Saturday, July 27, 2024
Homeसाहित्यसाहित्य तारका : ४५

साहित्य तारका : ४५

प्रा. डाॅ. ताराबाई भवाळकर

लोकसाहित्य अभ्यासक व संशोधक, अध्ययन, अध्यापनसंशोधन आणि लेखन यांचा आयुष्यभर ध्यास घेतलेल्या आणि तेच आपले जीवितकार्य मानणाऱ्या व महाराष्ट्राच्या विचारविश्वात एक ज्येष्ठ आणि व्यासंगी विदुषी म्हणून ओळखल्या जाणा-या प्रा. डाॅ. तारा भवाळकर याची आज ओळख करून घेऊ या..

लोकसाहित्य, लोकसंस्कृती लोकपरंपरा आणि लोककला या विषयांच्या गाढ्या अभ्यासक असलेल्या प्रा. डाॅ. तारा भवाळकर यांचा जन्म १ एप्रिल १९३९ रोजी पुणे येथे झाला. त्यांच्या वडिलांच्या सततच्या बदल्या होत असल्याने त्यांचे शालेय शिक्षण एका ठिकाणी होऊ शकले नाही. त्यांनी एस.एस.सी. नंतरचे आपले सर्व शिक्षण नोकरी करून केले. १९६७ साली त्या एम.ए. झाल्या तसेच राष्ट्रभाषा पंडित व अनुवाद पंडित या परीक्षाही उत्तीर्ण झाल्या. पीएच.डी.साठी त्यांचा विषय होता “‘मराठी पौराणिक नाटकाची जडणघडण”’ (प्रारंभ ते १९२०).. त्यांच्या या प्रबंधाला पुणे विद्यापीठाचे सर्वोत्कृष्ट प्रबंधासाठीचे पारितोषिक मिळाले. त्यासाठी त्यांनी सांगली, केरळ, गोवा, कर्नाटक, कारवार व कोकणात जाऊन या विषयीची माहिती गोळा तर केलीच पण त्याचबरोबर यात त्यांनी नमन, दशावतार मंडळे, इ. साठीची ही माहिती गोळा केली.

ज्ञानाच्या आवडीतून त्यांनी अध्यापन हेच क्षेत्र निवडले. १९५८ पासून १९७० पर्यंत त्या माध्यमिक शाळेत शिक्षिका तर १९७० पासून १९९९ पर्यंत सांगली येथील श्रीमती चंपाबेन वालचंद शाह महिला महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत राहिल्या नी १९९९ मध्ये प्राध्यापक म्हणून निवृत्त झाल्या.

त्याचबरोबर विद्यावाचस्पती (पीएच.डी.) मार्गदर्शक या नात्यानेही त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.
मराठी विश्वकोश, मराठी वाङ्मयकोश, मराठी ग्रंथकोश आदी महत्त्वाच्या कार्यात ही त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.वाईच्या विश्वकोशातील लोकसाहित्य विभागाच्या त्या अतिथी संपादक होत्या.
मराठी भाषेतील कोश निर्मितीसाठी सहभाग संपादन :-
मराठी वाङ्मयय कोशासाठी ९ लेख,
मराठी ग्रंथ कोशासाठी ७ लेख व मराठी विश्वकोशासाठी ४ लेख,
अमेरिकेतल्या अरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीत आयोजित ‘”भारतीय समाज, संस्कृती आणि स्त्री’” या विषयावरील चर्चासत्रात भाग घेण्यासाठी त्यांना खास निमंत्रित करण्यात आले होते.

नाटक आणि रंगभूमी, मराठी भाषा आणि साहित्य, स्त्रीमुक्ती चळवळ, अंधश्रद्धा निर्मुलन चळवळ आणि लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती हे ताराबाई यांच्या आस्थेचे विषय होते. या क्षेत्रात सक्रियपणे आणि अखंडपणे त्या सहभागी होत आल्या व या विषयावर त्यांनी विपुल लेखन केले. “सीतायन’ सह त्यांचे एकेचाळीस ग्रंथ प्रकाशित झाले आहेत आणि त्याला महत्वाचे संदर्भमूल्य प्राप्त झाले आहे.

लोकसाहित्याच्या अभ्यासक ताराबाई भवाळकर यांचे वर्णन “माय” वाटेवरची प्रवासिनी असेच करावे लागेल कारण लोकसंस्कृती ही व्यापक अर्थाने माय म्हणजेच मातृपरंपरा असल्याचे त्यांनी आपल्या लेखनातून वारंवार सिद्ध केलं आहे. त्यांच्या मनात ही “माय” वाट लहानपणीच रुजली होती. त्यांनी लोकसंस्कृती, नाट्यसंशोधन, संतसाहित्य, एकांकिका, ललित लेखन, लोककला यांविषयी तसेच स्त्री जाणिवांवर लक्ष केंद्रित करणारे विपुल लेखन केले आहे आणि लोककला आणि लोकसाहित्य या विषयांशी संबंधित अनेक चर्चा, परिसंवाद व संमेलने यांत भाग घेतला. त्यांनी हरिवंशराय बच्चन यांच्या
मधुशाला याचे मराठीतले पहिले मराठी भाषांतर केले व इंडिया बुक हाऊसने ते प्रकाशित केले. जेव्हा हे भाषांतर त्यांनी केले तेव्हा त्या कॉलेजात शिकत होत्या. विद्यार्थीदशेत असतानाच नाट्य एकांकिका स्पर्धांसाठी लेखन, दिग्दर्शन, व अभिनय केला. शिक्षण संपल्यावर त्यांनी स्वतःची ए.डी.ए. ही नाटक संस्था सुरू केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शाळा, कॉलेजच्या मुलांची नाटके बसवून दिली तसेच त्यांना राज्य नाट्य एकांकिका स्पर्धेसाठीची ही तयारी करून दिली.

विशेषतः लोकसाहित्य, लोककला, आणि लोकसंस्कृतीच्या व्यासंगी अभ्यासक आणि संशोधक म्हणून त्या मराठी वाचकांना सुपरिचित असलेल्या ताराबाई यांची साहित्य संपदा :-
अभ्यासक स्त्रिया (ज्येष्ठ लेखिका मालती दांडेकर, विदुषी दुर्गा भागवत यांच्यापासून ते प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्यापर्यंत ज्ञात-अज्ञात अशा २५ अभ्यासक स्त्रियांच्या संशोधन कार्याचा परिचय करून देणारे पुस्तक),
आकलन आणि आस्वाद (साहित्यिक), तिसऱ्या बिंदूच्या शोधात (वैचारिक), निरगाठ सुरगाठ (लेखसंग्रह), प्रियतमा (गडकरी साहित्यातील स्त्री प्रतिमा), बोरीबाभळी (रा.रं. बोराडे यांच्या ग्रामीण स्त्रीविषयक कथांचे संपादन आणि प्रस्तावना), मधुशाळा (हरिवंशराय बच्चन यांच्या ‘मधुशाला’चे मराठीतले पहिले मराठी भाषांतर),
मरणात खरोखर जग जगते (कथासंग्रह),
मराठी नाटक :-
नव्या दिशा, नवी वळणे
मराठी नाट्यपरंपरा : शोध आणि आस्वाद
महामाया, माझिये जातीच्या (सामाजिक), मातीची रूपे (ललित), मायवाटेचा मागोवा, मिथक आणि नाटक, यक्षगान आणि मराठी नाट्य परंपरा, लोकनागर रंगभूमी (माहितीपर), लोकपरंपरा आणि स्त्रीप्रतिभा (माहितीपर), लोकपरंपरेतील सीता, लोकसंचित (वैचारिक).
लोकसाहित्य : वाड्मयप्रवाह
लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा (माहितीपर), लोकांगण (कथासंग्रह), संस्कृतीची शोधयात्रा (माहितीपर),
स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर (वैचारिक), स्नेहरंग (वैचारिक).

ताराबाई यांची ग्रंथसंपदा विपुल असून त्यात विविधताही आहे.
मधुशाला’ (काव्यानुवाद), ‘प्रियतमा’ (गडकरी साहित्यातील स्त्री प्रतिमा), ‘लोकांगण’, ‘लोकसाहित्य : वाङ्मय प्रवाह’, ‘मायवाटेचा मागोवा’, ‘आकलन आणि आस्वाद’ (समीक्षा) ही त्यातील काही खास पुस्तके आहेत.

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पहिल्या महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या तसेच इस्लामपूर येथे भरलेल्या जागर साहित्य संमेलनाचे व राजारामबापू ज्ञानप्रबोधिनी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, उचगाव (बेळगाव) येथे भरलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रदेशीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, कादरगा येथे भरलेल्या महाराष्ट्र- कर्नाटक सीमा प्रदेशीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद नी जळगाव येथे भरलेल्या सूर्योदय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. त्याचबरोबर पुणे शहरात ५ जानेवारी २०१९ रोजी झालेल्या पर्यावरण साहित्य संमेलनाचे ही त्यांनी अध्यक्षपद भूषविले. लोक साहित्याच्या ख्यातनाम अभ्यासक, ज्येष्ठ संशोधक लेखिका डॉ. तारा भवाळकर यांना २०२०- २१ साठीचा “पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्यसेवा जीवनगौरव पुरस्कार” सांगली येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

त्याचबरोबर सु. ल. गद्रे साहित्य पुरस्कार, डॉ. सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशनचा दिलीप वि. चित्रे साहित्य जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. “लोकसंचित’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा १९९१ सालचा पुरस्कार तसेच त्यांच्या विविध साहित्य कृतींना अनेक पुरस्कार लाभले आहेत. अशा या विदुषीला मिळणाऱ्या अनेक पुरस्काराने महाराष्ट्रातील विचार- संशोधन परंपरेचाच सन्मान होत आहे असे म्हटले तर वावग ठरणार नाही.
त्यांचा अमृतमहोत्सवी सत्कार म्हणजे त्यांनी आजवर केलेल्या कामाची पोहोच आहे. प्रासादिक व्यक्तिमत्व म्हणजे प्रा. डॉ. तारा भवाळकर होय.

संगीता कुलकर्णी

— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments