Saturday, July 27, 2024
Homeसाहित्यसाहित्य तारका : 29

साहित्य तारका : 29

कमलाबाई फडके

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक क्रांतीकारी क्षण येत असतो व त्या क्षणात असे काही घडते की सगळे ठरवलेले भविष्याचे बेत उलटेपालटे होतात मग एका वेगळ्याच वळणाने आयुष्य जाऊ लागते. असेच ना. सी. फडके आणि कमला फडके या दोघांचेही आयुष्य एका अनपेक्षित क्षणी पूर्णपणे बदलले आणि त्याचा परिणाम म्हणून ज्या अनेक घटना घडल्या त्यातली एक घटना म्हणजे मराठी साहित्याला लाभलेली एक दर्जेदार लेखिका कमला फडके.

१९१६ च्या नागपंचमीला कमला फडके यांचा जन्म गोपाळराव दीक्षित आणि राधाबाई दीक्षित ह्या दांपत्यापोटी झाला.
लेखिका कमला फडके, माहेरच्या कमल दीक्षित या लेखक ना.सी. फडके यांच्या विद्यार्थिनी आणि द्वितीय पत्‍नी.
त्यांचे सहजीवन म्हणजे साहित्यप्रेमाची झालर असलेला एक सहप्रवासच.
स्त्री मासिकात प्रसिद्ध झालेल्या एका इंग्रजी कथेचे सुंदर भाषांतर केलेली ‘पट्टेवाला’ ही कथा ही त्यांची लेखनाच्या प्रांतात सुरुवात होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यानंतर ना.सी फडके यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे लेखन कौशल्य वाढतच गेले.

लेखक ना.सी. फडके  यांच्या “झंकार” या साप्ताहिकात त्यांचे लेख, मुलाखती व कथा प्रसिद्ध होऊ लागल्या. या साप्ताहिकात त्यांनी भरपूर लेखन केले. लेख, कथा, मुलाखती तसेच त्याच साप्ताहिकात ही त्या इंग्रजी साहित्याचा परिचय करून देणारे एक सदर लिहीत. आचार्य रजनीश (ओशो) यांच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित होऊन त्यांनी त्यांच्या बऱ्याच इंग्रजी पुस्तकांचा मराठी अनुवाद ही केला.
त्यांनी १९३९ साली हिल्टनच्या एका इंग्रजी कादंबरीचा अनुवाद ‘निष्कलंक’ ह्या नावाने केला.बाबुराव पेंटर यांचे मुखपृष्ठ लाभलेल्या व नागपूरच्या वीणा प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या या कादंबरीला दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनात पारितोषिकही दिले गेले.
अनंत अंतरकरांच्या हंस आणि मोहिनी या मासिकांत त्यांच्या अनेक विनोदी कथा प्रकाशित होत व अन्य कथा किर्लोस्कर आणि स्त्री या मासिकांत ही प्रसिद्ध होत असत.

१९४२ साली “मकरंद’” हा त्यांच्या कथांचा संग्रह ही प्रसिद्ध झाला. त्यांच्या “धुक्यात हरवलेली वाट”’, ‘”जेव्हा रानवारा शीळ
घालतो’” अशा आगळ्या वेगळ्या नावांच्या त्यांच्या कादंबऱ्या अतिशय वाचनीय ‘बंधन’ ही कादंबरी तर मिरजेच्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका डॉक्टरच्या आयुष्यावरील. “भूल’” यामध्ये चुकून घडलेल्या खुनाची किंमत चुकवायला लागलेल्या एका पुरुषाची कथा तर “‘पाचवे पाऊल’” एका अणुशास्त्रज्ञाची कथा आणि संगीत विश्वाची पार्श्वभूमी असलेली “आसावरी”  अशी अनेक पुस्तके तसेच ना.सी फडके ह्यांची गाजलेली भाषणे’ (१९४०) आणि ‘”थोरांच्या सहचरिणी”’ अशी वेगळी पुस्तकेही प्रसिद्ध..

१९७१ मध्ये जगातले प्रथम हृदयारोपणाची शस्त्रक्रिया करणारे डॉ. ख्रिश्चन बर्नाड यांचे ‘”वन लाइफ”’ हे आत्मकथन त्यांनी ‘हृदयाची हाक’ या नावाने अनुवादित केलेले व किर्लोस्कर प्रेसने प्रसिद्ध केलेले हे पुस्तक खूप गाजले.
त्यांची स्वतःची एक वेगळी शैली होती. अतिशय मनोहारी निसर्ग वर्णने, ओघवती भाषा, वाचकाला बांधून ठेवणारे कथासूत्र आणि व्यक्तिरेखा यामुळे त्यांच्या कादंबऱ्या मराठी वाचकांना आवडल्या.
त्यांनी स्वतःचा असा खास ठसा उमटला तो दोन लेखन प्रांतांत एक “‘त्रिवेंद्रमची सफर’ आणि ‘उरकमंडची यात्रा’” ही दोन अतिशय चित्तवेधक प्रवासवर्णने.
दक्षिण भारतातल्या कला, संस्कृती, खाद्य पद्धती आणि तिथे भेटलेल्या माणसांचे अतिशय वेधक चित्रण या प्रवासवर्णनांमध्ये आहे.

तर दुसरा प्रांत होता विनोदी कथांचा… कमला फडके यांनी विनोदी व खेळकर अशा बऱ्याच कथा लिहिल्या. त्यांच्या कथा मध्ये घटनांना बरेच प्राधान्य पण निवेदनशैली मात्र अगदी आधुनिक व अतिशय रसाळ अशी.
कमला फडके यांनी नागभूषण या प्रख्यात गुरूकडून कथ्थक नृत्याचे शिक्षण घेतले. ना.सी. फडके यांच्या जानकी या नाटकात त्यांनी केलेली मुख्य भूमिका  चिंतामणराव कोल्हटकर सारख्यांनीही वाखाणली होती… त्याचबरोबर त्या दिलरूबा वाजवीत असत.. सुंदर गात असत नी रेखाचित्र काढीत असत. परंतु त्यांचा खरा आनंद शब्दांचा सानिध्यात होता..
तवंदीच्या छोट्याशा खेड्यात वाढलेल्या मराठी साहित्यातल्या ख्यातनाम कवयित्री व कथालेखिका म्हणून प्रसिद्ध असलेल्या इंदिरा आणि कमला या दोन बहिणी म्हणजेच इंदिरा संत व कमला फडके… त्यांना घडविण्यात ना. मा. संत आणि ना. सी. फडके या दोन सिद्धहस्त लेखकांचा जे त्यांचे जीवनसाथी होते त्यांचा मोठा वाटा होता हा केवढा मोठा अद्भुत योगायोग…!साहित्यातल्या ख्यातनाम कवयित्री व कथालेखिका म्हणून प्रसिद्ध असलेल्या कमलाताईंचे ६ जुलै १९८० रोजी निधन झाले.

संगीता कुलकर्णी

— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८