Thursday, May 30, 2024
Homeसाहित्यसाहित्य तारका : ४२

साहित्य तारका : ४२

डाॅ.सरोजिनी बाबर

मराठी लोक साहित्याच्या संकलक-संपादक आणि अभ्यासक सरोजिनी बाबर यांचा जन्म ७ जानेवारी १९२० रोजी बागणी ता. वाळवा, जि. सांगली या गावी कृष्णराव आणि गंगुबाई या दांपत्यापोटी झाला. त्यांचे वडील शिक्षण खात्यात नोकरीला होते.त्यांची नोकरी फिरतीची होती. त्यामुळे सरोजिनीं बाईंचे शिक्षण एका ठिकाणी न होता इस्लामपूर, सातारा, अहमदनगर, पुणे अशा वेगवेगळ्या शहरांमधून झाले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी पुण्यातल्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात प्रवेश घेतला.बी.ए.च्या परिक्षेत त्या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. पुढे बी.टी. झाल्या आणि शिवाजी मराठा संस्थेच्या जिजामाता हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून रुजू झाल्या.

सरोजिनीं बाईंना उच्च शिक्षणाची ओढ असल्याने त्यांनी अल्पकाळातच नोकरी सोडली आणि पुणे विद्यापीठात एम.ए.ची पदवी मिळवण्याकरिता त्या दाखल झाल्या. त्या एम.ए. तर झाल्याच पण पुढे त्यांनी पीएचडी ही केली.”स्त्री लेखकाचं मराठी साहित्यातील योगदान ” यावर त्यांनी पीचडी केली.त्यांचे मराठी व संस्कृत या भाषांवर प्रभुत्व होते. ही पदवी प्राप्त करणाऱ्या त्या काळात मराठा समाजातली पहिल्या महिला होत्या. पुढे याच पुणे विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ लेटर्स-डी.लिट. ही सर्वोच्च बहुमानाची पदवी दिली आणि जीवनगौरव पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आला. टिळक महाराष्ट्र विद्यापीठानेही त्यांना डी.लिट. दिली तर राहुरी कृषी विद्यापीठाने डी.एस.सी. पदवी प्रदान केली .

शिक्षणक्षेत्रात अशा सर्वोच्च पदव्या प्राप्त करीत असतानाच त्या राजकारणात उतरल्या. सन १९५२ ते १९५७ या कालखंडात त्यांना विधानसभेचे सदस्यत्व मिळाले. सन १९६३ ते १९६६ या काळात त्या विधान परिषदेवर सदस्य म्हणून कार्यरत होत्या तर सन १९६८ ते १९७४ या कालखंडात त्या राज्यसभा सदस्य होत्या.
महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या मानस भगिनी महाराष्ट्राच्या आक्का म्हणून सन्मानित केले त्या जेष्ठ साहित्यिका लोकसाहित्याच्या अभ्यासक डाॅ.सरोजिनी बाबर. “अडगुळं मडगुळं, सोन्याचं कडबुळं खेळायला आलं गं, लाडाचं डबुलं” अशी बोलीभाषेतील गाणी ऐकत मोठ्या झाल्या.आताशा कानाआड गेलेल्या बोली भाषेतल्या, खास ग्रामीण साहित्याचा अमूल्य ठेवा खानदानी अलंकारिक मराठी लहेजा असणारा साहित्याचा ठेवा देणा-या व लोकसाहित्याचा गाभा म्हणून ज्यांना गौरविण्यात आले.
महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकसाहित्य आणि लोकशिक्षण यासाठीच आपले आयुष्य वाहून घेणा-या
लोकसंस्कृतीच्या विविधांगाचे दर्शन घडविण्याचे आणि लोकपरंपरांचा परिचय करून देण्याचे मोलाचे काम त्यांनी आयुष्यभर केले.उत्तम प्रकारे संशोधन संपादन संकलन करून मोठा ठेवा महाराष्ट्राला उपलब्ध करुन दिला.

लोकपरंपरेचे पहिले संस्कार सरोजिनीबाईंवर त्यांच्या घरातूनच झाले. उठता बसता म्हणी- उखाणे, लोककथा-
लोकगीतं म्हणणा-या आज्या, आत्या, मावश्या आणि आजूबाजूच्या बायाबापड्या यामुळेच लोकधनाची बरसात त्यांच्यावर लहानपणीच झाली.

स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीत सरोजिनी बाबर यांनी धडाडीने भाग घेतला. लोकसाहित्याच्या आत्मियतेचा वारसा त्यांना “माती, नाती आणि संस्कृती” यांना प्राधान्य देणा-या ग्रामजीवनातून मिळाला.
सण आणि उत्सवांमधला लोकांचा उत्साह त्यांनी पाहिला. गावजत्रांची मौज अनुभवताना समाज मनाचीही स्पंदने त्यांनी टिपली. माणसांच्या प्रथा, परंपरा, श्रद्धा, समजुती त्यांनी समजून घेतल्या. त्यांच्या आसपास संसारी सोशिक बायका वावरत होत्या. त्यांची सुखे-दुःखे त्या उखाण्यातून, गाण्यातून जात्याच्या ओवीतून व्यक्त करत होत्या. त्यांनी लोकजीवनात जाउन समरस होऊन लोकधन वेचण्याचा ध्यासच घेतला.
त्यांची लोकसाहित्यविषयक महत्त्वाची संपादने अशी : एक होता राजा, दसरा-दिवाळी, जनलोकांचा साम्यवेद, साजाशिणगार, मराठीतील स्त्रीधन, वनिता सारस्वत, बाळराजे, कुलदैवत, राजाविलासी केवडा, लोकसंगीत, समाजशिक्षणमालेतील लोकसाहित्यविषयक पुस्तिका… कथा, कादंबरी, काव्य, ललित असेही विविधांगी लेखन त्यांनी केले…

सरोजिनी बाईंना त्यांच्या ग्रंथ संपादनासाठी विविध पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झाले. त्यांपैकी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची गौरववृत्ती, भद्रकाली ताराराणी पुरस्कार, गुरूवर्य बाबुराव जगताप पुरस्कार, महर्षि विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार, पठ्ठे बापुराव पुरस्कार यांच्या जोडीला मराठा सेवा संघ विश्व गौरव पुरस्कार त्यांना मिळाला.

सरोजिनी बाबर यांची वक्तृत्व कला देखील उत्तम ऐकत रहावी अशीच होती. त्यांनी गायनाचे शिक्षण काही काळ घेतले होते. गजाननराव वाटवे , गोविंदराव टेंबे, वत्सलाबाई महाडिक, ज्योत्स्ना भोळे, हिराबाई बडोदेकर यांच्याशी चांगली ओळख होऊन भेटीगाठी होऊन त्यांच्यावर गायन संस्कार होत राहिले त्यामुळे अत्यंत सुरेल गोड ठाम आवाजात त्या उत्तम प्रकारे लोकगीते म्हणतं असत.महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागातल्या लोक वाड्मयाचा खूप मोठा संग्रह त्यांनी केला. त्यात ओव्या, गीते, कथा कहाण्या, म्हणी, खेळगाणी, उखाणे मोठ्या प्रमाणात समाविष्ट आहेत. तसेच महाराष्ट्रातील देवधर्माची, सण-उत्सवाची, रितीरिवाजांची अनेक कलांची माहितीही आहे.

२३ जानेवारी १९९० पासून मुंबई दूरदर्शनने सरोजिनी बाबर यांची “रानजाई” ही तेरा (१३) भागांची मालिका सादर केली. या मालिकेचे दिग्दर्शन मीना गोखले यांनी केले होते. या मालिकेतून मराठी संस्कृतीचे नेटके आणि नेमके असे विलक्षण प्रत्ययकारी दर्शन घडले. प्रत्येक भागाचे लेखन करून अनेक मराठी ठिकाणांचे, गाण्यांचे, नृत्यांचे, रिवाजांचे चित्रण करून कवयित्री शांताबाई शेळके यांच्या बरोबर केलेली चर्चा अत्यंत अभ्यासपूर्ण आणि रंजक ठरली.

