Wednesday, September 11, 2024
Homeसाहित्यसाहित्य तारका : ४६

साहित्य तारका : ४६

ज्योत्स्ना देवधर

१९६० ते १९७० या दशकाच्या उत्तरार्धात मराठीत ज्या स्त्री लेखिका पुढे आल्या त्यांमध्ये महत्वाचे नाव ज्योत्स्ना देवधर यांचे आहे.

अफाट लोकप्रियता लाभलेली “‘घर गंगेच्या काठी’” ही कादंबरी आणि आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरील ‘”गृहिणी’” कार्यक्रमातील “”माजघरातल्या गप्पा”’ या कार्यक्रमाने घराघरात पोहोचलेल्या ज्येष्ठ लेखिका ज्योत्स्ना देवधर पूर्वाश्रमीच्या कुसुम थत्ते यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९२६ रोजी राजस्थानातील जोधपूर येथे झाला. त्यांनी पुणे विद्यापीठातून हिंदी विषयामध्ये एम. ए. केल्यानंतर वर्धा येथून “साहित्य विशारद ही पदवी संपादन केली. त्यांचे विवाहपूर्व वास्तव्य महाराष्ट्रा बाहेर असल्याने प्रारंभी हिंदी भाषेतून त्यांनी कथा-लेखन केले. पन्नास वर्षांहून अधिक काळ त्यांनी हिंदी आणि मराठी भाषेमधून लेखन केले.

आकाशवाणी पुणे केंद्रावर १९६० मध्ये त्या निर्मात्या म्हणून रजू झाल्या. “गृहिणी’’ या कार्यक्रमाचा भाग असलेल्या ‘माजघरातील गप्पा’ याद्वारे त्या घराघरामध्ये पोहोचल्या. सलग चोवीस वर्षे काम करून विविध जबाबदा-या हाताळल्या आणि वरीष्ठ निर्मात्या म्हणून त्या निवृत्त झाल्या. “अंतरा” या हिंदी कथा संग्रहाच्या लेखनाने त्यांनी साहित्य प्रांतामध्ये लेखनाची सुरुवात केली.

तरुण भारत’ (पुणे) ह्या दिवाळी अंकात ज्योत्स्ना ताईंची ‘घर गंगेच्या काठी’ ही पहिली मराठी कादंबरी आली आणि पुढे लगेचच ती पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली आणि कादंबरीकार म्हणून त्यांची स्वतंत्र नाममुद्रा उमटली तर पुढच्याच वर्षी त्यांची ‘कल्याणी’ ही कादंबरी प्रसिद्धीच्या झोतात आली.

“घर गंगेच्या काठी’ या पहिल्याच मराठी कादंबरीने त्यांना अफाट लोकप्रियता लाभली आणि या कादंबरीला महाराष्ट्र सरकारचा ‘हरिभाऊ आपटे पुरस्कार’ मिळाला. ‘कॅक्टस’ हा हिंदी कथासंग्रह, ‘कल्याणी’ हे हिंदी नाटक, ‘निर्णय’ हे पुरुष पात्रविरहित नाटक, ‘रमाबाई’ ही कादंबरी या त्यांच्या साहित्यकृती ही पुरस्कारप्राप्त ठरल्या.
एक श्वास आणखी, मावळती, उध्वस्त, फिलर, निर्णय, पडझड, रमाबाई, घर गंगेच्या काठी, कल्याणी, सीमारेषा, निवांत, मुठभर माणुसकी, तेजस्विनी,पुतळा, सायली, समास, बोंच, दवबिंदू, झरोका, आकाशी, आक्रीत, आजीची छडी गोड गोड
(बालवाङ्‌मय), एरियल आकाशवाणीचा रंजक इतिहास आत्मकथन (त्यांचे हे आत्मकथनात्मक पुस्तक ‘या पुस्तकात आकाशवाणी’ मधील दोन तपांच्या वाटचालीचा प्रवास व व्यक्तिगत त्यांच्या बरोबर मराठी समाजजीवन आणि साहित्य जीवनाचाही प्रवास आहे.), उत्तरयोगी (योगी अरविंद यांच्या जीवनावरील) कादंबरी इ. अशी अनेक पुस्तके प्रसिद्ध. त्यांच्या साहित्य संपदेमध्ये २१ कथासंग्रह, १९ कादंबऱ्या, ४ ललितलेख संग्रह व अनेक नाटकांचा समावेश आहे.. पंडिता रमाबाई यांचे चरित्र लिखाणाचे एक उत्तम उदाहरण मानले जाते..

त्यांच्या विविध कथांचे कन्नड, तेलगू, तमिळ, मल्याळम, आसामी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत अनुवाद झाले आहेत.. यांचे लेखन स्त्रीवादी आणि वास्तववादी होते… त्यांची भाषा साधी, सोपी, घराघरात वापरली जाणारी.. त्यामुळे शब्दांच्या जंजाळात फारशी अडकत नाही…त्यांची वर्णने साधी पण ती वाचकांच्या नजरे समोर उभी राहणारी…
डाॅ. विनया डोंगरे त्यांचा गौरव ‘चित्रमय शैलीच्या कादंबरीकार’ असा करतात तर डॉ. कल्याणी हर्डीकर त्यांना ‘स्वयंप्रज्ञ लेखिका’ असा करतात आपल्या विपुल आणि स्वतंत्र साहित्याने त्यांनी आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केल..
“घर गंगेच्या काठी’ या चित्रपटाच्या कथा-पटकथा आणि संवाद लेखनाबरोबरच त्यांनी ‘कल्याणी’ आणि ‘पडझड’ या दूरचित्रवाणी मालिकांसाठी लेखन ही केले.

“कल्याणी’ आणि ‘पडझड’ या कादंबऱ्या पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा आणि इस्लामिया या विद्यापीठांच्या अभ्यासक्रमामध्ये होत्या..
कराड येथे १९७५ मध्ये झालेल्या पश्चिम महाराष्ट्र कथालेखिका संमेलनाचे अध्यक्षपद आणि अंबाजोगाई येथील जिल्हा महिला परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले तर महाराष्ट्र राज्य नाट्य परिनिरीक्षण मंडळाचे सभासदत्व आणि महाराष्ट्र राज्य ग्रंथ पुरस्कार निवड समितीवर सभासद म्हणून निवड…
महाराष्ट्र साहित्य परिषद आणि पुणे मराठी ग्रंथालयाने ‘ज्येष्ठ लेखिका सन्मान’, अखिल भारतीय भाषा साहित्य संमेलनात भारत भाषा पुरस्कारानं तसेच महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे ‘कल्याणी’ या नाटकास ‘विष्णुदास भावे पुरस्कार’ प्रदान करून ज्योत्स्ना देवधर यांचा गौरव केला.. अनेक पुरस्कार विजेत्या ठरलेल्या ज्योत्स्ना ताईंना केंद्र सरकारचा ‘अहिंदी भाषा-भाषी लेखक’ पुरस्कारही मिळाला आहे…
कथा, कादंबऱ्या व ललित लेखनातून मराठी साहित्यात आपला वेगळा ठसा उमटवणा -या ज्येष्ठ लेखिका ज्योत्स्ना देवधर यांचे १७ जानेवारी २०१३ रोजी निधन झाले..

संगीता कुलकर्णी

— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. या माझ्या आवडत्या लेखिकांपैकी एक.कल्याणी आवडलेली कादंबरी.आज यालेखामुळे पूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या .१९७१ते२००२ पर्यंत मध्यप्रदेशातील छोट्याशा गावात राहिलो तेव्हा रेडियो स्टेशन लागू शकले तर गृहिणी किंवा रात्रीच्या नाट्य मालिका ऐकायल्या मिळाली की खूप आनंद व्हायचा. असो
    लेखासाठी धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments