वासंती मुझुमदार
असोशीने जगणारी व लिहिणारी ललित लेखिका, कवयित्री म्हणजे वासंती अरुण मुझुमदार.
वासंती मुझुमदार म्हणजे लेखणी व कुंचला याचा दुर्मिळ संगम असणारे व्यक्तिमत्त्व. गोष्टींची आवड असणा-या सत्यकथा, मौज परिवारातील कलावादी व वैशिष्टयपूर्ण लेखिका म्हणून एक खास ओळख मराठरसिकांना असणा-या वासंती मुझुमदार यांचा जन्म ५ एप्रिल १९३९ रोजी कराड येथे झाला. त्यांनी पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी मिळविण्यासाठी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेतले आणि एस.एन. महिला विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.
“ग्रंथाली” या प्रकाशन संस्थेची स्थापना करण्यात वासंती मुझुमदार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
श्री. पु. भागवत यांनी लिहिलेल्या ‘साहित्याची भूमी’ च्या संपादनाची धुरा ही वासंती मुझुमदार यांनी सहजी सांभाळली. ‘रूची’ आणि ‘साहित्याची भूमी’चे मुखपृष्ठ देखील त्यांनीच चितारले, सजविले होते. काव्य लेखनापासून त्यांच्या लेखनाची सुरुवात झाली. त्यांच्या प्रारंभीच्या कविता ‘रूप’ या नियतकालिकातून प्रकाशित झाल्या आणि नंतर सत्यकथा, अनुष्टुभ, स्त्री, दीपावली यांमधून नियमितपणे प्रकाशित होत राहिल्या.
ललित गद्य लेखन, कविता, चित्रकला, संगीत अशा सर्व कलागुणांनी संपन्न व्यक्तिमत्त्व लाभलेल्या तसेच अतिशय तरल व संपन्न असे भावविश्व लाभलेल्या वासंती मुझुमदार यांना चित्रकला व संगीत यांचेही देणे असल्याने त्यांच्या कवितेला व ललित लेखनाला एक वेगळी उंची लाभली होती.
वासंती वळवडे या आपल्या पूर्वाश्रमीच्या नावानेच त्या कविता लिहित. त्यांना ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांचा प्रदीर्घ आणि जिव्हाळ्याचा मातृवत सहवास लाभला. साहजिकच त्यांच्यावर इंदिरा संत यांचे आणि त्यांच्या काळातील इतर कवयित्री पद्माबाई, संजीवनीबाई, शांताबाई शेळके यांच्या कवितांमधील विदग्ध वाङ्ममयाचे संस्कार झाले. “सहेला रे” हा त्यांच्या निवडक कवितांचा पहिला संग्रह. या संग्रहामधील बहुतेक कवितांत ‘निसर्ग’ हे आशयसूत्र आहे. काही कवितांतून त्या जगण्याचा अर्थ शोधताना स्वत:चाही शोध घेण्याचा प्रयत्न करताना म्हणजे आत्मशोधाची जाणीव प्रकट करताना दिसतात.
“सनेही एक कवितावली” हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध सहज आणि मोहक लय असणारी कविता हे त्यांचे वैशिष्ट्य.त्यांच्या कवितांमधून निसर्ग कवितांची उत्कट भावानूभूती व्यक्त होताना दिसते. उदा. त्यांची पाऊसपान ही कविता….
झड घाली पाऊसपान
हत्ती माझा भिजला छान
न्हाणावलेल्या परीचा
एकच केस चिंब ओला
परीला नाही कसले भान
झड घाली पाऊसपान..
थरथरपंखी चिमणीचा
मुकाट झाला मधला दात
पोपटरंगी पोरीचा
पदर उडाला गाणे गात उन्ह उसवुनी
आले पाणी
सरसर चढले ढगांवर त्याची माझी जुळली तान
झड घाली पाऊसपान…
कौलारावर चार पारवे
उखाण्यांतले कदंब हिरवे
हिरवी कृष्णा हिरवे डोंगर
हिरवा तनुल पिसारा भवती
झड घाली पाऊसपान
माझी मात्र कोरडी तहान
झड घाली पाऊसपान
झड घाली पाऊसपान…’
“कवितेची बोली”’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय. त्यांच्घा कविता त्यांच्या कवितांशी नाते सांगणारी. स्वत:चे स्वतंत्र रूप व अस्तित्व घेऊन अवतरणारी. त्यांच्या काव्याचे चटकन् लक्षात येणारे विशेष म्हणजे उत्कटता, तरलता आणि संवेदनशीलता हे होय.
वासंतीताई यांचा ‘नदीकाठी’ “झळाळ” हे दोन’ ललित लेखसंग्रह प्रसिद्ध.
आत्माविष्कार-स्व’ची अभिव्यक्ती हा वासंती मुझुमदार यांच्या ललित लेखनाचाही गाभा आहे.
वासंतीताई यांना रंग-रेषा-आकार, स्वर-लय- ताल आणि शब्द अशा कला जाणिवांचा वरदहस्त लाभलेला होता. त्यामुळेच त्यांच्यातील लेखनाच्या, निर्मितीच्या शक्तीला वेगवेगळ्या जाणिवांचे नि त्यातून आविष्कारांचे आकार गवसत गेले. तसेच त्यांनी अनेक पुस्तकांची मुखपृष्ठं सुद्धा केली आहेत.
वासंती मुझुमदार ह्या एक उत्तम चित्रकारही असल्याने त्यांनी ‘मौज’ प्रकाशनाच्या अनेक पुस्तकांची मुखपृष्ठे तयार केली होती. यामध्ये इंदिरा संत, वसंत बापट, तारा बनारसे, श्री. पु. भागवत, आशा बगे, गौरी देशपांडे आनंद यादव, बा. भ. बोरकर, श्रीनिवास वि. कुलकर्णी, कवी पाडगावकर इत्यादि प्रतिभावंतांच्या पुस्तकांचा समावेश आहे. मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरी येथे त्यांची दोन तैलचित्रांची प्रदर्शने, ताज आर्ट गॅलरी येथे एक प्रदर्शन, सिधराणी आर्ट गॅलरी, त्रिवेणी कला संगम, नवी दिल्ली येथे तैलचित्रांचे एक प्रदर्शन त्यांनी भरविले तर ललित कला अकादमी, नवी दिल्ली यांच्या राष्ट्रीय कला प्रदर्शनासाठी त्यांच्या चित्रांची निवड झाली होती. १९९३ सालात त्या परभणी जिल्हा साहित्य संमेलनाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. त्याच वर्षी कव्यरसिक मंडळ, डोंबिवली आयोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यानीं भूषविले.
इतकच नाही तर मुंबई दूरदर्शनच्या चित्रपट निवड समितीच्या त्या सदस्य ही होत्या. त्याचबरोबर त्यांची अखिल भारतीय फिल्म सेन्सॉर बोर्डाच्या सल्लागर मंडळामध्ये देखील नियुक्ती झाली आणि बालकल्याण समितीच्या त्या प्रमुख समुपदेशक ही होत्या. यांच्या ब-याच ग्रंथांना शासनाचे वाङ्मयमय पुरस्कार मिळाले आहेत. ‘सहेला रे’ कवितासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा केशवसुत पुरस्कार, इंदौर साहित्य सभेचा तात्यासाहेब सरवटे पुरस्कार, वर्धा साहित्य सभेचा बा.सी. मर्ढेकर पुरस्कार, केंद्र शासनाचा उत्कृष्ट निर्मिती हा प्रकाशकाचा पुरस्कार इ. पुरस्कार लाभले तर ‘नदीकाठी’ ह्या ललित लेखसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा अनंत काणेकर प्रथम पुरस्कार, भैरूरतन दमाणी पुरस्कार, यशवंतराव चव्हाण कराड पुरस्कार तसेच ‘अक्षरधन’
(बोरीवली) यांचा ‘उत्कृष्ट साहित्यिका’ पुरस्कार मिळाला. त्याच बरोबर त्यांच्या ‘झळाळ’ ह्या लेखसंग्रहास श्री. ज. जोशी पुरस्कार, साने गुरूजी उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार- असे अनेक मानाचे पुरस्कारही त्यांना मिळाले.
लेखणी व कुंचला यांचा दुर्मीळ संगम असणारे हे व्यक्तिमत्त्व ७ नोव्हेंबर २००३ रोजी काळाच्या पडद्याआड गेले.
— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800