Sunday, April 21, 2024
Homeसाहित्यसाहित्य तारका : २७

साहित्य तारका : २७

गीता साने

गीता जनार्दन साने यांच्या बहुतेक कादंबऱ्यांचे विषय हे भारतीय कुटुंबसंस्थेतील दोष, त्यांच्या मर्यादा आणि त्यात स्त्रीच्या होणाऱ्या घुसमटी संदर्भातील होते. स्त्रीच्या अंतःकरणातील स्वातंत्र्याची जाणीव गीता साने यांनी आपल्या कादंबऱ्यांतून सातत्याने प्रकट केल्यामुळे तत्कालीन काळात बंडखोर ठरलेल्या गीता जनार्दन साने यांचा जन्म ३ सप्टेंबर १९०७ रोजी विदर्भातील वाशीम येथे झाला… त्यांच्या वडीलांनी त्यांचे गीता हे नाव भगवद्गीतेवरून ठेवले.

बालपणीच त्यांनी शिक्षणासाठी हिंगणे येथील शाळेत प्रवेश घेतला पुढे अमरावतीमध्येच गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूलमधून मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी नागपूरच्या सायन्स कॉलेजमधून बी.एस्सी व एम.एस्सी. पदव्या प्राप्त केल्या…

हिंगण्याला शिक्षणासाठी असताना तेथे वेगवेगळे विचार, ध्येये त्यांच्या कानांवरून जात असत. स्त्री शिक्षणाचा ध्यास घेतलेली उत्तुंग व्यक्तिमत्त्वे नजरेेस पडत. ह्या सर्वांचा परिणाम कायम गीता साने यांच्या मनावर झाला.त्यांच्याबरोबर 
बाळूताई खरे (मालती बेडेकर) होत्या तर वेणूताई नामजोशी या त्यांच्या मेट्रन होत्या.

गीता सानें यांना वा.म. जोशी यांच्यासारखे शिक्षक लाभले. त्यांनी वा.मं. जोशी यांच्या कादंबऱ्या तेव्हा व पुढे ही वाचल्या. स्त्री-पुरुष यांच्यात निखळ-निर्मळ मैत्री असू शकते हे त्यांच्या मनावर बिंबविण्यात या कादंबऱ्यांचा हातभार होता..

गीता साने यांनी लिहिलेल्या प्रारंभीच्या कथा “धनुर्धारी’, ‘प्रतिभा’ यांसारख्या नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या.
आपले वैरी’ “आविष्कार”– (ही कादंबरी स्वातंत्र्यासाठी झपाटलेल्या क्रांतीविरांवर आधारित), “दीपस्तंभ,” “धुके आणि दहिवर”, “निखळलेली हिरकणी”, “फेरीवाला”, “माळरानात” (राजकीय कादंबरी)” “लतिका” “वठलेला वृक्ष”,
“हिरवळीखाली”अशी त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. तसेच अन्य वैचारिक ग्रंथही प्रसिद्ध आहेत.
त्यांचा “चंबळची दस्युभूमी”’ हा ग्रंथ एक महत्त्वाचे योगदान म्हणता येईल. डाकूंचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणार्‍या चंबळखोर्‍यात भ्रमंती करून व दस्यूंच्या जीवनाची प्रत्यक्ष पाहणी करून त्यासंबंधी आपली निरीक्षणे त्यांनी या ग्रंथात मांडली तर त्यातील ऐतिहासिक, आर्थिक निष्कर्ष ही महत्त्वाचे ठरले.

गीता साने

त्या केवळ ललित लेखनात गुंतून राहिल्या नाहीत तर त्यांनी लिहिलेल्या ‘”भारतीय स्त्री-जीवन’” या ग्रंथात तळागाळातील स्त्री-समाजाच्या वेदनामय जीवनाचा घेतलेला साक्षेपी वेध समाविष्ट झालेला आहे.
त्यांनी आपल्या साहित्यातून त्या वेळच्या कुटुंबसंस्थेतील वैगुण्य, मर्यादा आणि त्याचा स्त्रियांच्या जगण्यावर होणारा परिणाम, स्त्रीमनाच्या व्यथावेदना हे विषय प्रामुख्याने हाताळले होते.याच विषयात त्यांनी पीएचडी प्राप्त केली होती..
“भारतीय स्त्रीजीवन” (२२० पानी पीएच.डी.साठीचा प्रबंध – १९८४ ऑगस्ट १९८६ ला पुस्तकरूपाने प्रकाशित झाला)

गीताबाईंच्या कादंबऱ्यांपेक्षा त्यांच्या या दोन शोधप्रबंधांनी जास्त लक्ष वेधले.. ‘चंबळची दस्युभूमी आणि भारतीय स्त्रीजीवन प्रसिद्ध झाले.या दोहोंनाही महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार लाभले.
शतकानुशतके स्त्रियांच्या वाट्याला आलेली उपेक्षा त्यांच्यापुढे उभ्या राहणार्‍या समस्या व त्यांवरील उपाय यांचा मूलगामी शोध घेण्याचा गीता बाईंचा प्रयत्न त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला विचारवंताची उंची देतो यात शंकाच नाही..

गीता साने यांना राजकारण, समाजकारण यांचे आकर्षण होते तसेच समाजसेवेची ही मनापासून आवड होती. भोवतालचे जीवन डोळसपणे पाहून स्वानुभवावर आधारलेल्या सामाजिक आणि राजकीय कादंबऱ्याही त्यांनी लिहिल्या.
स्त्री-मुक्तीचा परखड भाषेत उदो-उदो करणार्‍या त्या काळातील बंडखोर ठरलेल्या गीता साने यांचे १२ सप्टेंबर १९९१ रोजी निधन झाले.

संगीता कुलकर्णी

— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments