Thursday, May 30, 2024
Homeसाहित्यसाहित्य तारका : ४१

साहित्य तारका : ४१

इंद्रायणी सावकार

इंद्रायणी सावकार हे नाव आपल्याला नर्मविनोदी, प्रसन्न अशा ललित लेखनामुळे माहिती आहे . त्यांचा भारतीय संस्कृतीचा, पुराणांचा आणि इतिहासाचा अभ्यासही सखोल आहे.

माहेरच्या इंद्रायणी साठे असलेल्या मराठी लेखिका इंद्रायणी प्रभाकर सावकार यांचा जन्म २६ जून १९३४ रोजी पुण्यात झाला.
त्यांच्या वडिलांचे नाव त्रिंबक साठे आणि आईचे मनोरमा साठे. त्यांचे आजोबा रामचंद्र ऊर्फ भाऊसाहेब साठे हे वकील होते आणि आईचे वडील धर्मानंद कोसंबी ऊर्फ बापू हे संस्कृतचे प्रकांड पंडित आणि बौद्ध तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक होते. या दोघांमुळेच इंद्रायणीं सावकार यांना संस्कृतची गोडी लागली.

इंद्रायणी सावकार यांची शैक्षणिक कारकीर्द दैदिप्यमान अशीच. पुण्याच्या मॉडर्न हायस्कूलमधून त्या मॅट्रिक झाल्या.त्या परीक्षेत त्यांना युनिव्हर्सिटीत संस्कृतमध्ये पहिली आल्याबद्दल जगन्नाथ शंकरशेठ पारितोषिक आणि इंग्रजीत पहिली आल्याबद्दल दादाभाई नौरोजी पारितोषिक मिळाले.पुणे विद्यापीठातून बी.ए.(ऑनर्स) आणि १९५५ मध्ये सॉरबॉन-पॅरीस विद्यापीठातून त्या डी.एल.(Doctorat es Lettres) झाल्या.

इंद्रायणी सावकार यांनी कादंबऱ्या आणि कथासंग्रह मिळून अनेक मराठी पुस्तके लिहिली. मराठी मासिकांतून आणि दिवाळी अंकांतून प्रकाशित होत असलेल्या त्यांच्या मराठी लघुकथा हे त्या अंकांचे भूषण तर विनोदी लघुकथा लेखन त्यांच्या वाङमयीन कारकिर्दीचे वैशिष्ट्य. वाङमयाचे इतर प्रकारही त्यांनी यशस्वीपणे हाताळले. त्यांच्या लेखणीने अनेक विषयात लीलया संचार केला .त्याचबरोबर आकाशवाणीवर विविध विषयांवरील भाषणे, संस्कृत वृत्तनिवेदिका, दूरदर्शनवर मराठी कार्यक्रमांचे सुत्रसंचालन याही भूमिका त्यांनी लिलयापणे पार पाडल्या.लिखाणा सोबतच शिवण, भरतकला, पाककला यातही त्या पारंगत होत्या.

इंद्रायणी सावकार यांनी काही वर्षे वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीबाई पाटील यांच्या खासगी सेक्रेटरीचे काम केले.
या निमित्ताने मराठी राजकारणी लोकांशी त्यांचा संबंध आला. त्यांच्या कादंबऱ्यांतून येणारी राजकारणी पात्रे ही त्या अनुभवांवरच बेतलेली असावीत.

इ.स. १९८९ पासून पुढे अनेक वर्षे इंद्रायणी सावकार  दैनिक ’”सामना’” च्या उपसंपादक होत्या. स्वतः लेखिका असल्याने त्यांनी इतर स्त्रियांनाही लेखनासाठी उत्तेजन दिले.त्यांनी वैशाली पाटील यांच्यावर “शेतावर राहणारी लेखिका” हा लेख लिहिला. तसेच अनेक ॠषीमुनींच्या कथांचा समावेश असलेले stories of Sages हे पुस्तक परदेशस्थ भारतीय मुलांना आपल्या पौराणिक संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून त्यांनी लिहीले आणि याला परदेशात उत्तम प्रतिसाद मिळाला.

समाजात अवती भवती वावरणारी माणसे व ऐकलेले अनुभव व प्रसंग यांनी त्यांच्या कथा कादंबर्‍याना विषय पुरविले प्राय: विनोदी कथाना वाचकांची पसंती मिळाल्याने त्यांना अधिकाधिक लिहिण्याची स्फूर्ती मिळाली.व त्यांच्या इतर साहित्यालाही दाद मिळू लागली.

इंद्रायणी सावकार यांची मराठी आणि इंग्रजी पुस्तके संपादन :–
अय्या हो, ५७ ऋषींच्या महान गोष्टी, ओळख
काळाराम गोराराम, गारवा गोवा, पुनर्जन्म (कादंबरी, इंग्रजीत Purple Grass)
पैलतीर, प्यासा, प्रेमकहाणी प्रेमशाही जिंदाबाद, बदलत्या सावल्या, बाळा-बापू– कादंबरी,भारतीय संस्कृतीचे शिल्पकार : ५७ ऋषींच्या महान गोष्टी (बालसाहित्य)
मंगळसूत्र, मृगया (कादंबरी) रसवंती (पाकशास्त्र) रेवती, लव्ह इन कॉलिफोर्निया, वारस (राजकीय पार्श्वभूमीवरची कादंबरी), वाघीण (एका वाघिणीसारख्या आदिवासी स्त्रीची कहाणी-कादंबरी)

Our Inheritance Of Spirituality (माहितीपर)
Purple Grass (कादंबरी, मराठीत पुनर्जन्म)
She, The Accused (कादंबरी-इ.स.१९९८). ही कादंबरी ’क्रॉसवर्ड’ने वर्षातल्या सर्वोत्कृष्ट कादंबरीसाठी विचारात घेतली होती.
Stories of Sages (व्यक्तिचित्रण)
The Men from Sun – The Story of the Kosambis (कादंबरी-इ.स.२०००)
The Splendour of Ganesh Worship (माहितीपर – इ.स.२००३)
Weeds (कथासंग्रह-१९७६)

पाली भाषेचे जाणकार, बौद्ध तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि तत्त्ववेत्ते, विचारवंत धर्मानंद कोसंबी यांची नात असलेल्या इंद्रायणी सावकार यांनी धर्मानंद कोसंबी यांची विद्वत्ता आणि संशोधनाचा धांडोळा घेतानाच त्यांच्या कौटुंबिक, घरगुती वातावरणाचा मागोवा त्यांनी ‘धर्मानंद कोसंबी : अॅन अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकात घेतला आहे. एका थोर तत्त्ववेत्याचं हे कादंबरीच्या अंगाने जाणार चरित्र अंतर्मुख करून जाणारे.रसाळ भाषा, ओघवते निवेदन आणि सहज प्रवाही शैली यामुळे ही पुस्तके वाचनीय झालेली आहेत.
महान लेखिकेला विनम्र अभिवादन.

संगीता कुलकर्णी

— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments