स्वातंत्र्यवीर सावरकर
जन्म:२८ मे १८८३
मृत्यू:२६ फेब्रुवारी १९६६.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने हा विशेष लेख.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विनम्र अभिवादन.
– संपादक
केशवसुतांनी त्यांच्या तुतारी या कवितेतून “जुने जाऊ द्या मरणालागुनी, जुन्यातून हो निष्पत्ती नवी” जुन्या परंपरा मोडीत काढा आणि त्या जुन्या परंपरेतलं तत्व लक्षात घेऊन नव्या परंपरा निर्माण करा असा संदेश दिला होता.
तत्त्व महत्त्वाचं की परंपरा ? समाजजीवन महत्त्वाचं की परंपरा ? माणूस महत्त्वाचा की परंपरा ? या सगळ्या परंपरा मानवासाठी आणि पर्यायाने समाज जीवनासाठी योग्य अशा असल्या पाहिजेत. अनेक परंपरा कालमान परिस्थितीनुरूप बदलल्या पाहिजेत हा संदेश सतत समाजसुधारक देत आले आहेत.
सावरकरांनी तर समाजसुधारणांचे कितीतरी पैलू समाजासमोर ठेवले होते. परंतु सावरकरांची मार्सेलिस बंदरातील उडी आणि अंदमानातील हाल-अपेष्टा यापुढे सावरकरांच्या जीवनाचा आणि कार्याचा कुणी विचारच करत नाही. उलट अंदमानातून पुढे सुटून आल्यानंतर, रत्नागिरी मधील त्यांच्या वास्तव्यामध्ये त्यांनी जे कार्य केलं ते त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं कार्य. पण ते कुणाला पटणार नाही वा पचणारही नाही. हिंदू समाजाला तर ते कधीच झेपणार नाही. सावरकरांनीच निर्माण केलेली हिंदुमहासभा, पण त्या हिंदूमहासभेच्या अनुयायांना सुद्धा सावरकर झेपले नाहीत. त्यांचेही कार्य हे सावरकरांच्या तत्वज्ञानाच्या विरोधातच चालू झालं हे सावरकरांचे दुर्दैव आहे. परंतु असं दुर्दैव अनेक समाजसुधारकांच्या वाट्याला येतं. त्यांच्या तत्त्वज्ञानाऐवजी त्यांची मूर्ती गाभार्यात ठेवून त्यांच्या नावाचे टाळ कुटत राहणे, यातच धन्यता मानणारा समाज हे या सर्व समाजसुधारकांचे दुर्दैव आहे. हे दुर्दैव महात्मा गांधी यांच्या वाट्याला सुद्धा आलं. त्यांनाही ते चुकलं नाही.
दोन शब्दात दोन संस्कृती या सावरकरांच्या निबंधात त्यांनी ‘श्रृती-स्मृती पुराणोक्त’ आणि ‘अपटूडेट’ या दोन शब्दांचा दोन संस्कृतींशी संबंध जोडला आहे. आपली श्रुति-स्मृति-पुराणोक्त ही संस्कृती सोडून देऊन’ आधुनिक विज्ञानाचा पुरस्कार करून अपटुडेट व्हा. आपले ज्ञान काळाशी सुसंगत व आजच्या तारखेपर्यंत ताजेतवाने ठेवण्यावर भर दिला आहे.
आज या कम्प्युटरच्या युगात त्याची किती गरज आहे हे आजची पिढी जाणते. एका एका महिन्यात तुमचं ज्ञान हे भूतकाळ होऊन जातं. अशी परिस्थिती आज अनेक क्षेत्रात आहे. त्यामुळे स्वतःचे ज्ञान जो कालानुरूप सतत ताजंतवानं ठेवतो त्याचीच प्रगती होईल. हे आजचं वास्तव सावरकरांनी किती वर्षांपूर्वी सांगून ठेवलं होतं.
आपल्या राष्ट्राचा इतिहास, त्या इतिहासापासून घेतलेला बोध आणि त्या बोधापासून भविष्यकाळाचा विचार करून वर्तमान काळात टाकलेली पावलं यातून राष्ट्र घडत असतं असे सावरकर मानत. त्यातूनच सावरकरांनी राष्ट्र उभारणीसाठी जी तत्वं सांगितली त्या तत्त्वांशी अनेक राजकीय लोकांनी संघर्ष केला. सावरकरांचा प्रमुख संघर्ष हा मोहनदास करमचंद गांधी (त्यावेळी ते महात्मा नव्हते) यांच्याशी झाला. अहिंसा आणि सहिष्णुता यांच्या निरुपयोगीपणामुळे आपल्या अखंड भारताचे लचके तुटत गेले. आता अजूनही अहिंसा आणि सहिष्णुता यांचा पुरस्कार करत राहिलो तर अजूनही भारताची शकले होण्यास वेळ लागणार नाही. सावरकरांचे हे म्हणणे भारताच्या फाळणीने खरे ठरवले.
माझ्या मते महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर दोघेही आपापल्या विचारसरणीमध्ये बरोबर असू शकत होते. सावरकरांनी तरुणांच्या मनात स्वातंत्र्यलढ्याविषयी स्फुल्लिंग जागृत केले. तरुणांना स्वातंत्र्यलढा उभारण्यासाठी उद्युक्त केले. उलट पक्षी महात्मा गांधींनी सर्वसामान्य माणसाच्या मनात स्वातंत्र्याची उर्मी निर्माण केली. रोजच्या जीवनात पोटासाठी संघर्ष करणाऱ्या माणसाला स्वातंत्र्याचे फारसे कौतुक नव्हतेच. कारण तो सामान्य माणूस कधीच स्वतंत्र नव्हता. त्याच्या मनात स्वातंत्र्याविषयी आपुलकी निर्माण करणे त्याला स्वातंत्र्यलढ्याचा सैनिक बनवणे हे अत्यंत अवघड काम होते. महात्मा गांधींना त्या कामात यश मिळाले.
स्वतःच्या जीवावर उदार होऊन स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करण्यासाठी एखाद्या माणसाला उद्युक्त करणे हे त्याहून अवघडच काम होते. माणसाला स्वतःचे जीवन, स्वतःचे प्राण सर्वात महत्त्वाचे वाटतात. परंतु त्याचा सुद्धा त्याग करण्यास माणूस जेव्हा तयार होतो तेव्हा, तो एका खूप प्रभावी विचारांनी भारून गेल्याशिवाय नाही. हे विचारांचं भारलेपण सावरकरांनी तरुणांच्या मनात निर्माण केलं. ते तरुणांच्या मनामध्ये निर्माण होण्यासाठी त्यांनी त्यांच्या आयुष्याचा पट तरुणांच्या समोर ठेवला. १८५७ चे स्वातंत्र्य समर पासून ते माझी जन्मठेप पर्यंत त्यांच्या जीवनातील क्षण आणि क्षण आणि प्रत्येक कृती ही तरुणांना स्वातंत्र्यासाठी जागवणारी होती.
अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळणार नाही याबाबत सावरकरांचे मत ठाम होते. अनेक काँग्रेस नेत्यांचे असेच मत होते. परंतु गांधींच्या प्रभावापुढे स्वतःचे मत त्यांना मांडता येणे शक्य होत नव्हते. सुभाषबाबूंनी काँग्रेस आणि पर्यायाने देश सोडण्याचा निर्णय घेतला. वल्लभभाई पटेल यांनी पक्षात राहूनच थोडाफार वैचारिक संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. भगतसिंग, सुभाष चंद्र बोस, डॉ. हेडगेवार अशा अनेक व्यक्तींनी परंतु मुख्यतः पंजाब, बंगाल व महाराष्ट्र येथील अनेक नेत्यांनी विशेषतः तरुणांनी महात्मा गांधींच्या विरोधात काँग्रेसचा त्याग केला. सावरकर हे त्यातील एक प्रमुख व्यक्तिमत्व होते. महात्मा गांधींच्या नेतृत्वाला त्याकाळी ब्रिटिशांनीही खतपाणी घातले. कारण त्यांना हिंसक मार्गाने स्वातंत्र्य चळवळीचा उद्रेक झेपणारा नव्हता.
