Saturday, October 5, 2024
Homeलेखसीता उवाच……

सीता उवाच……

“शुक्…शुक्…अहो ताई, अहो मावशी, इकडे…इकडे…गाभाऱ्यात…मी…मी सीता बोलतेय…

हो, मीच ती रामायणातील रामपत्नी सीता…
अहिल्या, द्रौपदी, सीता,
तारा, मंदोदरी तथा
पंचकन्या स्मरे नित्यं,
महापातक नाशनम्…

या पंचकन्या स्तोत्रांमधील एक कन्या… सीता…

का हाक मारली म्हणून विचारताय! अहो, काल रामनवमी झाली ना! इतकी गर्दी झाली होती देवळात…जो तो रामाचे गुण गात होता. ते ऐकून मी तर भारावून गेले होते अगदी…का म्हणून काय विचारता! आपल्या पतीचे गुणगान ऐकून कोणत्या भारतीय स्त्रीला अभिमान वाटणार नाही बरं! त्यातही अवघ्या दुनियेत ज्याच्या आदर्शाचा डंका वाजतो असा माझ्या रामासारखा पती असताना…

पण मग माझा स्वर असा दुःखी का असा प्रश्न पडलाय तुम्हाला, हो ना ?

काय सांगणार! काल सगळ्यांनी रामाबद्दल भक्तीभावाचा सुर लावला असताना दोघीचौघी तरूणी मात्र वेगळाच सूर लावत होत्या. त्यांचा एकंदरीत रामाच्या वर्तनाबद्दलच आक्षेप होता.

वडिलांनी दिलेल्या वचनासाठी वारसाहक्काने मिळत असलेलं राज्य सोडून वनवास पत्करायचा, तोही थोडा थोडका नव्हे, तब्बल १४ वर्षांचा…आणि त्यानुषंगाने पुढे घडलेला वनवास, त्यात आलेली अनेक संकटं, राम-रावण युद्ध, रावणाचा मृत्यू इ. क्रमाक्रमाने घडलेल्या घटना हा तर त्यांना स्वतः ओढवून घेतलेला वेळगळपणाच वाटत होता.
त्यातही रामाने लंकेत घेतलेली माझी अग्निपरीक्षा मात्र त्यांना अजिबात आवडली नाही. मग अयोध्येत राज्याभिषेकानंतर सर्वकाही सुरळीत चालू असताना एका क्षुल्लक परीटाची कुजबुज ऐकुन गर्भवती अवस्थेत मला वनात सोडणं, तेही फसवुन…कसं पटणार बरं या आजकालच्या मुलींना !
आणि लवकुशाचे जन्मरहस्य समजल्यावरही पुन्हा एकदा मला अग्नीपरीक्षेचा आदेश देणं…ही तर माझ्यावरील अन्यायाची परिसीमा झाली हे त्यांचं ठाम मत…कारण मी काही एखादी सामान्य स्त्री नव्हते. तर राजा जनकनंदिनी जानकी, मिथिला नगरीची राजकन्या मैथिली होते. पण प्रतिष्ठित माहेरवाशीण एवढीच माझी ओळख नव्हती. सुंदर तर मी होतेच, पण सर्व कलागुणसंपन्न होते, युद्ध-शास्त्रनिपुण होते. असं असतांनाही मी हा अन्याय का सहन केला असा प्रश्न त्यांना पडला होता.

पण आपल्या विचारांना संस्कारांचे, अध्यात्माचे, अधिष्ठान असले म्हणजे घडणाऱ्या प्रत्येक बऱ्यावाईट प्रसंगाला आपल्या पूर्वकर्मांचे संचित कारणीभूत असते याची यथार्थ जाणीव असली म्हणजे ‘सुखेदु:खे समेकृत्वा’ असा समताभाव जागृत होतो.

अर्थात कलीयुगामधील या स्त्रियांचे हे परखड मत या काळातील वातावरणाशी सुसंगत असंच आहे. मीही त्यावेळी तो अन्याय निमुटपणे सहन केला कारण राम हा फक्त माझा पती नव्हता तर त्याआधी तो मातापित्यांचा आज्ञाधारक पुत्र, चार भावंडांचा ज्येष्ठ भ्राता, अयोध्येतील प्रजेचा कर्तव्य परायण राजा होता. अशा एवंगुणविशिष्ट व्यक्तीला सर्वांगीण विचार करूनच कुठलाही निर्णय घ्यावा लागतो. कारण ‘यथा राजा तथा प्रजा…’ आणि अशा आदर्श राजाची पत्नी असल्यामुळे तर मला त्यांचे सर्व आदेश शिरोधार्य होतेच, पण त्यापेक्षाही श्रेष्ठ होते त्यांचे माझ्यावरील एकनिष्ठ प्रेम…हो…बहु पत्नीत्व समाजमान्य असल्याच्या त्या काळात माझ्या विरहाच्या काळातही अनेक प्रलोभने समोर असताना त्यांनी माझ्याशी एकनिष्ठ राहणेच पसंत केले. माझ्याही मनात रामाशिवाय दुसऱ्या परपुरूषाचा विचार येणे शक्यच नव्हते. त्यांची कर्तव्यं पार पाडत असतांना मनाविरुद्ध माझ्यावर कराव्या लागलेल्या अन्यायापेक्षा ही एकनिष्ठतेची भावना खूपच श्रेष्ठ होती. आणि त्यामुळेच आज मला ह्या गाभाऱ्यात त्यांच्याबरोबरीने स्थान मिळाले असावे.
तसेच…

‘अहिल्या, द्रौपदी, सीता,
तारा, मंदोदरी तथा
पंचकन्या स्मरे नित्यं,
महापातक नाशनम्…’

या पंचकन्या स्तोत्रांमधील एक पूजनीय कन्या म्हणूनही मान मिळाला असावा.

पण…कपडे बदलावेत तसे गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड बदलण्याऱ्या, क्षुल्लक कारणावरून एकमेकांशी घटस्फोट घेणाऱ्या, ‘मी आणि माझं’ एवढ्याच सीमित वर्तुळात वावरणाऱ्या, विवाह आणि संसार हा तडजोडीवर चालत आणि टिकत असतो हे न उमजणाऱ्या, स्वातंत्र्य आणि स्वैराचार यांची गल्लत करणाऱ्या स्वार्थाने बरबटलेल्या या कलियुगातील पिढीला हे कसं कळणार बरं!

मावशी, ताई…

मी कांचनमृगाचा हट्ट धरला कारण त्यानिमित्ताने तेथील राक्षसांचा निःपात व्हावा, आणि ऋषीमुनींना निर्वीघ्नपणे आपली साधना करता यावी हे विधिलिखित होते. परंतु आता तुमच्यासारख्यांनी तरी भरकटलेल्या, मृगजळामागे धावणाऱ्या, पैसा हेच सर्वस्व मानणाऱ्या ह्या पिढीला…समजावून सांगण्याचा प्रयत्न करावा असं मनापासून वाटतं…कारण करिअर की संसार या द्विधा मनःस्थितीत सुवर्णमध्य न साधता ‘आणखी हवंय’ या मृगजळामागे धावण्याला अंत नाही. तुम्हाला कितपत यश येईल माहिती नाही. तरीही आपण प्रयत्नच केला नाही अशी खंत वाटायला नको म्हणून तरी…सांगाल ना ?

भारती महाजन-रायबागकर

— लेखन : भारती महाजन-रायबागकर. चेन्नई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

वैशाली कोंडाजी on “माध्यम पन्नाशी” : ९
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” : ९