Tuesday, July 23, 2024
Homeलेखसाहित्य तारका : ३८

साहित्य तारका : ३८

गिरिजा कीर

साहित्याच्या प्रांतात लेखन करणाऱ्या महिलांचे स्थान पक्के करण्यात गिरिजा कीर यांच्या लेखन कारकीर्दीचा मोठा वाटा आहे. केवळ लोकप्रियतेच्या मागे न लागता, मनातले आणि भावणारेच लेखन करणे हे त्यांनी आपले व्रत मानले होते.

विभावरी शिरुरकर यांच्या सारख्या वेगळ्या धाटणीच्या लेखनाने निर्माण केलेल्या हलकल्लोळानंतरच्या काळात गिरिजा कीर, सुमती क्षेत्रमाडे, कुसुम अभ्यंकर यांच्यासारख्या स्त्री लेखकांची एक नवी फळीच उभी राहिली. त्यातही गिरिजाताईं यांनी विषयांचे वैविध्य, वेगवेगळे साहित्य प्रकार यामुळे आपले आगळे स्थान निर्माण केले. 

एका वेगळ्या वाटेने जाणाऱ्या स्त्रीलेखनाची वाट चोखाळणाऱ्या गिरिजा कीर यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९३३ रोजी धारवाड (कर्नाटक) येथे झाला. गिरिजा कीर या माहेरच्या रमा नारायणराव मुदवेडकर. 
मुंबई विद्यापीठाची बी. ए.ची पदवी मिळविल्यानंतर गिरिजाबाईंच्या लेखनाला सुरुवात झाली. किर्लोस्कर, माहेर, मानिनी, प्रपंच, ललना इ. मासिकातून त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या.

१९६८ ते १९७८ या काळात त्यांनी अनुराधा मासिकाची साहाय्यक संपादिका म्हणूनही काम केले. हे काम करीत असताना सामाजिक प्रश्नांसंबंधीच्या प्रेमापोटी कामगार वस्ती, कुष्ठरोग्यांची वस्ती आणि आदिवासी भागात जाऊन त्यांनी त्यांच्या जीवनाचा जवळून अभ्यास केला व त्यांनी त्यांचे पुष्कळसे लिखाण या अनुभवांतूनच लिहिले आहे. कुष्ठरोगी, आदिवासी यांच्या आयुष्यात डोकावून पाहण्याच्या त्यांच्या ऊर्मीतून त्यांचे लेखन फुलले. आदिवासी मुलांसाठी सुरू असलेल्या शैक्षणिक प्रकल्पात त्यांनी १६ वर्षे काम केले.
त्यांनी साहित्यातील विविध प्रकारांत सातत्याने लेखन केले. ललित लेखन, कथा, कादंबरी यांसारख्या आकृतिबंधात विपुल लेखन केले. त्यामुळे महाराष्ट्रातील सांस्कृतिक पटलावर त्यांची स्वतंत्र अशी ओळख निर्माण झाली.

कादंबऱ्या, कथा, आत्मकथन, चिंतन, प्रवासवर्णन यांसारख्या सगळ्या प्रकारांमध्ये चौफेर मुशाफिरी केलेल्या गिरिजाताईंनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी कथाकथनाचे कार्यक्रम केले. गिरिजा कीर यांची कथाकथनाची शैली ही अंतर्मुख करणारी आणि खिळवून ठेवणारी होती.
स्त्री-लेखकाचे कथाकथन ही त्या काळात वेगळी सामाजिक जाणीव निर्माण करणारी घटना होती. गिरिजा कीर यांनी लक्षपूर्वक आपला हा गुणही जोपासला .
गिरिजाघर, देवकुमार, चांदण्याचं झाड, चंद्रलिंपी, चक्रवेध, स्वप्नात चंद्र ज्याच्या, आभाळमाया, आत्मभान, झपाटलेला
सगळ काही तिच्याबद्दल,आकाशवेध, वादळवाट, दवबिंदू, ओंजळीतल पसायदान, अक्षर लावण्य, कथाजागर इ.अनेक पुस्तके प्रकाशित झाली. वेताळनगरी आणि साहसी हेमचंद्र’, ‘परीकथांच्या तोंडवळ्याची कथा’, ‘चंद्रावर सफर’, ‘उंटा उंटा कवडी दे’ ‘खूप खूप गोष्टी’, ‘देणारे हात’, ‘साहसकथा’, ‘शूरांच्या कथा,’ ‘नीलाराणीचा दरबार’, ‘कुमारांच्या कथा’ इ. कुमार साहित्य प्रसिद्ध तर “झालाच पाहिजे व इतर नाटिका’, ‘ए बम्बै की राणी देखो आणि इतर नाटिका’ ही नाटिकांची पुस्तकेही त्यांची प्रसिद्ध आहेत.त्याचप्रमाणे ‘तसूभर जमीन मनभर आकाश’ हेही प्रवास वर्णनावर आधारित पुस्तक लक्षवेधी आहे.
गाभाऱ्यातील माणसं, (या पुस्तकातील व्यक्तिचित्रे कथात्मक आहे), जगावेगळी माणसं, कलावंत साहित्य सहवास ही त्यांची व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके ही प्रसिद्ध आहेत.

येरवडा तुरुंगातील कैद्यांवर संशोधन करून त्यांनी लिहिलेले ‘”जन्मठेप”’ हे पुस्तक त्यांच्या या वेगळेपणाची साक्ष आहे. या
पुस्तकाकरिता त्यांनी येरवडा कारागृहातील कैद्यांवर ६ वर्ष संशोधन केलं होतं.सुमारे १२ वर्षे त्यांनी जन्मठेपेची शिक्षा भोगणा-या कैद्यांशी सुसंवाद साधला व त्यांचे समुपदेशन केले. त्या अनुभवांवर आधारित ‘जन्मठेप’ या पुस्तकाचे त्यांनी लिखाण केले. त्यांचे हे कैदी जीवनावरील लिखाण तर निश्चितच त्यांना इतरांपेक्षा वेगळे नेऊन ठेवते.जन्मठेप या पुस्तकास पुण्याच्या ग्रंथोतेज्जक संस्थेचा पुरस्कार लाभला.

रंजन व प्रबोधनपर लेखन करताना गिरिजाताईंनी चरित्रपर पुस्तकात ‘देवी अहल्याबाई होळकर, राजा राममोहन रॉय, महात्मा जोतिबा फुले’ इत्यादी समाजकार्य- कर्तृत्व असलेल्यांचा आलेख गोष्टीरूपातून मांडला. तर “अनोळखी ओळख” या पुस्तकात त्यांनी अनुताई वाघ यांचे हृद्य चित्रण रेखाटले. त्याचप्रमाणे “‘डायरेक्टर जनरल ऑफ पोलिस’” सूर्यकांत जोग तसेच जेलर जे.एस.कुर्डुकर यांचे काम जाणून घेऊन त्यांच्या कार्यकुशलतेचे समग्र व्यक्तिमत्त्वाचे चित्रण या पुस्तकात केले.त्यांच्या लेखनातील एक वेगळा पैलू म्हणजे त्यांनी संत साहित्याकडेही वाचकांचे लक्ष वेधले. ‘”संत गाडगेबाबांचे चरित्र”’ आणि ‘”२६ वर्षांनंतर’” हे त्यांचे आध्यात्मिक लेखनही प्रसिद्ध आहे. हिंदी, इंग्रजी, गुजराथी, कानडी आदी भाषांमध्ये त्यांच्या कथांचे भाषांतर झालेले आहे.

ज्या काळात ‘जादूची सतरंजी’, ‘राक्षसांचे युद्ध’ अशांसारख्या पुस्तकांवरच लहान वयातील मुलांचे पोषण होत होते त्या काळात गिरिजा कीर यांनी मात्र जाणीवपूर्वक बालसाहित्याकडे लक्ष दिले.गिरिजा बाईंनी बालकांसाठी लक्षणीय साहित्य निर्मिती केली. त्यांनी नऊ ते बारा वर्षे वयोगटासाठी आणि खास बालवर्गासाठी सुमारे पाच ते नऊ वर्षे नाटिका लिहिल्या. बालकांचे वय लक्षात घेऊन त्यांनी साध्या सोप्या व जोडाक्षरविरहित बालनाटिका देण्याचाही प्रयत्न केला. मुलांचे भावविश्व व त्यांच्या गरजा यांना प्राधान्य देऊन बालनाटिका लिहिल्या. लहान मुलांना अद्भुतरम्य व चमत्कारारावर आधारित कथानके आवडतात असा समज असतो पण त्यांनी या समजाला छेद देऊन वास्तवावर आधारित बालनाटिका लिहिल्या.त्यांच्या बालनाटिकांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची चित्रदर्शी शैली. त्यांच्या नाटिकांमधला प्रसंग समोर जिवंतपणे घडत आहे असे वाटत राहते. एकंदरीत त्यांच्या बालनाटिका वैशिष्ट्यपूर्ण आहेत. बाल-कुमार वयातील मुलांचे बौद्धिक-भावनिक संगोपन करण्याचा प्रयत्न केला पण त्या तेवढय़ावरच थांबल्या नाहीत तर त्यांनी आपल्या लेखनाच्या सीमा विस्तारण्याचा प्रयत्न केला.
लोकप्रियतेच्या प्रवाहात वाहवून न जाता त्यांनी स्वतंत्रपणे वेगळे विषय शोधून त्याबद्दल शक्य तेवढे संशोधनात्मक काम करून मगच ललित लेखन करण्याकडे त्यांचा ओढा होता.

गिरिजा कीर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ‘ह.ना.आपटे पुरस्कार’ (१९८०) ‘अनिकेत’ या कादंबरीला मिळाला. त्यांच्या साहित्यविषयक कामगिरीसाठी त्यांना ‘महाराष्ट्र राज्य साहित्य मंडळाचा विशेष पुरस्कार’ हे पुरस्कार याखेरीज पुणे मराठी ग्रंथालयाचा कमलाबाई टिळक पुरस्कार तसेच अभिरुची पुरस्कार आणि मुंबईचा श्री अक्षरधन महिला साहित्य पुरस्कार तसेच ‘अखिल भारतीय पद्मश्री भवरलाल जैन सूर्याेदय साहित्य रत्न पुरस्कार’ या पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर वणीच्या पहिल्या लेखिका संमेलनाच्या उद्घाटक, बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, ठाणे जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले.

अंतर्मुख व खिळवून ठेवणा-या संवेदनशील साहित्यिक गिरिजा कीर त्यांच्या रूपाने कथाकथन शैलीतील एक तारा ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी निखळला.
गिरीजा कीर यांच्या निधनाने साहित्य विश्वातील परखड पण तितकीच मर्मभेदी लेखिका हरपली.

संगीता कुलकर्णी

— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८
डाॅ.सतीश शिरसाठ on कलियुगातील कर्ण
अरुण पुराणिक , पुणे on माझी जडणघडण भाग – ८
गणेश साळवी. इंदापूर रायगड on कलियुगातील कर्ण
Vilas kulkarni on व्यथा
डाॅ.सतीश शिरसाठ on तस्मै श्री गुरुवै नमः