Saturday, July 27, 2024
Homeसाहित्यसाहित्य तारका : ३३

साहित्य तारका : ३३

योगिनी जोगळेकर

हरीची ऐकताच मुरली सारखं सुंदर गीत लिहिणा-या आणि पन्नास कादंबर्‍या व चाळीस कथासंग्रह एवढी विपुल साहित्यनिर्मिती करणा-या सिद्धहस्त लेखिका, गायिका, कवयित्री, कादंबरीकार, कथाकार, नाटककार योगिनी विश्वनाथ जोगळेकर यांचा जन्म ६ ऑगस्ट १९२५ रोजी पुणे येथे झाला. त्यांचे शिक्षण पुण्याच्या हुजूरपागा शाळेत मॅट्रिकपर्यंत झाले. 

१९४८ ते १९५३ या काळात पुण्यातील सरस्वती मंदिरात त्यांनी शिक्षिका म्हणून काम केले..राष्ट्रसेविका समितीच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्षे सामाजिक कार्यही केले.
संस्कृत आणि मराठी घेऊन त्या स.प. महाविद्यालयातून बी.ए.ला पहिल्या आल्या. त्या वेळी त्यांना ‘यशोदा चिंतामणी’, ‘कुसुम वाघ’, ‘विंझे’ ही तीन मानाची पारितोषिके मिळाली. तर महाविद्यालयात असताना तंबोरा बक्षीस म्हणून मिळाले..

बालवयातच म्हणजे वयाच्या आठव्या वर्षी त्यांची काव्य प्रतिभा बहरू लागली आणि वयाच्या आठव्या वर्षापासूनच त्या शंकरबुवा अष्टेकर यांच्याकडे संगीत शिकल्या व त्यानंतर त्यांनी पं. राम मराठे यांचे शिष्यत्व पत्करले..

त्यांची पहिली कविता शाळेच्या “बालिका-दर्शन” मध्ये छापून आली तर शालेय जीवनात “निशिकांतची नवरी’” ह्या नाटकात त्यांनी भूमिका केली. त्यावेळी गणपतराव बोडस, पेंढारकर या दिग्गजांचे त्यांना मार्गदर्शन लाभले…!

त्यांनी लिहीलेला पहिला कथासंग्रह ‘”झुंजूमूंजु”’ हा आईला आणि वडिलांना अर्पण केला कारण तेच त्याचे पहिले वाचक आणि समीक्षक…!
त्यांचे ‘उलट-सुलट’, ‘श्रावण’, ‘शर्यत’, ‘प्रतीक’, ‘ओटी’, ‘प्राची’, ‘उर्मी’, ‘पाझर’, ‘शिलगंण’, ‘आविष्कार’, ‘देणगी’, ‘उपहार’, ‘जाण’, ‘मौन’, ‘अप्रूप’ इत्यादी कथासंग्रह विशेष उल्लेखनीय… तर “वादळफूल’, ‘नादब्रह्म’, ‘प्राजक्ता’, द्विदल’, ‘हार-जीत’, ‘पूर्ती’, ‘कसरत’, ‘तिढा’, ‘झुला’, ‘शह’, ‘कुणासाठी कुणीतरी’, ‘बावन्नकशी’, ‘चढ-उतार’, ‘निरागस’, ‘घरोघरी’, सांगाती’
“सोनसाफ” अश्वत्थ इत्यादी कादंबर्‍या लक्षणीय.

त्यांचे ‘रिमझिम’, ‘सूरगंधा’, ‘आंबट-चिंबट’, ‘आलापिनी’ हे चार कवितासंग्रह आणि ‘गुरुशिष्य’, ‘तिळगुळ’, ‘खंडू खोडसाळे’, ‘फुलांचे झेले’, ‘वाकडी काकडी” इ. कुमार वाङ्मयमय प्रसिद्ध..
इतकच नाही तर “मागील दार’, ‘तिसरी घंटा’, ‘तिघांच्या तीन तर्‍हा’, ‘रंगात रंगला श्रीरंग’ ही नाटके ही तसेच “मधुर स्वरलहरी या”, “सखे बाई सांगते मी”, ” हरीची ऐकताच मुरली”, ” हे सागरा नीलांबरा” ही त्यांनी लिहिलेली गीते सुद्धा प्रसिद्ध आहेत..

