Saturday, July 27, 2024
Homeलेखसुख म्हणजे नक्की काय ?

सुख म्हणजे नक्की काय ?

सुख म्हणजे आनंद. आपल्या मनासारख्या गोष्टी होणे. जसे की यश, प्रगती, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, संपत्ती असे अनेकांचे मत असते व आहे. पण……… हे सर्व मिळाले तरी तो मनुष्य खरच सुखी अथवा आनंदी असतो का ?

तर अनेक वेळा याचे उत्तर नाही असे ही मिळू शकते. मग असे का ? एवढे असून देखील तो दुःखी का ? या का चे उत्तर मिळणे तसे कठीणच आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती!

आता दुःख म्हणजे काय ? शारीरिक व्याधी अथवा मानसिक ताण तणाव, त्रास, गरिबी, कर्ज, आजारपण,कोणी केलेला अपमान,चेष्टा, छळ, स्वभावाचा घेतलेला गैरफायदा, फसवणूक अशा अनेक गोष्टी.

म्हणजे…….प्रत्येकाची सुख व दुःखाची व्याख्या वेगळी असते. काही लोक सगळ्या सुख सुविधा असून देखील दुःखी असतात. तर काही गरिबीत आपल्या झोपडीत राहून देखील सुखी आयुष्य जगतात, आनंदी राहतात.

जेव्हा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडे पाहून स्वतःची तुलना करतो तेव्हा तो जास्त दुःखी होतो. जगात आपल्या आजूबाजूला पाहिले तर अनेक लोक खूप सोसतात,कष्ट करतात. त्यांच्या आयुष्यात अनेक चढ उतार असतात. अनेक संघर्ष असतात जे आपल्याला माहीत नसतात, अथवा दिसत नाही. किंवा ते तसे दाखवत ही नाही की त्याचा बाऊ करत नाही. दुसऱ्याचे दुःख पाहिले की एक गोष्ट आवर्जून लक्षात येते की आपण खूप सुखी आहोत.

तुलना हेच तर दुःखाचे प्रमुख कारण आहे. याचे एक उदाहरण पाहू या……
सिग्नल लागतो व सर्व गाड्या थांबतात. त्या वेळी एक सायकल चालवणारी व्यक्ती बाजूच्या दोन चाकी व्यक्ती कडे पाहून मनोमन म्हणतो की हा किती भाग्यवान आहे नाही ? माझ्या सारखे याला दमायला होत नाही. चढावर मला सायकल चालवताना जी कसरत होते ती त्याला होत नाही. हा मनुष्य खूप सुखी आहे.

आता तो दुचाकीवर असणारा मनुष्य शेजारील चार चाकी असलेल्या मनुष्याकडे पाहून दुःखी होतो व विचार करतो हा मनुष्य किती आनंदी आहे ना? याच्याकडे गाडी आहे. त्यामुळे ऊन,पाऊस,वारा याचा त्याला कोणताही त्रास होत नसेल याचा प्रवास किती छान होत असतो.

ही चार चाकी असलेला मनुष्य खूप दुःखी असतो कारण त्याची बायको सतत भांडत असते. त्यामुळे गाडी व मोठा बांगला असून त्याला स्वतःच्या घरी जाण्याची इच्छा नसते. त्याला घरात शांतता,समाधान व आनंद लाभत नाही. त्यामुळे तो अनेक महिने बाहेरगावी राहतो व घरी जाण्याचे टाळतो.

सायकल चालवणार्याच्या बाजुला एक अपंग मनुष्य दोन्ही हातात काठी घेऊन चालत असतो व देवाला म्हणतो , परमेश्वरा तू मला पाय दिले असते तर मी मस्त मजेत सायकल चालवली असती.

म्हणजे…..आता तुम्हीच पहा ! प्रत्येक मनुष्य दुसऱ्या मनुष्याकडे पाहून दुःखी होत आहे. जेव्हा आपण आपल्यापेक्षा सुखी असलेल्या मनुष्याकडे पहातो तेव्हा आपले दुःख डोंगराएवढे मोठे वाटते. पण याचे उलटे केले तर लक्षात येईल की आपण खूप सुखी आहोत.

तर आता हेच आपल्याला करायचे आहे. काही कारणाने आपण दुःखी झालो, काही त्रास झाला तेव्हा आपल्या पेक्षा जास्त दुःखी व्यक्तीला पहायचे . तेव्हा लक्षात येईल की परमेश्वराने आपल्याला खूप काही दिले आहे व आपण खूप भाग्यवान आहोत. तेव्हा आपण खऱ्या अर्थाने सुखी जीवनाचा आनंद घेऊ शकतो.

तसे पाहिले तर अगदी लहान लहान गोष्टीत आनंद आहे. मस्त पती पत्नी बागेत जाऊन छान गप्पा गोष्टी करताना ती नवऱ्याने आणलेली भेळ खाते, तो प्रेमाने दिलेला गजरा आपल्या चेहऱ्यावर आनंद आणतो. मुलाने पहिल्या पगारात आणलेली भेट, मुलीने स्वतःच्या हाताने केलेला पदार्थ, घरातल्यानी आपल्या कामाचे केलेले कौतुक, मैत्रिणींसोबत काढलेली ती ट्रिप, केलेली दंगा मस्ती, वयाचे भान विसरून निसर्गात घेतलेला तो आनंद, पावसात घेतलेला तो गरम चहा त्यासोबत असलेले ते गरम भजी.. किती तो आनंद आहे. नाही का ?

बाबांनी डोक्यावरून फिरवलेला तो प्रेमळ हात, आईच्या मांडीवर डोके ठेऊन निवांत झोपणे,आपली बाजू घेऊन भांडणारे आपले भाऊ, मैत्रिणीने विश्वासाने मारलेली ती मिठी, “मी आहे ना” हे आपलेपणाची जाणीव करणारे शब्द अहो किती किती आनंद आहे सगळीकडे अगदी चोहीकडे.

फक्त…. गरज आहे तो आपला दृष्टीकोन बदलण्याची. जग खूप सुंदर आहे. हा मनुष्य जन्म मिळालेली अमूल्य देणगी आहे जी रडण्यात अथवा स्वतःला कोसण्यात स्वतःला दुःखी करण्यात घालवू नका.

म्हणजे…….आपल्या सुख अथवा दुःखासाठी दुसरी व्यक्ती कारणीभूत असू शकत नाही अथवा मी त्याला तो अधिकार दिलेला नाही हे आपण ठरवले पाहिजे.

आपण मशीन नाही…… हे मान्य आहे ! आपल्याला मन आहे, भावना आहे. मात्र कोणत्याही गोष्टीचा त्रास किती वेळ करून घायचा हे मात्र आपल्या हातात आहे.

जसे रोज सूर्य उगवतो व मावळतो तसे हे सुख दुःख सुद्धा आहे हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा आपण जगातील सर्वात सुखी मनुष्य असू जे कोणत्याही परिस्थितीत सावरू शकतो आनंदी राहू शकतो.

अशक्य असे काही नाही……मग स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू.

जो मनुष्य कितीही दुःखी असला तरी त्याचा सामना धीराने व हिमतीने करतो तो नेहलीच आनंदी, समाधानी व सुखी आयुष्य जगू शकतो.वसुख आपल्या आत आहे आपल्या मानन्यावर आहे. इतकी सोपी सुखाची व्याख्या आहे आपण उगाच सर्व गोष्टी अवघड करून ठेवतो.

समस्या असल्या तरी त्या सोडवायला मार्ग असणारच. फक्त त्या सोडवायला मार्ग शोधला पाहिजे व सकारात्मक दृष्टीकोन ठेवला पाहिजे आणि खरे पाहिले तर त्या समस्येतच देखील एक अदृश्य संधी उपलब्ध असते जी तुम्हाला पहिल्यापेक्षा अधिक निर्भीड बनवते बलशाली बनवते.

अगदी रोज आपण काही तर नवीन शिकत असतो नवीन गोष्टी आत्मसात करतो. आपल्याला ज्या गोष्टी करायला आवडतात ज्यातुन आनंद मिळतो ते तर अवश्य केल्या पाहिजे कारण तोच तर आपल्या जगण्यातील जीवांपणा ठेवतो.

आपल्या मित्र मैत्रिणींशी मारलेल्या त्या मनसोक्त गप्पा, ती चेष्टा मस्करी हेच तर विसाव्याचे क्षण असतात जे आपले दुःख विसरायला लावतात. मित्र परिवार जपला पाहिजे तो सांभाळला पाहिजे आवर्जून त्यांच्या साठी वेळ दिला पाहिजे कारण हा वेळ वाया घालवणे नव्हे तर अविस्मरणीय आठवणींनाचा ठेवा असतो तो जगण्याला नवी ऊर्जा देतो.

आपल्यातील माणुसकी जपू या. चांगुलपणा नम्रपणा हेच मनुष्याचे खरे आभूषणे आहे हीच खरी संपत्ती आहे त्यामुळे माणसं जोडली जातात.अदृश्य नाळ तयार होते जी जन्मभर आपल्याला सोबत करते.

सुख कोठे विकत मिळत नाही मात्र ते शोधता आले पाहिजे. ते आजूबाजूला आहे या सुंदर निसर्गाच्या सानिध्यात आहे, आपण जोडलेल्या मित्र परिवारात आहे त्याचा शोध बाहेर नाही तर स्वतःमध्ये आहे हीच सुखी आयुष्याची गुरुकिल्ली आहे जी नेहमी तुमच्या चेहऱ्यावरील ते हास्य ठेवते तुमचे अंतरंग फुलवते.तुम्हाला काय वाटते ?

रश्मी हेडे

— लेखन : रश्मी हेडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८