मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी गणेशोत्सव साजरा केल्याशिवाय राहत नाही. त्याला सिंगापूर अपवाद नाही.
विशेष म्हणजे सिंगापूरच्या महाराष्ट्र मंडळाची स्थापना होऊन यंदा तीस वर्षे पूर्ण झाली. सुरुवातीला एखाद्या देवळाच्या हॉलमध्ये गणेशपूजा आरती, सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रसाद असे एक दिवसीय कार्यक्रम असत. हळूहळू त्याची व्यापकता वाढत गेली. आणि ग्लोबल इंडीयन इंटरनॅशनल स्कूल येथे पाच दिवसांचा गणेशोत्सव सुरू झाला. रोज सकाळ संध्याकाळ आरती, एक दिवस अथर्वशीर्ष पठण, स्थानिक आणि पाहुण्या कलाकारांचे दर्जेदार सांस्कृतिक असे भरगच्च कार्यक्रम सुरू झाले. परंतु ते शाळेच्या प्रांगणात असल्याने त्याची व्यापकता मर्यादित होती.
यावर्षी मात्र मंडळाने प्रथमच खुल्या प्रांगणात मोठा मंडप उभारून सार्वजनिकरीत्या पाच दिवसांचा गणेशोत्सव योजिला. मंडळाची कार्यकारिणी, स्वयंसेवक तसेच अनेक सभासदांनी अथक परिश्रम करून तो उत्कृष्टपणे पार पडला.
सिंगापूरमध्ये कुठलाही धार्मिक कार्यक्रम सार्वजनिकरित्या पार पाडायला खूप परवानग्या घ्याव्या लागतात. खूप नियम पाळावे लागतात. हे शिवधनुष्य लीलया पेलत शहराच्या मध्यवर्ती असलेल्या लिटिल इंडिया या भागात भव्य मांडव उभारून अत्यंत सुंदर सजावट करून गणपती बसवण्यात आला. पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टने श्रींची अत्यंत सुंदर मूर्ती मंडळास भेट दिली आहे. मंडळाच्या हौशी पुरोहितांनी मनोभावे रोजची पूजा सांगितली. मंडळाचे अध्यक्ष व त्यांच्या सुविद्या पत्नी यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना झाली.
रोज सकाळ संध्याकाळ पखववासज, झांज आणि पेटीच्या गजरात खणखणीत आरत्या, रविवारच्या सकाळी अथर्वशीर्ष सहस्त्रावर्तन असे मंगल कार्यक्रम आयोजित केले होते. मंडळाच्या सदस्यांनी स्वेच्छेने प्रसादासाठी सुक्या मेव्याच्या पाकीटांचे आयोजन केले.
सहस्त्रावर्तनाच्या दिवशी सिध्दहस्त चित्रकार श्री. श्रीरंग केळकर यांनी बाकी लोक अथर्वशीर्ष पठण करत असताना अथर्वशीर्ष उलट्या बाजूने कागदावर लिहून नवा विक्रम प्रस्थापित केला. त्याच बरोबर भारताच्या इतर राज्यांच्या मंडळांतर्फे उत्तमोत्तम सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले गेले आणि त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला.
येथील भारतीय दूतावासाच्या पदाधिकाऱ्यांनाही कार्यकारिणीने आरतीसाठी आमंत्रित केले होते.तसेच मंडळाने या वर्षी इतर सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींना अगत्याचे आमंत्रण देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला.
सिंगापूर येथील नामवंत सांस्कृतिक कला संस्थांना कला सादर करण्यासाठी आमंत्रण दिले. त्यात भरत नाट्य, कथ्थक, ओडिसी, लोककला, वादन, गायन तसेच इतर कलाविष्कार सादर करण्यात आले.
मंडळाने महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रदर्शन म्हणून एक छोटे सांस्कृतिक प्रदर्शन देखील योजिले होते, ज्यामध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीची झलक दर्शवण्यात आली. त्यालाही सुंदर, सकारात्मक प्रतिसाद लाभला.रविवारी संध्याकाळच्या आरतीला अभूतपूर्व गर्दी लोटली होती. पण कुठेही गडबड गोंधळ झाला नाही. सर्व स्वयंसेवक व कार्यकारिणीने गर्दीला उत्तमपणे सांभाळले.
या सर्व कार्यक्रमाचा मानबिंदू म्हणजे रोज होणारी ढोल ताशाची प्रात्यक्षिके !! ढोल ताशाच्या गजराने लोकांना एकदम महाराष्ट्रात असल्याचा भास झाला. तेवढी एक गोष्ट इथे आपल्याला मिळत नाही याची पूर्वी वाटणारी खंत वाटेनाशी झाली. २०२१ साली मंडळाच्या “शिवनेरी” ढोल ताशा पथकाची सुरुवात झाली. सुरुवातीला मंडळाकडे एक ढोल होता. त्यानंतर दरवर्षी ढोलांची संख्या वाढत आहे. आता मंडळाकडे पंधरा ढोल आहेत. इच्छुक वादकांना दर शनिवारी दुपारी प्रशिक्षण दिले जाते. अश्या प्रशिक्षित कलाकारांनी कित्येक आठवडे सराव करून शिस्तबध्द आणि दर्जेदार सादरीकरण केले. यात मनाला भावलेली गोष्ट म्हणजे यातला तरुण सभासदांचा सहभाग!! तरुण मुले अगदी समरसून सर्व कार्यक्रमात भाग घेताना दिसत होती.
पाचवे दिवशी आरतीनंतर ढोल ताशाच्या गजरात छोटेखानी मिरवणूक काढली गेली. त्यात लोकांनी फुगड्या, लेझीम अश्या पारंपारिक नृत्य प्रकारांचा आनंद लुटला.आणि त्यात थेट पुण्याच्या मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीची झलक दिसली.. सर्व वातावरण मंगलमय आणि उत्साहाचे होते. भाविकांची गर्दी असूनही स्वयंसेवकांनी गर्दीचे उत्तम नियोजन केले. त्यामुळे कुठे गदारोळ अथवा चेंगराचेंगरी न होता सर्वांना बाप्पाचे उत्तम दर्शन मिळाले. विघ्नहर्त्या गजाननाने सर्व मराठी जनांचे मानस जाणून सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पाडू दिले. जणू काही त्यालाच हा उत्सव दर वर्षी अश्या पद्धतीने साजरा व्हावा असे वाटत असावे.
सार्वजनिक गणेशोत्सवाचा पाया लोकांनी सांघिक कामगिरी करणे हा आहे. त्याचे उत्तम उदाहरण सिंगापूर महाराष्ट्र मंडळाने दाखवून दिले. सर्वांनी आपल्या सवडीनुसार या कार्यात समरसून भाग घेतला. येथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की सिंगापुरात गणेश चतुर्थीला सुट्टी नसते. तरीही कार्यकारिणी आणि स्वयंसेवकांनी आपापले नोकरी उद्योग सांभाळून सार्वजनिक कार्याला वेळ दिला. सर्व कार्यक्रम सुनियोजित आणि पारंपारिक होते. त्यात कुठेही मोठे लाऊडस्पीकर, गुलालाची उधळण, डिजे, अमंगळ गाणी किंवा विचित्र नृत्य अथवा कर्णकर्कश्श संगीत नव्हते. कुठेही गडबड गोंधळ झाला नाही. रोज सुरेल आरत्या, उत्तम सांस्कृतिक कार्यक्रम आणि भक्तांचा सिंगापूरच्या शिस्तीबहेर न जाणारा सुयोग्य उत्साह यामुळे गणेशोत्सव त्याच्या खऱ्या रूपात साजरा झाला.
श्रींच्या इच्छेने दर वर्षी असा सार्वजनिक गणेशोत्सव सिंगापुरात पार पडो आणि मराठी झेंडा उंचावत राहो हीच त्या सुखकर्ता बाप्पाकडे प्रार्थना केली !!
— लेखन : विनया रायदुर्ग. सिंगापूर
— संपादन:देवेंद्र भुजबळ
— निर्माती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800