पंडित भास्करबुवा बखले यांच्या जीवनावर ” या सम हा” आणि राम मराठे यांच्या जीवनावर ” राम प्रहर ” या चरित्रांचे त्यांचे हे लेखन वेगळे ठरले हे विशेष… राम मराठे यांच्या जीवनावर ” राम प्रहर ” या चरित्राचे लेखन करून गुरूला जणू आदरांजलीच वाहिली होती…

एका खासगी कथाकथन कार्यक्रमात ‘शिलांगण’ ही कथा ऐकताना प्रसिद्ध लेखक पु.भा.भावे यांचे डोळे ओलावले तर ‘”नन्या आईसफ्रुटवाला”’ या कथेसाठी आचार्य अत्रे यांनी त्यांची पाठ थोपटली…

आकाशवाणी व खाजगी बैठकीबरोबरच त्यांनी “पहिली मंगळागौर” या चित्रपटासाठी पार्श्वगायन केले तसेच आकाशवाणी वरील गीतरामायणाच्या प्रथम प्रसारणात “विरूप झाली शूर्पणखा, ही दाशरथीची कृति सूड घे त्याचा लंकापति” हे गाणं त्यांनी गायले होते..
एच.एम.व्हीने त्यांच्या ध्वनिमुद्रिका काढल्या. सर्व केंद्रांतून आणि भारताच्या सर्व संगीत मंडळांतून त्या गाऊ लागल्या.

‘रंगात रंगला श्रीरंग’ या संगीत नाटकाच्या रौप्यमहोत्सवी प्रयोगाचे वेळी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात संगीत दिग्दर्शक केशवराव भोळे त्यांचा गौरव करताना म्हणाले की “उद्याची मोठी स्त्री- नाटककार होशील.”

योगिनीबाईं यांचा मूळचा पिंड साहित्यात रमणारा होता. त्यांनी विपुल साहित्य-सेवा केली… त्यांचे लेखन बहुढंगी असले तरी प्रामुख्याने कुटुंब व कुटुंबातील नाते-संबंधांतील ताण-तणाव, संघर्ष यांना वेढून असणारे होते त्यामुळे त्याला अतिशय लोकप्रियता लाभली. त्यांचे लेखन वाचकांना आपले आणि जिव्हाळ्याचे वाटले..

त्यांच्या कादंबर्‍यातील व्यक्तिरेखांनी जीवनसंघर्ष करायला अनेकांना उद्युक्त केले तर कोणाला जीवन जगायला शिकवले… त्यांच्या कथा-कादंबर्‍या या मध्यमवर्गीय कुटुंबाच्या वळणाच्या त्यामुळे बदलत्या उच्चभ्रू वर्गाच्या पैसा केंद्री समाजव्यवस्थेविरुद्ध त्या अत्यंत तीव्रतेने विरोध दर्शवितात.. त्यांच्या कथेत सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तींचा संघर्ष दिसतो. बहुतेक कथांतील स्त्रिया सोशिक, सात्त्विक, प्रेमळ व भाबड्या, हसतमुख आणि त्यागमूर्ती दिसतात. त्यांच्यातील कवयित्रीचे प्रतिबिंब त्यांच्या कथा-कादंबर्‍यांतून दिसून येते. काही कथांमध्ये तर त्यांनी कविताही लिहिल्या आहेत. त्यांच्या काव्यात्मवृत्तीचा मनोहर आविष्कार कथांतून झालेला आढळतो…

डॉ.भालेराव स्मृती पुरस्कार (मुंबई मराठी साहित्यसंघ), अमृत महोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – स्त्री-लेखिका पुरस्कार हे त्यांना मिळालेले महत्त्वाचे पुरस्कार..

साहित्यकल्प योगिनी जोगळेकर यांचे १ नोव्हेंबर २००५ रोजी निधन झाले.. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी त्यांच्या कवितेच्या दोन सुंदर ओळी संगमरवरात लिहिल्या आहेत त्या ओळी त्यांचे अजरामर स्मारकच म्हणावे लागेल…

संगीता कुलकर्णी

— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८