आनंदीबाई विजापुरे
“अजुनी चालतेची वाट’” या आत्मचरित्राने प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या आनंदीबाई विजापुरे ह्या पूर्वाश्रमीच्या गोदावरी महागावकर. त्यांचा जन्म ५ मार्च १९१७ रोजी झाला. त्यांचे शिक्षण काही दिवस महागाव येथे झाले.
१९२९ साली ग.पां.विजापुरे यांच्याशी त्यांचा विवाह होऊन त्या किर्लोस्कर वाडीत वास्तव्यास आल्या. किर्लोस्कर वाडीतल्या आधुनिक वातावरणात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होऊन साहित्य नाटके इत्यादींची त्यांना आवड निर्माण झाली आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला. नंतर त्यांनी नर्सिंगचे शिक्षण घेऊन नर्सिंग होम काढले तसेच त्यांनी सेमिनारसाठी परदेशी प्रयाणही केले.
पती वयस्कर आणि अरसिक म्हणून त्यांची घुसमट व्हायची. १९४२ साली ग.वा.बेहेरे यांच्याशी परिचय होऊन त्यांच्याबद्दल तीव्र आकर्षण निर्माण झाले त्यामुळे आनंदीबाई यांनी विजापुरे यांच्यापासून घटस्फोट घेतला.
ग.वा.बेहेरे यांच्याशी भेट झाल्यावर आनंदीबाईं यांच्या आयुष्याची दिशा बदलली. त्यांची कलासक्त वृत्ती ग.वा.बेहेरे यांच्या सोबतीमुळे तृप्त झाली. त्यांना साहित्यिकांचा सहवास लाभला व त्यांनी निरनिराळ्या कलांचा आस्वाद घेतला. ग.वा.बेहरे यांच्या बरोबर त्यांचे चौदा वर्षे सहजीवन झाले पण त्यांची सहधर्मचारिणी होण्याचे स्वप्न भंग झाल्यावर आनंदीबाई आपल्या मुलाबाळांत परतल्या.
आनंदीबाई विजापुरे यांनी ‘जवानीची हाक’, ‘अर्पिता’, ‘विषवृक्ष’ आणि ‘दुर्गी’ या कादंबर्या तर ‘सन्मान’ हा कथासंग्रह आणि ‘अजुनी चालतेची वाट’ हे आत्मचरित्र अशी पुस्तके लिहिली.
आनंदीबाईं यांनी कादंबर्या लिहिल्या त्या आपल्या मैत्रिणीच्या, मोलकरणीच्या अनुभवावर, पूर्णपणे जुळलेल्या, स्त्री-पुरुष संबंधांभोवती घोटाळणार्या अशा आहेत. मात्र ‘सन्मान’ या कथासंग्रहात स्त्रियांचे कुटुंबाच्या परिघात होणारे अपमान, हाल आणि दुर्दशा यांचे वर्णन आहे. “अजुनी चालतेची वाट” हे त्यांचे आत्मचरित्र. त्यांच्या या आत्मचरित्राने त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या..
आपल्या जीवनाचा आणि सोबतकार ग.वा.बेहेरे यांच्याशी असलेल्या आपल्या संबंधांचा शोध घेण्याचा प्रयत्न त्यात त्यांनी केलेला आहे. अशा प्रकारचे अनुभव साहित्यात प्रथमच मांडले गेल्याने साहित्य जगतात आणि समाजात प्रचंड खळबळ माजली.
त्यांच्या आत्मचरित्रात लहानपणी ज्या समाजात त्या वावरल्या त्या समाजाचे सूक्ष्म निरीक्षण आणि त्या समाजाचे त्यांनी पोटतिडकीने वर्णन केलेले आहे. समाजातल्या अनिष्ट रूढींमुळे स्त्रियांची होणारी होरपळ, बालविधवांचे दुःख आणि सामाजिक बहिष्काराची भीती यांचे त्यात चित्रण आहे. त्या काळातली गरिबी, हलाखी, पुरुषांची होणारी गोची, त्यांची हतबलता, मनाविरुद्ध घ्यावे लागणारे कठोर निर्णय यांचा घेतलेला सूक्ष्म वेध गरिबीमुळे मुलीपेक्षा २० वर्षांनी मोठ्या असलेल्या विजापुरेंना देण्याचा निर्णय ‘तुझ्या लग्नामुळेतरी या गरिबीची कोंडी फुटेल’, हे त्यांच्या आईचे व्याकूळ उद्गार, मनाविरुद्ध लग्न झाल्यामुळे तगमग, तडफड, बाईंची प्रेमभावी वृत्ती आणि सत्य परिस्थिती यांतली तफावत पचवल्यावर त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रयत्न केले. आपले दुःख विसरण्यासाठी त्यांनी लोकांची सेवा करण्याचे ठरवले. नर्सिंगचा कोर्स करून त्यांनी नर्सिंग होम काढले. त्यांनी हेल्थ व्हिजिटरचा कोर्स केला आणि पुढे हीच नोकरी केली.प्रियकर आणि मुले यांच्यामध्ये त्यांची चिरफाळल्यासारखी स्थिती झाली. शेवटी मनस्वी आणि जिद्दी स्वभावामुळे त्यांनी बंडखोरीचा निर्णय घेतला. चौदा वर्षांच्या सहजीवना नंतर ग.वा.बेहेरे आपल्या पत्नीकडे परत गेले. आनंदीबाईंचा दारुण पराभव झाला. आत्मचरित्रात त्यांनी आपली चूक कबूल करण्याचे धैर्य दाखवले. बेहेर्यांचे वास्तव रूप स्वीकारल्यावर पतीचे गुण कबूल करून त्यांच्यावर केलेल्या अन्यायाचे त्यांनी परिमार्जन केले तसेच बेहेर्यांबरोबर घालवलेले आनंदाचे क्षणही त्यांनी नाकारले नाहीत.
चांगले जगण्याची तीव्र इच्छा हे त्यांच्या जीवनाचे सूत्र होते. त्यांचा मनस्वीपणा, प्रणयाच्या अनुभवात आपले सर्वस्व झोकून देण्याची बेदरकार वृत्ती आणि त्याचबरोबर फसवणूक, अपमान, मानहानी यांतल्या विरोधाभासामुळे मराठीत एका परखड आत्मचरित्राची भर पडली.विवाहबाह्य संबंधाची वाट चालताना वारंवार आत्मसमर्पण करणा-या आनंदीबाई विजापुरे ही सुद्धा स्त्री जीवनाची अंगेच होत.
आनंदीबाई विजापुरे यांचे “अजुनी चालतेच वाट” मध्ये त्या म्हणतात, मी जे लिहिले आहे ते विरंगुळ्यासाठी. जेव्हा माणसाच्या अंत:करणात दु:ख दाटून येते तेव्हा त्याला कुठेतरी वाट दिल्याशिवाय रहावत नाही.”
या आत्मचरित्राला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार लाभला.
आनंदीबाई विजापुरे यांचे २० ऑक्टोबर १९९९ रोजी निधन झाले.

— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800