Saturday, July 27, 2024
Homeसाहित्यसाहित्य तारका : ३४

साहित्य तारका : ३४

कमल देसाई

मराठी साहित्य विश्वाला वेगळी दिशा देणाऱ्या ज्येष्ठ कथा, कादंबरीकार, लेखिका आणि साहित्याच्या अभ्यासक, आपल्या प्रयोगशील लिखाणाने मराठी साहित्यात वेगळे स्थान निर्माण करणा-या कमल देसाई यांची आज ओळख करून घेऊया…

प्रयोगशील लेखिका कमल देसाई यांचा जन्म कर्नाटकातील यमकनमर्डी (जिल्हा बेळगाव) या गावात १० नोव्हेंबर १९२८ रोजी झाला. त्यांचे बालपण मिरजेत गेले व सुरुवातीचे शिक्षणही तिथेच झाले. पुढे त्या एम.ए.च्या शिक्षणासाठी मुंबईत आल्या. त्यांचे इंग्रजी भाषा आणि साहित्यावरील अलोट प्रेम होते तरीही त्यांनी मराठी विषय घेऊन मुंबई विद्यापीठातून एम.ए केले. एम.ए.ला असतानाच त्यांनी कथालेखनाला सुरुवात केली आणि त्यांच्या कथा सत्यकथेत छापून यायला लागल्या. शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी धुळे,अहमदाबाद, निपाणी, भिवंडी, कागल अशा अनेक ठिकाणी मराठीचे अध्यापन केले पण त्या कुठेच स्थिर झाल्या नाहीत. साहित्य, तत्त्वज्ञान, भाषाविज्ञान, मानसशास्त्र, पर्यावरण, सौंदर्यशास्त्र हे त्यांचे अभ्यासचिंतनाचे विषय होते.

साठ-सत्तरच्या दशकांमध्ये ‘सत्यकथा’ मासिकामधून पुढे आलेल्या आधुनिक जाणिवेच्या लेखक-लेखिकांमध्ये कमल देसाईं यांची गणना होते.

१९६२ मध्ये त्यांचा ‘रंग-१’ हा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला. या कथासंग्रहातील ‘तिळा बंद’ या कथेने इतिहास निर्माण केला. त्यानंतरच्या त्यांच्या कथा विविध नियतकालिकांतील ‘”रंग २”‘ नावाने प्रसिध्द झाल्या. त्यानंतर १९७५ मध्ये ‘”काळासूर्य’ आणि “‘हॅट घालणारी बाई'” ही जोड कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीला मोठी लोकप्रियता मिळाली. याच कादंबरीचा सुखमनी रॉय यांनी इंग्रजी अनुवाद केला.

“हॅट घालणारी बाई” या कथासंग्रहात स्त्रीने टोपीचा लहरी प्रतीक म्हणून केलेला वापर त्यांच्या सर्जनशील अभिव्यक्तीचा प्रत्यय देते. तर त्यांनी वंदना शिवा यांच्या “‘स्टोलन हार्वेस्ट”‘ या ग्रंथाचे ‘”लुबाडलेले शेत'” नावाने तर बर्नर्ड बोंझाकिट यांच्या “‘थ्री लेक्‍चर्स ऑन ऍस्थेटिक्स'” या पुस्तकाचा “सौंदर्यशास्त्रा वरील तीन व्याख्याने”‘ या नावाने अनुवाद केला. त्याचबरोबर त्यांचे इतर साहित्य संपादन- बर्नर्ड बोझांकिटच्या ‘थ्री लेक्चर्स ऑन एस्थेटिक’ या ग्रंथाचा मराठी अनुवाद, किरण नगरकर यांच्या ‘द ककल्ड’ (मराठी अनुवाद प्रतिस्पर्धी) या कादंबरीला त्यांनी लिहिलेली प्रस्तावना तर प्रसिद्ध चित्रकार पॉल गोगॅच्या ‘ओल्ड गोल्ड ऑन देअर बॉडी’ या पुस्तकाच्या प्रभाकर कोलते यांनी केलेल्या अनुवादाला लिहिलेली प्रस्तावना.

त्यांच्या काही कथांचे जर्मनी आणि अन्य भाषांत अनुवाद झाले आहेत. “रात्रंदिन आम्हा युद्घाचा प्रसंग”‘ या त्यांच्या लघुकादंबरीलाही साहित्य विश्वात गौरवण्यात आले.
आशिया खंडातील स्त्रीवादी साहित्यातून निवडलेली ही कथा अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ इलीनॉय इथे अभ्यासक्रमासाठी लावली आहे.

कमल देसाईं यांच्या कथांमधील बोलकी स्त्री पात्रे हे त्यांच्या लेखनाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. देव, धर्म आणि एकूण विश्व या विषयावर प्रामुख्याने त्यांनी लेखन केले. तसेच स्पष्ट स्त्रीवादी दृष्टीकोन आणि धर्म व लैंगिकता यांसारख्या पुरुषी वर्चस्व असलेल्या संकल्पनांवर ही त्यांनी व्यंगात्मक लिखाण केले.

कमल देसाईं यांनी अत्यंत मोजकेच लेखन केले. अतिभौतिकीय, सनातन स्वरूपाच्या प्रश्नांचे भान, अमूर्त तत्त्वचिंतनात्मक वृत्ती, नेणिवेतील धूसरता, अनुभवातील व्यामिश्रता व संज्ञाप्रवाही शैली या साऱ्या विशेषांमुळे कमल देसाई यांचे कादंबरीविश्व अजोड वाटते. तसेच त्यांच्या लेखनशैलीत गोळीबंदपणा नव्हता त्यामुळेच तर त्यांची लेखन शैली मुलखावेगळी वाटते. प्रतिके आणि प्रतिमांची अर्थवाही लेखनशैली त्यांचे वेगळेपण दाखवणारी ठरली. त्यांच्या साहित्यातील स्त्री मनाचा आलेख पुढे अनेक लेखिका आणि साहित्यिकांना मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरला. अत्यंत असाधारण आणि अपूर्व स्वरूपाच्या प्रतिभेतून त्यांनी मराठी साहित्यात अनवट स्वरूपाची वेगळी वाट निर्माण केली हे त्यांचे योगदान म्हणता येईल.
कोणत्याही प्रकारची तडजोड न करता प्रखरपणे स्वत:ची तत्त्वनिष्ठा, आत्मनिष्ठा आणि ज्ञाननिष्ठा जपणाऱ्या लेखिका म्हणून कमल देसाईं यांचा आदरपूर्वक आणि कृतज्ञापूर्वक उल्लेख करता येईल.

महाराष्ट्र सरकारच्या साहित्य व सांस्कृतिक मंडळाने त्यांना “गौरववृत्ती”‘ प्रदान केली. त्याचबरोबर मुंबई येथील कुसुमताई चौधरी महिला कल्याणी ट्रस्टतर्फेही त्यांना ‘”गौरववृत्ती”‘ ने सन्मानित करण्यात आले.mसाहित्य, चित्रकला, सांस्कृतिक क्षेत्रांतील नव्या पिढीशी त्यांचा सतत संवाद असे. त्यांचा सार्वजनिक वावर शेवटपर्यंत कायम होता.
सुमित्रा भावे यांच्या “एक कप चहा'” या प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटातील त्यांची भूमिकाही खूप गाजली.
१७ जून २०११ रोजी त्यांचे निधन झाले. कमल देसाई यांच्या निधनाने मराठी साहित्यातील एका फॅण्टसीलाच पूर्णविराम मिळाला.

संगीता कुलकर्णी

— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments