शि. प्र. मंडळी च्या नियामक मंडळाचे मा. उपाध्यक्ष श्री. श्रीकृष्ण चितळे, सदस्य श्री. सतीश पवार संस्थेच्या सचिव डॉ. राधिका इनामदार तसेच डायरेक्टर (ऑपरेशन्स) श्री. श्रीरंग कुलकर्णी, प्रा डॉ श् किरण ठाकूर यांचे कुटुंबीय व पत्रकार मित्रही उपस्थित होते.

— टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. प्रो डॉ किरण ठाकूर व नचिकेत ठाकूर यांनी केलेल्या या बहुमोल कार्याबद्दल त्यांना मनःपूर्वक धन्यवाद !! हीच गोष्ट इतर मौल्यवान ग्रंथांबद्दल व्हावी हीच प्रार्थना 🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments