सुमती देवस्थळे
मराठी चरित्रग्रंथांत मोलाची भर टाकणा-या चरित्रकार सुमती देवस्थळे यांची आज ओळख करून घेऊ या.
टॉलस्टॉय’, ‘मॅक्झिम गॉर्की’, ‘कार्ल मार्क्स’ अशा नामवंत विभूतींचा आपल्या लेखनातून वेध घेतलेल्या चरित्रकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुमती देवस्थळे यांचा जन्म २७ डिसेंबर १९२७ रोजी झाला.
मुळच्या पुण्याच्या असलेल्या सुमती ताई यांचे शिक्षण हुजूरपागेत झाले. विवाहानंतर त्या मुंबईला गेल्या. बी. ए., एम. ए., बी. एड आणि एम. एड.असे शिक्षण त्यांनी घेतले. सिडनहॅम कॉलेज मध्ये नोकरी करत असताना असाध्य अशा हृदयरोगाने त्यांना ग्रासले आणि नंतर त्यांचे मन लिखाणाकडे वळले आणि त्यांनी चरित्र- लेखनाला सुरुवात केली. टॉलस्टॉयः एक माणूस’, ‘अल्बर्ट श्वाईट्झर’, ‘मॅक्झिम गॉर्की’, ‘कार्ल मार्क्स’ आणि छाया व ज्योती, एक विचारवंत (मार्क्स), अल्बर्ट श्वाइत्झर, सप्तर्षी आणि अरुंधती अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
सप्तर्षी आणि अरुंधती या पुस्तकात त्यांनी आठ प्रतिभावंतांच्या चरितकथा मांडल्या आहेत. तर टॉलस्टॉयच्या व्यक्तिमत्त्वातील विचारवंत, साहित्यिक, कार्यकर्ता इ. पैलूंच्या मुळाशी असणारा माणूस नाट्यमय पद्धतीतून मूर्त करणे हे सुमती देवस्थळे ह्यांच्या लिखणाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. “अल्बर्ट श्वाइंट्झर’ सारख्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे प्रत्ययकारी चित्रण तसेच ओघवती, सुबोध, सूचक, काव्यात्म आणि रसाळ भाषेत अल्बर्टचा परिचय त्यांनी मराठी वाचकाला करून दिला आहे.
इतकेच नाही तर कार्ल मार्क्स’चे चरित्र लिहिताना सुमती बाईंनी तत्कालीन सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचे धारदार विश्लेषण केले आहे. रशियन राज्यक्रांतीचा सखोल अभ्यास करून तो पूर्ण इतिहास आपल्या डोळ्यांसमोर जिवंत केला आहे तर त्यांनी अतिशय जिव्हाळ्याने मॅक्झिम गॉर्कीच्या आयुष्याचा शोध घेतला व त्याच्या आयुष्यातील चढउतार, त्याची आंतरिक अस्वस्थता, जिवावर उदार होऊन त्याने केलेले प्रयत्न, उघड्या डोळ्यांनी पाहावी लागणारी त्या प्रयत्नांची निष्फलता, तरीही माणुसकीच्या आचेने त्याने जिवाच्या अंतापर्यंत केलेली धडपड याचा आलेख सुमतीबाईंनी मोठ्या ताकदीने काढला आहे.
सुमती देवस्थळे यांची अत्यंत अभ्यासपूर्ण आणि लालित्यपूर्ण भाषेत सर्वच चरित्रं अत्यंत लोकप्रिय झाली.ही सगळी चरित्रे लिहिताना सुमतीबाईंची भूमिका विभूतिपूजकाची नसून अभिनिवेशरहित अशा जिज्ञासूची तसेच वर्ण्य विषयाच्या अंतरंगात शिरण्याची जबरदस्त ताकद असल्याने सुमतीबाईंच्या लेखनाला दुर्मिळ सचोटी प्राप्त झाली.
परकीय जगताचा अफाट व्यासंग करून कसदार व्यक्तिमत्त्वांचा सर्वांगसुंदर शोध घेऊन अथक परिश्रम करून प्रचंड माहिती मिळवणा-या आणि मराठी चरित्रग्रंथांत मोलाची भर टाकणा-या सुमती देवस्थळे यांचे २२ जानेवारी १९८२ रोजी निधन झाले.
— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800