सुधा नरवणे
१९६० नंतर उदयास आलेल्या पुरुष कथाकारांइतकेच कमल देसाई, विजया राजाध्यक्ष, सरिता पदकी, तारा बनारसे व वसुधा पाटील या लेखिकांचे कथालेखन कर्तृत्व कारणीभूत ठरले. यामध्ये प्राधान्याने लेखन करणा-या सुधा नरवणे ह्या कथा लेखिका अग्रगण्य मानल्या जातात.
“आकाशवाणी पुणे, सुधा नरवणे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहेत…”
हा त्यांचा आवाज आणि सकाळच्या सातच्या बातम्या यांचे वर्षानुवर्षे एक समीकरण झाले होते. हा उभ्या महाराष्ट्राला परिचित असलेल्या आवाजामुळे सुधा नरवणे श्रोत्यांच्या आयुष्यभराच्या सुहृद झाल्यात.
प्रसिद्धी मिळूनही माणूसपण न हरवलेल्या व लेखिका म्हणून रसिकांना अखेरपर्यंत भेटत राहिलेल्या माहेरच्या पारसनीस असलेल्या सुधा नरवणे यांचा जन्म १४ सप्टेंबर १९३० रोजी झाला. प्रा. एस. आर. पारसनीस हे त्यांचे वडील.. सुधा नरवणे या मुळात लेखिका होत्या.लिखाणाची आवड असल्याने सुधा नरवणे यांनी कथा, कादंबरी, निबंध, नियतकालिकांमधील लेख असे विपुल लेखन केले. लेखनाची आवड त्यांनी वृद्धापकाळापर्यंत जपली.
आपल्या लघुकथांबरोबरच आकाशवाणीवर त्या आपल्या आवाजासाठी देखील प्रसिद्ध होत्या. त्या केवळ निवेदन क्षेत्रापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत तर साहित्य विश्वातही त्यांनी मुशाफिरी केली इतकच नाही तर सर्जनशील लेखिका म्हणून ही त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली.
त्या काळात नावाजलेल्या सत्यकथा, किर्लोस्कर माणूस, हंस यांसारख्या नियतकालिकांमधून सुधाताईंनी लेखन केले. ललित लेखनाच्या क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी महत्त्वाचीच होती..
लघुकथा, लघुनिबंध लेखनासह त्या अनुवादही उत्तम करत. ललित लेखनाच्या क्षेत्रातही त्यांनी महत्त्वाची कामगिरी केली. त्यांच्या लघुकथा किर्लोस्कर, माणूस, सत्यकथा, स्त्री, हंस अशा अनेक नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत.
त्या काळात त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली.
सुधाताईंची पुस्तके
संपादन : आपल्या आत्म्यांची लुटालूट (अनुवादित, मूळ Harvesting Our Souls, लेखक – अरुण शौरी) इतवा मुंडाने लढाई जिंकली (आदिवासी जीवनावरील कादंबरी ), इंद्रधनू (कथासंग्रह), ख्यातनाम इतिहासकार (अनुवादित, मूळ Eminent Historians, लेखक – अरुण शौरी), घायाळ जननी : माता, कन्या, मातृत्व, ते अठरा सेकंद, दॊलाचल (कथासंग्रह) निकोलला त्याच्या आईचे मारेकरी सापडले का (अनुवादित, मूळ Eleni, लेखक : निकोलस गेग). मरालिका (कथासंग्रह) लामणदिवा ही त्यांनी लिहिलेली आणि अनुवादित केलेली काही पुस्तके
सुधा नरवणे यांनी “दोलाचल”, “सरणं गच्छामि”, “इंद्रधनु”, इ. असे एकूण सात कथासंग्रह लिहिले. आदिवासींच्या जीवनावर आधारलेला कथासंग्रह लिहून त्यांनी वंचित घटकांची अवस्थाही मांडली तसेच एखादी स्त्री वेगवेगळ्या भूमिकांमधून कशी वावरते व पुरुषप्रधान संस्कृतीत जगताना तिला असंख्य वेदनांचा सामना कसा करावा लागतो याचे सखोल नी वास्तववादी चित्रण त्यांनी आपल्या लेखनातून मांडले.
मानवी मनातील आंदोलने त्यांनी आपल्या कथेत चित्रीत केली तर घटनांचा आधार घेऊनही पात्रांची मानसिक आंदोलने किती समर्थपणे टिपता येतात याचा प्रत्यय सुधा नरवणे यांच्या कथा वाचकांना आणून देतात. मानसिक संघर्षाचे वेधक चित्र त्यांच्या “ध्यास” सारख्या कथेत उमटते तर “विरत गेलेलं धुकं”, “तिचं स्वप्न”, दोलाचल”, ऋणमुक्ता” या यशस्वी कथांत देखील अभिव्यक्तीचे सुत्र त्यांनी कायम ठेवले.
त्यांना राज्य पुरस्काराबरोबरच अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी ही सन्मानित करण्यात आले.
रेडिओ ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या कानात घर करून राहणारा, एखादी घरातली व्यक्ती असावी असा स्नेह आपल्या आवाजातून कमावणा-या व आवाजाच्या बळावर आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या लेखिका व आकाशवाणीच्या निवेदिका सुधा नरावणे यांचे २३ जुलै २०१८ रोजी निधन झाले.
— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
संगीता कुलकर्णी यांनी सुधा नरवणे यांच्या साहित्य विश्वातील कामगिरीचा घेतलेला विस्तृत आढावा सुधाताईंच्या
या पैलूवर सुरेख प्रकाश टाकतो.