सावरकरांच्या अंदमानातील दहा-बारा वर्षाच्या तुरुंगवासामुळे आणि त्यानंतरही काही विशिष्ट अटींवरच त्यांची सुटका झाल्यामुळे त्यांना नंतरच्या काळात राजकीय चळवळीवर प्रभाव ठेवता आला नाही. सावरकर अंदमानातून सुटून येईपर्यंत महात्मा गांधींचे नेतृत्व ब्रिटिशांनी खतपाणी घालून खूप मोठे बनवले. अर्थात महात्मा गांधींची समाजाभिमुखता आणि त्यांचे आंदोलनाचे विविध प्रयोग समाजमनाशी जोडणारे असल्यामुळे त्यांचा प्रभाव वाढणे सहाजिक होतेच.
बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र देशाची मागणी केली त्याला महात्मा गांधींनी स्पष्टपणे व प्रखर विरोध कधीच केला नाही. त्यामुळे अनेक नेते महात्मा गांधींवर नाराज होते.
सुरुवातीच्या काळात गांधींनी फाळणीला नकार दिला असला तरी अंतिमतः त्यांनी त्यास मंजुरी दिली. यासाठी ब्रिटिशांनी जे काही राजकारणाचे खेळ केले ते यशस्वी ठरले. हे सर्व रत्नागिरीत राहून सावरकर पहात होते. खाजगीत ते त्यांच्या सहकाऱ्यांशी नाराजीने बोलले ही असतील.परंतु त्यात ते प्रत्यक्ष सहभाग घेऊ शकत नव्हते. स्वातंत्र्यानंतर मात्र त्यांनी त्यावर अनेक टीकात्मक आणि प्रखर विरोधी लेखन केले. परंतु फाळणी होऊन गेली होती. जे काही वाईट घडणे शक्य होते ते सर्व घडून गेले होते. त्यांना निष्प्रभ करण्यासाठी काँग्रेस पक्षाने त्यांना गांधी हत्येच्या खटल्यात गुंतवून त्यांचा समाज मानसावरील प्रभाव कमी करण्याची यशस्वी खेळी केली.
परंतु एकंदरीतच सावरकर राजकारणामध्ये निष्प्रभ ठरले असले तरी सामाजिक चळवळीमधील त्यांचे योगदान खूपच वरच्या दर्जाचे होते. त्यांच्या अनुयायांना व समर्थकांना सुद्धा सामाजिक सुधारणांमधील त्यांचे प्रखर विचार आणि तथाकथित हिंदू सवर्णांच्या विरोधात केलेले लिखाण आणि आंदोलन हे झेपण्यासारखे नव्हते. त्यामुळे हे सर्व समाजकार्य आणि प्रखर लेखन समाजापुढे हिरीरीने मांडून प्रबोधनात्मक कार्य करण्याचा आणि त्यांचे आंदोलन पुढे चालू ठेवण्याचा त्यांच्या अनुयायांनी सुद्धा कधी प्रयत्न केला नाही.
शेवटी आपला समाज सुद्धा समाजसुधारकांची तत्वे विसरून तस्वीर किंवा मूर्ती किंवा पुतळ्यात किंवा अगदी देवळात सुद्धा बसवून त्यांच्या नावाचे टाळ कुटत राहणे आणि तत्त्वांचा विसर पाडणे यामध्ये वाकबगार आहे. प्रश्न प्रत्येकाच्या वैयक्तिक विचारसरणीपर्यंत येऊन पोहोचतो.
महापुरुषांची तत्वं लक्षात घेणार का त्यांच्या नावाचे टाळ कुटत राहणार हे आपण ठरवायचं आहे. नाहीतर आजची पिढी ही त्या माणसांना विसरून जाईल त्या तत्वांना विसरून जाईल आणि मग सावरकर यांच्या म्हणण्याप्रमाणे आपल्या संस्कृतीचा ऱ्हास व्हायला जास्त वेळ लागणार नाही. आपल्याच संस्कृतीच्या ऱ्हासाचे कारण आपल्याला व्हायचं आहे काय ? हे ज्यानं त्यानं ठरवायची वेळ आलेली आहे असं मला वाटतं.
— लेखन : सुनील देशपांडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ.☎️ 9869484800