‘एकात्म अशा कथात्म अनुभवाची अर्थपूर्ण् संघटना म्हणजे कथा’ अशी व्याख्या करणा-या कथाकार, कादंबरीकार, प्रवासवर्णनकार, संशोधक, समीक्षक – इंदुमती रामकृष्ण शेवडे यांची आज ओळख करून घेऊया…
मराठी पत्रकार आणि लेखिका असलेल्या इंदुमती शेवडे या माहेरच्या इंदुमती जठार. यांचा जन्म १६ ऑक्टोबर १९१७ रोजी मध्यप्रदेशात झाला.
विदर्भातील पत्रकार व लेखिका असलेल्या इंदुमती शेवडे एक उत्तम चित्रकारही होत्या. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांतील चित्रे त्या स्वतःच काढीत.
मराठी कथेचा उद्गम आणि विकास या विषयावर त्यांनी पी.एच्.डी. केली.. त्याचबरोबर त्यांनी जी. डी. आर्टस् ही कलापदवी प्राप्त केली.
आकाशवाणी नागपूर येथे सहायक कार्यक्रम निर्माता (मराठी भाषण) या पदावरही त्यांनी काम केले.त्यांनी लिहिलेल्या अनेक श्रुतिका नागपूर नभोवाणी केंद्रावर प्रसरित होत असत…
नागपूरच्या ‘तरुण भारत’ या वृत्तपत्रात त्या ‘महिलांचे मनोगत’ हे सदर अनेक वर्षे लिहीत होत्या.
नागपूरहून प्रसिद्ध होणार्या ‘इण्डिपेन्डन्ट’ या साप्ताहिकात त्यांनी उपसंपादक व पत्रकार म्हणून काम केल्यावर प्रथम १९५७ पासून १९६८ पर्यंत त्या आकाशवाणीत व नंतर १९६८ पासून १९७५ पर्यंत लोकसेवा आयोगात मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत होत्या..
बी.बी.सी.च्या प्रशिक्षण वर्गात त्यांचा सहभाग होता. नंतर दिल्ली येथील यु.पी.एस्.सी. च्या मराठी विभागात काम करण्याची संधी त्यांना मिळाली. तेथे त्यांनी नॅशनल बुक ट्रस्ट तर्फे प्रकाशित इंग्रजी पुस्तकांचा मराठीत अनुवाद केला…
इंदुमती शेवडे यांच्या लेखनाला कथेपासून सुरुवात झाली…
त्यांची साहित्य निर्मिती :– “इये साहेबाचिये नगरी”
(प्रवासवर्णन), पु.य. देशपांडे (चरित्र)
“संत कवयित्री” हे स्त्रीमुक्ती चळवळीच्या अभ्यास मालिकेतील पहिले पुस्तक…
या पुस्तकात महदाइसा, मुक्ताबाई, जनाबाई, बहिणाबाई, वेणाबाई या पाच संत कवयित्रींच्या काव्याचा या पुस्तकात वेगळ्या दृष्टीने विचार केलेला आहे. तसेच मिर्झा गालिब कथा एका शायराची— व्यक्तिचित्रण तसेच बंगाली साहित्याच्या आधुनिक युगातील भारतीय ज्ञानपीठ पुरस्कारविजेते, श्रेष्ठ कांदबरीकार कथाकार.
बंदोपाध्याय, ताराशंकर त्यांच्या गणदेवता या गाजलेल्या कादंबरीचे मराठीत इंदुमती शेवडे यांनी गणदेवता या शीर्षकानेच अनुवाद केलेत..
“आम्ही तो बदनाम’” ही गोविंदपंत बुंदेले यांच्या विषयीची चरित्रात्मक कादंबरी,” ‘बाबा नावाचा झंझावात’” हे बाबा आमट्यांच्या जीवनासंबंधीचे कादंबरीरूप चरित्र, “आपका बंटी’ या कादंबर्यांचे अनुवाद… असे त्यांचे विविध स्वरूपाचे लेखन प्रसिद्ध आहे…
लघुकथाविषयक प्रबंधामुळे त्यांच्या एकूणच लेखनाला एक चिकित्सक परिमाण लाभले…मौलिकता प्राप्त अशा या लेखनाचे श्रेय इंदुमती शेवडें यांना दिले जाते…
इंदुमती शेवडे यांच्या घराजवळ मिर्झा गालिब यांची कबर होती. त्यांनी तेथील स्थानिक लोकांकडून गालिब यांची बरीच माहिती मिळवली.. त्या निवृत्तीनंतर उर्दू शिकल्या आणि त्यांनी मराठीत मिर्झा गालिबचे चरित्र लिहिले…
चौथे विदर्भ लेखिका साहित्य संमेलन त्यांचे हस्ते पार पडले…
विदर्भातील पत्रकार व लेखिका असलेल्या इंदुमती शेवडे यांचे १४ मार्च १९९२ रोजी निधन झाले..
— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800