Saturday, September 14, 2024
Homeलेखसाहित्य प्रेम

साहित्य प्रेम

प्रत्येक व्यक्तीला कशाचं अन कशाचं प्रेम असतं. किंबहुना असावं. हो, प्रेमच! कारण छंद म्हणलं, की तो आपल्याकडून काही मागणी करत असतो. त्याला आपण हवे असतो. आणि त्याला आपल्याकडून पूर्ण सहकार्य लागतं. पण प्रेम मात्र कोणावरही आणि अगदी एकतर्फीसुद्धा करता येतं. त्याला फक्त लागतं एक हळवं, संवेदनाशील मन ! असंच माझ्या प्रेमाचं एक रम्य ठिकाण म्हणजे साहित्य! तो माझा विसावा आहे.

या प्रेमाची एक खूप काही चांगली बाजू अशी आहे, की ते निरूपद्रवी आहे. एक रिकामा कोपरा फक्त लागतो.. मग आपल्याला त्या विषयात अगदी एकट्याने रमता येते. आपलाही कोणाला उपद्रव होत नाही.

साहित्यप्रेमात एकप्रकारची ऊर्जा मिळते. उत्साह मिळतो. समजा, आपण एखाद्या प्रसंगानंतर खूप निराश आहोत, खूप खचलेले आहोत, तर त्यावेळी चांगले साहित्य आपल्याला आशा देते, उमेद देते, ताकद देते. जीवनाकडे पाहण्याचा एक आनंदी चष्मा देते. आपण आपले दुःख कोणा व्यक्तीजवळ मोकळे करायचे म्हणलं व दुसरी व्यक्तीही आपल्याला धीर देण्याऐवजी आपल्यालाच सहानुभूती दाखविणारी भेटली, तर आपला दृष्टिकोन निगेटिव्ह होऊ शकतो. पण साहित्याकडून मात्र असा निगेटिव्ह दृष्टिकोन कधीच मिळत नाही.. ते एका छान दिशेकडे, वाटचालीकडे घेऊन जाते..

साहित्य आपल्या बरोबरीने, आपल्या अगदी किलबिलत्या वयापासून, चिऊताई, चिऊताई दार उघड पासून आपल्याबरोबर मोठे मोठे होत जाते. किलबिलते वय, कुजबुजणारे वय, थरथरणारे वय म्हणजे अगदी म्हातारपणाची काठी हातात आल्यावरही ते आपली सोबत करणं कधी सोडत नाही.

दुनियेत 64 कला आहेत असे म्हणतात. खरंच, आपल्याकडे प्रत्येक कलेवर अनेक पुस्तके आहेत. ती वाचून आपली कला आपण शत अंगानी समृद्ध करू शकतो.

लहानपणी बडबडगीते, पुढे कविता, निबंध, ललित साहित्य, चरित्र, आत्मचरित्र, विनोदी साहित्य, विडंबनात्मक, कथा, कादंबऱ्या, नाटकं, ऐतिहासिक, भौगोलिक साहित्य, तंत्रज्ञान विषयक, विज्ञानविषयक, ज्योतिष, संगीत, अद्धयात्म, शेती, प्राणी-पक्षी जगत, बँकिंग, पौराणिक विषयांची व्याप्ती मोजता येणार नाही. नानाविध विषयांवर आज साहित्य उपलब्ध आहे आणि अजुनी साहित्य लिहिणे थांबत नाही, आणि ना ही, प्रकाशित होऊन बाजारात आणि ग्रंथालयांमध्ये उपलब्ध होणे.

पुस्तकांमुळे आपला दृष्टिकोन व्यापक होतो. ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात.
आपल्या डोळ्यासमोर आपण काही आदर्श ठेवत असतो. ते जसे त्या व्यक्तींच्या वर्तनातून आपण उचलतो, तसें कधी कधी साहित्यातूनही.

विज्ञानातील नविन नविन शोध आपल्यापर्यंत या साहित्यामार्फतच पोचतात. साहित्यामुळे आपली छान करमणूकही होते. त्यामुळे आपल्या मनावरील ताण हलका व्हायला खूप मदत होते.

विविध भाषांतील साहित्य आपण भाषांतरित, अनुवादित स्वरूपात वाचू शकतो.
परकीय संस्कृतीची ओळख आपल्याला साहित्यातूनच होते.

साहित्यामध्ये पत्रलेखनाचेही विशेष योगदान आहे. आपण आपल्या भावना दुसऱ्यापर्यंत अगदी परिणामकारक स्वरूपात पोचवू शकतो.
आपण लिहिलेल्या, आपण अनुभवलेल्या गोष्टींच्या साहित्यिक आठवणी आपल्या आयुष्याचा एक कोपरा बनून राहिलेल्या असतात.
नानाप्रकारचे सुविचार, सुभाषिते यांचीही भरपूर मुबलकता साहित्यात दिसून येते. आत्मचरित्रांमधून आपल्याला प्रेरणा मिळतात.

विश्वकोष..अहो किती किती म्हणून विषय सांगू ? साहित्याला कोणताही विषय वर्ज्य नाही. ना ही कोणता सुटलेला.आपले जीवन संपेल पण साहित्य कधीच संपणार नाही. आणि आता तर e साहित्य !

कित्येक दुर्मिळ ग्रंथाना आज अमूल्य किंमत आहे. याउलट ज्यांना अशा दुर्मिळ पुस्तकांचे वाचनमूल्य माहित नाही, अशी पुस्तके आपल्याला अगदी रस्त्यावरील सेकंड हॅन्ड पुस्तके विकणाऱ्या माणसाकडे अगदी अल्प किमतीतही मिळून जातात.

काय वाचावे याची निवड करणेसुद्धा तितकेच महत्वाचे आहे.कोणी तास अन तास नुसते वर्तमानपत्रच वाचत बसतील. कोणी पोथ्याच वाचत बसतील तर कोणी नुसते अश्लील साहित्य !
आवड आपली आपली !

अंध व्यक्तींसाठी ब्रेलची सोय आहे. पण आता तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे की अंध व्यक्ती ब्रेलशिवायही वाचू शकते.

वाचणाऱ्याला बंधन नाहीच. फक्त मनात आस पाहिजे ज्ञान मिळविण्याची.

अहो वर्तमानपत्रातील साहित्य आज रद्दी म्हणून जरी विकायला गेलं तरी त्याला किंमत मिळते.अहो, थोडे गमतीने म्हणते.

‘दुसऱ्याच्या ‘चेहऱ्यावरील भाव कसे वाचायचे’ या विषयावरही साहित्य आहे…! आता बोला..! तर आपण काहीच वाचत नसाल तर वाचायला लागणार ना ?

अनुराधा जोगदेव

— लेखन : अनुराधा जोगदेव. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

Previous article
Next article
RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. साहित्याचा छंद नाही प्रेम पाहिजे

    वाचनीय व संग्रही लेख

    गोविंद पाटील सर जळगाव जिल्हा जळगाव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments