Sunday, April 21, 2024
Homeसाहित्यसाहित्य तारका : २४

साहित्य तारका : २४

कमलाबाई विष्णू टिळक

पूर्वाश्रमीच्या कमला अनंत उकिडवे.. मॅट्रिकला मुलींत पहिली आलेल्या युवती अशी ओळख असलेल्या कमलाबाई टिळक यांचा जन्म २६ जून १९०५ रोजी झाला…

संस्कृतसाठी जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती, चॅटफिल्ड तसेच यमुनाबाई दळवी पारितोषिक मिळालेल्या कमलाबाई इंग्रजी साहित्य घेऊन एम.ए. प्रथम वर्गात उत्तीर्ण झाल्या, व त्यानंतर हुजूरपागेच्या मुलींच्या महाविद्यालयाच्या प्राचार्या म्हणून कार्यरत होत्या. त्याचप्रमाणे बनारस येथे मुलींच्या महाविद्यालयात इंग्रजीच्या प्राध्यापक आणि नंतर प्राचार्या म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

निवृत्तीनंतर फिल्म सेन्सॉर बोर्डाच्या सल्लागार समितीचे ही काम त्यांनी आठ वर्षे केले..

सुरुवातीच्या काळात त्यांनी रत्नाकर’, ‘मनोहर’, ‘यशवंत’, ‘स्त्री’ या मासिकांमधून कथालेखन केले. 
त्यांचे ‘हृदयशारदा’ (१९३२), ‘आकाशगंगा’ (१९४४), ‘अश्विनी’ (१९६३), ‘सोन्याची नगरी’ (१९८५) हे कथासंग्रह तर ‘शुभमंगल सावधान’ (१९७५) ही कादंबरी शिवाय वैचारिक लेखनामध्ये ‘स्त्री-जीवन विषयक काही प्रश्न’ (१९४१),‘स्त्री-जीवनाची नवी क्षितिजे’ (१९६५), ‘युधिष्ठिर’ (१९७१) इ.. व झोपडपट्टीतील झिप-या व सारेच खोटे हे बालवाङ्मय आणि एकांकिका असे लेखन त्यांनी केले.

काही कथांची बीजे उदाहरणार्थ ‘कोकणी वहाणा’, ‘माझी बाग’ त्यांच्या स्वानुभवात आहेत तर काहीं कथांची बीजे भोवतालचे निरीक्षण, मैत्रिणींच्या, कुटुंबांतील स्त्रियांच्या मानसिकतेत आहेत..

कमलाबाईं यांनी स्त्रीला जाणवलेली भिन्न-भिन्न स्त्री-रूपे रेखाटली आहेत. त्यांतील वेगवेगळ्या छटा, गुंतागुंत हे उलगडून दाखविले तेसुद्धा अगदी अकृत्रिमपणे आणि तटस्थपणेही… ना त्यात स्त्री-कैवार होता ना स्त्री-द्वेष्टेपणा आणि तरीही कथेची कलात्मक बाजू त्या कधी विसरल्या नाहीत हे विशेष… समाजाकडे पाहण्याची सूक्ष्म निरीक्षण शक्ती, स्वतःची वैचारिक भूमिका यांतून ‘स्त्री-जीवनविषयक प्रश्न’ आणि ‘स्त्री-जीवनाची नवी क्षितिजे’ या पुस्तकांची निर्मिती झाली… शतकानुशतके स्थितीमान असलेली भारतीय स्त्री शिक्षणामुळे कसकशी बदलली आणि आता तिच्यापुढे कसे प्रश्न उभे राहिले आहेत ? कोणते? का ? त्यांवर काय उपाय करता येतील? वैयक्तिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या या प्रश्नांचा त्या समग्र आणि सखोल विचार करतात… विचारप्रवर्तक आणि प्रेरणादायी अशीच ही पुस्तके आहेत. ..

त्यांच्या कथांना दर्जेदार म्हणून अनेक नामवंतांनी नावाजले….
वा.ना.देशपांडे यांनी प्रसंगांचा चटकदारपणा चरित्र-चित्रणाचा मार्मिकपणा तंत्रावरील प्रभुत्व व भाषेचे सहज सौंदर्य या त्यांच्या गुणांचा निर्देश केला आहे तर कमलाबाईंनी आपल्या गोष्टींतून स्त्रीहृदय आणि स्त्री-जीवन जास्त समरसतेने रेखाटले आहे असे शांता माडखोलकरांनी म्हटले आहे. त्यांच्या कथांतील चिंतनशीलता हा दुर्मिळ विशेष आहे असे वि.स.खांडेकर यांनी गौरविले आहे…

कमलाबाई यांची विनोदबुद्धी लखलखीत होती. आपल्याला फारसे रूप नाही याची त्यांना जाणीव होती. त्यांची आणि बालगंधर्वांची जन्मतारीख एकच म्हणजे २६ जून तेव्हा त्या थट्टेने म्हणत, “त्या तारखेचे रूपसौंदर्य बालगंधर्वांनी घेतले. माझ्या वाटणीला काही उरलेच नाही.. त्यांची ही वृत्ती, कडू-गोड आठवणी, शिक्षणाने मिळालेली समृद्धी, वैचारिकता, सहृदयतेने स्त्रियांच्या मानसिकतेकडे पाहणे, प्रश्नांच्या सर्व पैलूंना स्पर्श करण्याची परिपक्वता व अंतर्मनाच्या गाभ्याला भिडण्याची क्षमता हे सारे त्यांच्या सर्व तऱ्हांच्या लेखनातून आपल्याला जाणवते…

शुभमंगल सावधान ही कादंबरी लिहिणा-या कमलाबाई विष्णू टिळक यांचे १० जून १९८९ रोजी निधन झाले..

संगीता कुलकर्णी

— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments