विजया जहागीरदार
सोलापुरातील ज्येष्ठ लेखिका आणि विसाव्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा, विविध विषयावर अधिक काळ लेखन करणा-या विजया जहागीरदार यांचा जन्म १२ सप्टेंबर १९३२ रोजी इंदौर येथे झाला. कवयित्री म्हणून त्यांनी मराठी साहित्यात मोलाचे योगदान दिले आहे.
विविध वृत्तपत्रात स्तंभलेखन करणा-या विजया जहागीरदार यांचे आकाश मोगरा, स्त्री नक्षत्र, रातवा, गीत गीता, कल्पवृक्षाची फळे, गीत मेघदूत–शाकुंतल हे काव्यसंग्रह गाजले.
कर्मयोगिनी, रणयोगिनी, ययातिकन्या माधवी, मनगुंफा, आत्मसाक्षी, अर्धविराम, नियंती, उद्रेक, टाचलेलं फुलपाखरू, वास्तु – जुई, रिंगणभूल या त्यांच्या कादंबऱ्या तर केसरपक्षी, वेंधळी, अग्निक्षण, कालचक्र, शापित गुलमोहर, निवडुंगाचा मोहर, तिने काय करावे ? बिनपानांची झाडं हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत.
बालसाहित्यातील त्यांचे योगदानही फार मोलाचे आहे. सुगंध, भिरभिरं, टीम टिम टिकली, निर्मळ कहाण्या मोहराचं झाड, एकदा असं झालं आणि इतर कथा हे सर्व बालकथासंग्रह ही प्रसिद्ध आहेत.
लहान मुलांसाठी विजया ताई यांनी अनेक कविता लिहिल्या. यामध्ये फुलबाजा, फजितवाडा, मखमली झुला, छुम छुम गाणी, खडीसाखरेचे वेल, जा बै आई, डिंग डिंग डिंगांग असे कवितासंग्रह बालवाचकांना भुरळ पाडून गेले.
विजया जहागीरदार यांची “अशी सांज का, दे मनास शक्ति दे, माझे मलाच आता जगणे ही गीते ही प्रसिद्ध आहेत.
त्यांनी केलेल्या विपुल बालसाहित्याची दखल घेऊन त्यांची सोलापूर येथे झालेल्या विसाव्या अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली..
बालकुमार साहित्य मंच या संस्थेच्या त्या अध्यक्षा होत्या.
त्यांची एक बालकविता—-
अस्से कसे असते हो, मोठ्यांचे वागणे ?
एकदा एक बोलणे, अन् एकदा एक बोलणे ?
अभ्यास केला तर म्हणतात, ‘पुस्तकातला किडा’
खेळायला गेलो की म्हणतात, ‘परीक्षेत रडा’
लौकर उठलो तर म्हणतील ‘नीज अजून थोडा’
उशिरा उठलो तर लागलीच ‘पसरलाय घोडा’ || १ ||
असे कसे असते हो…
एकदा सांगतील ‘बाबानो, खरं खरं बोला’
खर सांगताच म्हणतील, ‘निर्लज्ज मेला’
काम केले तर लागलीच ‘चंदू हुशार झाला’
चुकले जरा कुठे तर मग ‘चंदू’वाया गेला’ || २||
असे कसे असते हो….
एकदा म्हणायचे ‘जरा दया करायला शीक’
केली की म्हणायचे ‘बाबा, लावशील मला भीक’,
मी कुणाला ठोकून काढले, की मीच ठरतो चिडकट
मला कोणी मारले तरी मीच पुन्हा शेळपट || ३ ||
असे कसे असते हो….
सांगतो तसे दाखले मी मित्रांच्या घरचे
वस्सकन म्हणतील’ नको सांगु कौतुक दुसर्यांचे’
शेजारच्या बाळूचा मात्र पुळका सारखा सारखा
मला आपले म्हणत राहायचे ‘त्याचे जरा शेण खा ‘|| ४l|
असे कसे असते हो….
धीटपणे बोलताच म्हणतील चुरूचुरू करतय तोंड
गप्प बसावे तर लागलीच ‘लाजरच आहे सोंग’
कधी आजारी पडलो तर तेंव्हा मात्र म्हणतात
चंदू आमचा गुणाचा हो ‘तेवढच खर बोलतात || ५||
असे कसे असते हो….
— सौ विजया जहागीरदार
विजया जहागीरदार यांची एकूण ५४ पुस्तके – ११ कादंब-या, ९ कथासंग्रह, ३ लेखसंग्रह, ३ कथाचरित्रे, ६ काव्यसंग्रह, ३ नाटके आणि २३ बालसाहित्य आहे.
त्यांच्या लेखनास तेरा पुरस्कार मिळाले असून “कर्मयोगिनी'” या पुस्तकाला मध्यप्रदेश साहित्य अकादमीचा भा.रा. तांबे पुरस्कार लाभला..
अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावरील कादंबरी याच्या सहा आवृत्त्या प्रकाशित झाल्या असून सौ. संगीता सोमण यांनी त्याचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले आहे. तर “‘लपाछपी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार..”हिरकण्या’ व ‘भिरभिरं’ या त्यांच्या साहित्यकृतीनांही महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार लाभले.
तसेच अनेक फीचर्स व स्तंभलेखन, ‘कर्मयोगिनी’ या पुस्तकावर रंगमंचीय कार्यक्रम– ‘गाथा कर्मयोगिनीची’, “आकाशमोगरा”’ ही ध्वनिफीत तर आरोग्य खाते, धुळे यांच्यातर्फे चित्रफीत. साहित्य संमेलने आणि काव्यसंमेलनांत सहभाग.
तसेच त्यांनी मनोरंजक विज्ञान या विषयावर देखील विपुल लेखन केले. शिवाय त्यांच्या ययातिकन्या माधवी आणि काव्य कोडी या पुस्तकाचे वाचन मुंबई आकाशवाणीवर झाले.
विविध विषयांवर अधिक काळ लेखन करणा-या विजया जहागीरदार यांचे १ एप्रिल २०२० रोजी निधन झाले…
— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
गौरवशाली बालसाहित्य कांदबरी कविता लेख
व त्याची ओळख
धन्यवाद
गोविंद पाटील सर जळगाव जिल्हा जळगाव