Wednesday, September 11, 2024
Homeलेखसिंहासनावर न बसलेला राम

सिंहासनावर न बसलेला राम

येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्देत श्रीराम मंदिरात राममूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.या निमित्ताने हा विशेष लेख …
– संपादक

एक श्रेष्ठ राजा, प्रेमळ भाऊ, एकपत्नी, एकवचनी, वीर, प्रजेला पोटच्या पोरासारखं प्रेम केल्याने प्रजेचा लाडका, न्यायप्रिय, एकवचनी तत्वनीष्ठ आणि या तत्त्वांसाठी वैयक्तिक सुखाचाही त्याग करणारा…अशा कितीतरी गुणांनी श्रीराम हे एक व्यक्ति
राहिले नसून भारतीय संस्कृतीतील विचारप्रणाली (school of thoughts) झाले आहेत.

श्रीरामांविषयी जगात अनेक साहित्य उपलब्ध आहे, तसेच लहानमोठ्या मंदिरांतून त्यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केल्याचे आढळून येते.
राम आणि सीता हे राजसिंहासनावर विराजमान झाले आहेत. लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे बाजूला उभे आहेत; हनुमान पायापाशी बसले आहेत, असे अनेक फोटो घरोघरी भिंतीवर दिसून येतात. राम आणि सीता यांच्या मूर्ती अनेक मंदिरांतून पहायला मिळतात. मी अकरावीत पुणे विद्यार्थी गृहाच्या वसतीगृहात रहात असताना, तेथील प्रांगणातल्या मंदिरात राम आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती मी पाहिल्या होत्या. श्रीरामांच्या जीवनकार्याविषयी उपलब्ध साहित्यांतून एक बाब दिसून येते. काही दिवसांपूर्वी वाटसॅपवर याबद्दलची पोस्ट वाचली होती. तीच मी माझ्या शब्दांत मांडण्याचा प्रयत्न करतो.

रामकथेची सुरुवात होते, अयोध्येपासून.
राजा दशरथ हा तिथला राजा. वयोवृद्ध दशरथ राजा आपल्या थोरल्या राजपुत्राला (राम) अयोध्येच्या सिंहासनावर राज्याभिषेक करण्याचे ठरवतो. मात्र राणी कैकेयी या निर्णयाला विरोध करून दशरथाने तिला एका युद्धात दिलेल्या वचनाची आठवण करून रामाऐवजी तिचा मुलगा भरताला राजा करून आणि त्याच वेळी रामाला चौदा वर्षं वनवासात पाठवून वचनपूर्ती करण्याचे सुचवते. दशरथ पेचात पडतो. मात्र खुद्द राम यातून मार्ग काढून सिंहासनाचा मोह सोडून वनवासात जाण्याचा निर्णय घेतो. सीता आणि लक्ष्मणही रामासोबत वनात जाण्याचा निर्णय घेतात. काही दिवसांनी पुत्रविरह आणि पश्चात्तापाने राजा दशरथाचे निधन होते.

काही दिवसांनी आपल्या आजोळी गेलेला भरत अयोध्देत परततो. त्याला जे दिसतं आणि कळतं, त्याने तो उद्विग्न होतो. सिंहासनावर खरा हक्क रामाचा असूनही केवळ आपल्या आईच्या सांगण्यावरून रामाला वनवासात पाठवलं गेलं ही वस्तुस्थिती मनाला लागून तो वनवासात रामाला परत आणायला जातो. त्याच्या भातृप्रेमाने राम गहिवरून जातो. मात्र एकवचनी हे ब्रीद अंगी बाळगलेला राम वनवासाची चौदा वर्षं संपल्याशिवाय अयोध्देला परतायला विनयपूर्वक नकार देतो. उलट आपण परतेपर्यंत अयोध्दा सांभाळण्याची सूचना करतो. भरतही सांगतो की, “ठीक. तुमची चौदा वर्षं वाट पाहत मी अयोध्दा सांभाळीन. मात्र सिंहासनावर तुमच्या पादुका ठेवूनच “.

अयोध्देत आल्यावर भरत सिंहासनावर रामाच्या पादुका ठेवतो.
पुढची कथा विलक्षण वळण घेणारी आहे.
भरत अयोध्देत न रहाता, अयोध्देच्या बाहेर नंदीग्राममध्ये जाऊन रहातो. इथे निर्माण होतो एक पेच-लक्षात घ्या; राज्याला राजा नाही. दशरथाचे निधन झालंय. थोरला राजपुत्र राम (जो सिंहासनाचा खरा वारसदार आहे आणि तो लोकप्रियही आहे), त्याची पत्नी सीता आणि दुसरा राजपुत्र लक्ष्मण (स्वेच्छेने गेले तरी ते अन्याय्य होते) चौदा वर्षांसाठी वनवासात गेलेत, अशा वेळी काय काय होऊ शकते ? हे आपण पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर पाहिले आहे. तेव्हा मी विद्यापीठात नोकरीत होतो. सगळेजण ट्रान्झिस्टर लावून बातम्या ऐकत होते.

नवी दिल्लीत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर त्यांच्या अंगरक्षकाने गोळीबार केला, सोनिया गांधींनी त्यांना जखमी अवस्थेत दिल्लीतल्या एका हाॅस्पीटलमध्ये दाखल केले, उपचार चालू आहेत, अशा बातम्या येत होत्या. सगळीकडे चिंता, भितीचे वातावरण पसरले होते. उपचारादरम्यान इंदिराजींचे निधन झाले, ही बातमी एका परदेशी माध्यमातून आली. मात्र भारतीय प्रसारमाध्यमे ही बातमी देत नव्हते. यावरून आपली माध्यमं किती मागास आहेत याची चर्चा होत असताना दिल्लीत अनेक घटना घडत होत्या. काँग्रेसचे एक नेते राजीव गांधी दिल्लीबाहेर होते. त्यांना तातडीने बोलावण्यात आले ; आणि त्यांची नवीन पंतप्रधान म्हणून निवड केली गेली. राष्ट्रपतींनी त्यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली आणि मगच भारतीय माध्यमांतून इंदिरा गांधींच्या निधनाची बातमी दिली गेली. असं का झालं ? भारतीय माध्यमांनी ही बातमी उशीरा का दिली ? याचे कारण राज्यशास्त्रात आढळते. कोणत्याही राज्याला थोडा वेळ का होईना, राज्यप्रमुख नसेल तर काय काय होऊ शकते ?

  • जनता बंड करू शकते, – त्याचे पर्यावसान दंगलीत होऊ शकते.
  • सैनिक विद्रोह करू शकतात.
  • एखादा महत्त्वाकांक्षी माणूस स्वतःला राज्याचा प्रमुख म्हणून घोषित करून सत्ता काबीज करतो. याचा विपरित परिणाम होऊन अफवांचे पीक पसरू शकते. सार्वजनिक सेवा आणि एकूणच जनजीवन विस्कळीत होऊ शकते. अशा वेळी भिती असते, परकीय आक्रमणाची.

अयोध्देत तरी काय वेगळी स्थिती होती ?
भरीला भर म्हणून वेगवेगळ्या मानसिकतेत जगणाऱ्या राजघराण्यातील स्त्रिया. पुत्रविरहाने दु:खी कौसल्या, असाच विरह अनुभवत असलेली सुमित्रा, पश्चात्तापात होरपळणारी कैकेयी, पती नंदीग्रामला संन्यस्त जीवन जगताना व्याकूळ झालेली (भरताची पत्नी) मांडवी, पती लक्ष्मणाच्या वनवासात गेल्याने दु:खी झालेली उर्मिला यांना सांत्वनपर सांभाळून घेऊन चौदा वर्षं अयोध्दा सुरक्षित ठेवण्याचं अवघड काम शत्रुघ्ननं केलं.

राम वनवासातून अयोध्देत परतल्यावर भरत भक्तिभावाने त्याचे स्वागत करतो. राम भरत भेटीची अनेक चित्रं कॅलेंडर्स, टीव्ही मालिकांतून आणि चित्रपटांतून पहायला मिळतात. ते दृश्य भारतीय संस्कृतीतील बंधुप्रेमाचं आयकाॅन मानलं जातं.
मात्र इथेही “तुमच्या पस्चात मी हे राखलं” असं शत्रुघ्न म्हणताना कुठंच दिसत नाही. शत्रुघ्न दिसतो तो पुढे फक्त राम राज्याभिषेकाच्या वेळी रामावर चव-या ढाळताना. म्हणूनच शत्रुघ्न या महानायकाचे रामायणातील स्थान महत्त्वाचे आहे असं मला वाटतं.

श्रीरामांच्याविषयी जगात विपुल साहित्य उपलब्ध आहे.मात्र यातही शत्रुघ्नला फारसे स्थान दिसून येत नाही.
शत्रुघ्नचं कार्यक्षेत्र असलेल्या भारतातही त्याची मंदिरं फारशी नाहीत. शत्रुघ्नची कहानी आहे,- शौर्याची, धैर्याची, बंधुप्रेमाने ओथंबलेल्या राज्य राखणाऱ्या पराक्रमी वीराची आणि प्रसिध्दीपराड्मुख नेत्याची. कथा आहे ही सिंहासनावर न बसलेल्या राजाची !

सतीश शिरसाट

— लेखन : प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments