वसुधा पाटील
१९६० नंतर आशय व अभिव्यक्ती या दोन्ही दृष्टींनी मराठी कथेला जी नवी परिमाणे मिळाली ती मिळवून देण्यात पुरुष कथाकारां इतका कथा लेखिकांचा वाटा मोठा आहे. कमल देसाई, विजया राजाध्यक्ष, सरिता पदकी, तारा वनारसे, वसुधा पाटील अशा काही लेखिकांची नावे या संदर्भात सहज नजरेत भरतात.
कौटुंबिक व सामान्यतः हाताळल्या जाणार्या विषयांच्या पलीकडे जाऊन जीवनाच्या विविधांगी समस्यांचा भावस्पर्शी वेध घेणा-या लेखिका म्हणून व मराठी साहित्यात आपले स्वत:चे स्थान निर्माण करणा-या वसुधा पद्माकर पाटील ओळखल्या जातात.
नाटक व एकांकिका या साहित्यप्रकारांत स्त्रियांनी विशेष लेखन केले नसल्याने या क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या लेखिका वसुधा पद्माकर पाटील यांचा जन्म १५ डिसेंबर १९३० रोजी मुंबईत झाला.त्यांचे इयत्ता तिसरीपर्यंतचे शिक्षण गोरेगावच्या अ.भि. गोरेगावकर हायस्कूल मध्ये ,चौथीपर्यंतचे शिक्षण म्युनिसिपल शाळेत तर चौथीपासून सातवीपर्यंतचे शिक्षण पार्ले येथे पार्ले टिळक विद्यालयात झाले.
मॅट्रिकला असताना त्या शाळेत पहिल्या आल्या. मुंबईच्या नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठातून एम.ए., बी.एड. झाल्या. बी.ए.ला त्यांचे विषय इतिहास व मराठी तर एम.ए. बी.एडसाठी पेंटिंग हा विषय त्यांनी घेतला तसेच जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून त्यांनी आर्ट मास्टर पदवी ही संपादन केली.
१९४८ साली मॅट्रिक होताच त्या अ.भि.गोरेगावकर हायस्कूलमध्ये शिक्षिका झाल्या.अ. भि. गोरेगावकर स्कूलच्या त्या विद्यार्थिनी आणि त्याच शाळेच्या त्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका होत्या. नोकरी करीत असतानाच त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले. विपुल वाचनातून त्यांना लेखनाची प्रेरणा मिळत राहिली व त्यांची पहिली कथा वसुधा या मासिकात तर १९६६ च्या सुमारास त्यांची पहिली एकांकिका सत्यकथा या मासिकात प्रसिद्ध झाली..
लेखना बरोबरच चित्र काढण्याचा स्वतःच्या कलागुणांनाही त्यांनी फुलवले. त्या उत्तम कथाकथनही करत असत. इतकेच नाही तर त्यांनी तरुणपणी नाटकात अभिनयही केला होता.
उत्तम कथाकथन करणाऱ्या वसुधा पाटील यांनी एकांकिकांमधून ही कामे केली. त्यांच्या काही एकांकिका आकाशवाणी, तसेच दूरदर्शनवरही प्रक्षेपित झाल्या आहेत. वसुधाताई यांनी विपुल लेखन केले.”‘आक्की’, ‘उडालेले रंग’, ‘मूर्तिकार’, ‘करपलेली पालवी’, ‘भवरीमाय’, ‘अखेरच्या क्षणी’, ‘बसंती’, ‘जमुना के तीर’, ‘प्राक्तन’, ‘मालवून टाक दीप’, ‘अगतिक’, ‘पक्षितीर्थ’, ‘गुलाम आणि इतर कथा’, ‘दीपगृह आणि समुद्रपक्षी’ सारीपाट’, ‘भेट’, ‘अश्रद्धा’, ‘उडालेले रंग’, ‘पुरुष’, ‘सनई’, हाडवैरी’, “शर्वरी’, ‘आक्की’, ‘अमृता’, ‘पंथ’, ‘नामर्द’ इ. ही त्यांची काही पुस्तके प्रसिद्ध तर “महाभारत”, “पियानो व इतर एकांकिका’” इत्यादींचा समावेश आहे.
“युद्धभूमी” या विषयावर आधारित त्यांच्या एकांकिकेला बक्षीस मिळाले होते व श्री.वि.द घाटे यांनी त्यांचे कौतुकही केले होते. साचेबंद, ठराविक नसणार्या विषयांची नाट्यमय मांडणी, पकड घेणारे संवाद व उत्कृष्ट वातावरणनिर्मिती ही त्यांच्या एकांकिका- लेखनाची वैशिष्ट्ये होत. ‘सरहद्द’, ‘उत्खनन’ या एकांकिका व ‘वृद्धाश्रम’ हे नाटक रंगभूमीवर गाजले.त्याचबरोबर त्यांचे बालसाहित्यही प्रसिद्ध आहे.
मराठी दूरदर्शनवर एक तासाची पहिली रंगीत कथा लिहिण्याचा मान वसुधा ताईंना मिळाला आहे.
वसुधाताईंच्या “‘जमुना के तीर’”,, ‘वंशाचा दिवा” आणि ‘”वेगळी”’ या तीन कथासंग्रहांना तसेच ‘”पक्षितीर्थ’”,, “‘दीपगृह’, “‘समुद्रपक्षी’” या एकांकिका संग्रहांना महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट साहित्य निर्मितीचे पुरस्कार तसेच तीन राज्य पुरस्कार आणि उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठीचे चार पुरस्कार मिळाले आहेत.
रोजच्या जगण्यातील नाट्य टिपणारी कथानके, व्यक्तिरेखांचा नातेसंबंध, स्वभावधर्मानुसार होणारा त्यांचा विकास ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये.
उत्तम चित्रे काढणाऱ्या आणि रसाळ गायन करणाऱ्या वसुधाताई यांनी विद्यार्थी घडविले इतकच नाही तर मुलांना वाचनाची गोडी लागावी नी शब्दसंग्रह वाढवा तसेच लेखनाच्या क्षमता विकसित व्हाव्यात यासाठी ही त्यांनी प्रयत्न केले.मराठी आणि चित्रकला या विषयांची कलात्मक जाण त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. मुलांच्या स्वतंत्र अभिव्यक्तिला त्यांनी कायम महत्त्व दिले. रसाळ आणि ओघवत्या वाणीने विद्यार्थ्यांना गुंग करण्याच्या त्यांच्या शैलीची आठवण अनेक जण सांगतात.
कथा आणि एकांकिका दोन्ही ताकदीने लिहिणाऱ्या लेखिका दुर्मिळ असे नरहर कुरुंदकर म्हणत.त्या अशा दुर्मीळांपैकी एक होत्या.त्यांनी अखेरपर्यंत आपला लेखन आणि वाचनाचा व्यासंग जोपासला.
कथा आणि एकांकिका हे दोन्ही वाङ्मयमयप्रकार सारख्याच ताकदीने हाताळणा-या लेखिका वसुधाताई यांनी मे २०२० मध्ये विराम घेतला..
— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800