स्नेहलता दसनूरकर
स्त्री जीवनातील सुख-दुःखांचे पट उलगडणाऱ्या कथा-कादंबऱ्यांचे हे विश्व मराठी साहित्यात ज्या लेखिकांनी गेल्या शतकाच्या मध्यावर निर्माण केले त्यातल्या आघाडीच्या लेखिका स्नेहलता दसनूरकर यांची आज ओळख करून घेऊया…
कथाकार, कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि अवंतिका या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या ज्येष्ठ लेखिका स्नेहलता दसनूरकर यांचा जन्म ७ मार्च १९१८ रोजी पुणे येथे झाला.
त्यांचे शिक्षण एम. ए., बी. टी. (मराठी साहित्य विशारद) एम. ए. (हिंदी राष्ट्रभाषा कोविद) इतके झाले. त्यांचा जीवनप्रवास लेखिका-शिक्षिका-प्राध्यापिका-प्राचार्य असा झाला आहे. त्यांनी पुना इंग्लिश स्कूल येथे नोकरी केली व त्या १९५६ साली गारगोटी येथील मौनी विद्यापीठात दाखल झाल्या. त्या विद्यापीठातून १९७८ साली प्राचार्य पदावरून निवृत्त झाल्या.
सेवानिवृत्त झालेल्या स्नेहलता मुंबईत स्थायिक झाल्या. १९७८ ते २००३ या काळात त्यांचे सुमारे ३५ कथासंग्रह प्रकाशित झाले.
साहित्य लेखनाबरोबरच स्नेहलता दसनूरकर यांनी इयत्ता १० वीच्या उच्च मराठी पाठ्यपुस्तकाच्या संपादनाचे काम केले. पत्रव्यवहार प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या हिंदी पुस्तकाचे डी.एड.साठी लेखन ही केले.
१९४५ साली “राणी दुर्गावती”’ हे त्यांचे पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यांचे लेखन ‘स्त्री’, ‘मनोहर’, ‘माहेर’, ‘मेनका’, ‘वसंत’, वाङ्मयशोभा’, लोकसत्ता’ इ. मासिक- साप्ताहिकांच्या दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झाले.त्यांची ५३ कथासंग्रह, ३ कादंबर्या, १ लघुचरित्र, ३ ललित लेख अशी एकूण साठ पुस्तके प्रकाशित असून त्यात ग्रामीण जीवन व सामाजिक प्रश्न यांवरील ४९० कथा व ८१ लेखांचा समावेश आहे.

त्यांच्या काही कथांचे हिंदी, गुजराती, तेलगू भाषांत अनुवाद झाले आहेत.
आशास्थान, जिव्हाळा, प्रपंच अजून यौवनात मी, अश्या अनेक कादंब-या आणि इंद्रधनुष्य, लाखो बायकांत अशी, ओलावा, रुपेरी पश्चिमा, ममता, शुभमंगल, किनारा यांसारखे अनेक कथासंग्रह वाचकप्रिय ठरले.
“दोन भिंती’, ‘रेशमी पदर’ ‘स्नेहकथा”, ‘स्वामिनी’ ‘सुजाता’, ‘मॅटीनी’” ‘प्रतिष्ठा’ ‘भोगशिळा’”,‘अजातशत्रू’, ‘उमर कैद”,’ युगधर्म”, “अवंतिका’” हे त्यांचे गाजलेले कथासंग्रह आहेत.

त्यांच्या अवंतिका या कथेवर आधारीत ‘अवंतिका’ ही दूरदर्शन मालिका प्रचंड गाजली.. तसेच त्यांच्या ‘व्रजदीप’ या कथेवर ‘शापित’ हा मराठी चित्रपट तयार केला आणि त्या चित्रपटाच्या कथेस महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट कथेचा प्रथम पुरस्कार मिळाला .
१९९३ साली ‘मानिनी’ मासिकाने ‘स्नेहलता दसनूरकर विशेषांक’ प्रकाशित करून त्यांचा गौरव केला.
स्नेहलता दसनूरकर यांच्या साहित्यातून सामाजिक बांधीलकीची जपणूक आणि सामाजिक जाणिवांचे दर्शन होते.
गारगोटी येथे प्रदीर्घ काळ वास्तव्य आणि अध्यापन करणार्या स्नेहलताताईंनी नेत्रोपचार शिबिरे, कुटुंब नियोजन शिबिरे, साक्षरता प्रसार यांच्या माध्यमांतून समाजसेवा केली.
त्यांच्या या साहित्य कामगिरीमुळे अविरत झरणारी लेखणी ३ जुलै २००३ रोजी नि:शब्द झाली.

— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800