संगीतकार गोंविदराव टेंबे ह्यांच्या आग्रहामुळे आकाशवाणीवरील कार्यक्रमात त्यांनी म्हटलेले भोंडल्याचे गाणे त्यांना लोकसंगीत गायकांच्या यादीत मानाने बसवून गेले.
पुणे विद्यापीठ आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांनी डी.लिट.ही पदवी देऊन आणि पुणे विद्यापीठाने ‘जीवन साधना गौरव’ हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या आणि विश्वकोष मंडळाच्या ही त्या सदस्य होत्या. त्या महाराष्ट्र विधान सभेच्या सदस्य, राज्य परिषदेच्या सदस्य, राज्यसभा सदस्य होत्या. १९५२ ते १९७४ पर्यंत त्या कार्यरत होत्या.नंतर विनोबाजी भावे यांनी त्यांना राजकारणातून बाजूला होऊन लेखन आणि संशोधनाला वाहून घ्या असा सल्ला दिला आणि त्यांनी तो मान्य करून पुढील आपले आयुष्य वाङ्ममय सेवेसाठी वाहून घेतले.

लोकसाहित्याची लोकसंस्कृतीची भूल सरोजिनी बाईंना पडली होती. खरं तर ते नैसर्गिकचं होतं म्हणा कारण त्यांच्या वडीलांनी राजकारणापेक्षा समाजकारण त्यांच्यात अधिक रूजवलं होतं. त्यांच्या वडिलांनी कृष्णराव बाबर यांनी स्थापन केलेल्या “समाजशिक्षण माला “चं रोपटं ख-या अर्थाने रूजवलं आणि वाढवलं ते सरोजिनी बाईंनी. वडील कृष्णराव बाबर यांनी सुरू केलेल्या समाज शिक्षण मालेचे कामही त्यांनी निष्ठेने केले. समाजशिक्षणमाला यासाठी संपादित केलेली ५५० पुस्तके, स्वतःची ८७ पुस्तके, ७ कादंब-या, ११ कथासंग्रह, २६ ललित लेख संग्रह, ४ बालवाङमय व नाटिकांची पुस्तके, २ काव्यसंग्रह अशी मोठी ग्रंथसंपदा लेखिका संपादक म्हणून त्यांच्या नावावर आहे. महाराष्ट्र् लोकसाहित्य समितिच्या अध्यक्षा असताना त्यांनी दुर्मिळ आणि अप्रकाशित लोकसाहित्य संकलित केले. “लोकसाहित्य शब्दकोश आणि भाषा व संस्कृती” या पुस्तकांमधून प्रकाशित केले. “समाज शिक्षण माला” हे मासिक त्यांनी अनेक वर्षे चालविले.

“लोकसाहित्य शब्दकोश” हा लोकसाहित्यातील भाषेचा शब्दकोश मराठीतील या प्रकारचा पहिलाच कोश आहे. त्या या कोशाच्या संपादिका आहेत. तसेच शब्द संकलनात गजमल माळी व ग.मो.पाटिल यांचेही योगदान आहे. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीच्या प्रगाढ अभ्यास त्यांनी आयुष्यभर केला.
मौखिक परंपरेनं चालतं आलेलं हे लोकवाड़मय एव्हाना काळाच्या पडद्याआड गेलं होतं. आपल्या मातीत लोकवाड़मयाचं हे साजिवंत लेण होतं आणि अजूनही आहे ते सरोजिनी बाबर यांच्या कामामुळे ठोसपणे उमगलं.

लोकसाहित्याचे अतिशय उत्तम प्रकारे संशोधन संपादन आणि संकलन करून संस्कृतीचा ठेवा महाराष्ट्राला देणा-या साहित्य तारका डाॅ. सरोजिनी बाबर २० एप्रिल २००८ रोजी साहित्य तारांगणातून लुप्त झाल्या.त्यांना विनम्र अभिवादन…!!

संगीता कुलकर्णी

— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments