Thursday, December 5, 2024
Homeलेखसुट्टी…

सुट्टी…

आज सकाळी सकाळी मैत्रिणीचा, जयाचा फोन आला. “अगं, आज इलेक्शननिमित्त सर्वांना सुट्टी आहे ना ? मग आपण ऑफिसमधल्या पाचजणी मैत्रिणी एकत्र भेटूया आणि मतदान केल्यावर जाऊया का रेस्टॉरंटमधे ?”
तिने मस्त प्लॅन मांडला.
“छान आयडिया आहे. आपण ठाण्यातल्या पाचजणी एकत्र जाऊ शकतो. पण आज घरातपण सर्वांना सुट्टी आहे. घरीच आहेत सगळे. मग त्यांचा स्वैपाक करावाच लागेल ना?” मी चिंतेने म्हटले.
“अगं, बाई असेलच ना पोळ्यांना. थोडेफार तिलाच सांग करायला. आणि आपण काही जेवायला जात नाही आहोत. सकाळी नऊ वाजता मतदान करायचं आणि साडेनऊला ब्रेकफास्ट करायला जायचं.” आमच्या ग्रुपमधील पाची जणींनाही ही आयडिया पसंत पडली.

मी कालच हेअर डाय वगैरे करून घेतले होते. फेशियलसुद्धा झाले होते. त्यामुळे बाहेर जायला काहीच प्रॉब्लेम नव्हता. मतदानाला पांढरेशुभ्र कपडे घालून जायचं ठरलं. फक्त मृदुलाचा एक प्रॉब्लेम होता. तिने विचारले, “अगं मी जरा कन्फ्युज झाले आहे. मत कुठल्या पार्टीला द्यायचं हे ठरतच नाहीये. गोंधळ उडालाय सगळा.” ग्रुप कॉल असल्यामुळे सगळ्यांनीच हे ऐकलं. त्यावर गीता म्हणाली, “मत कोणालाही दे गं. त्याने काय होणार आहे ? आपली पगारवाढ होणार आहे की आपल्या ऑफिससमोरचा रस्ता ठीक होणार आहे ? पण आपण पाचजणी आज ब्रेकफास्टला नक्की जातोय हं.” मृदुलालाही ते पटले.

आता सुषमाचा एक प्रॉब्लेम निघाला. ती म्हणाली, “माझ्याजवळ पांढरा ड्रेसच नाहीये.” जया आमची हुषार! तिने लगेच तोडगा सुचवला, “अगं मिस्टरांजवळ एखादा व्हाईट टी शर्ट असेलच ना ? तोच जीन्सवर घालून ये.”

ठरल्याप्रमाणे आम्ही पाची जणी घंटाळीच्या चौकात भेटलो. सर्वात प्रथम मतदान केलेले बोट गालाजवळ ठेऊन आम्ही सेल्फी काढला. एकीने ओठाचा चम्बूसुद्धा केला होता. पण गीता म्हणाली, चंबू नको बाई. जरा ओव्हरच होईल. म्हणून तो फोटो आम्ही कॅन्सल केला. मग दुसरा प्लेन फोटो काढला. फेसबुकवर लगेच अपलोड केला. वर कॅप्शन टाकलं. ‘आम्ही मतदान केलं. तुम्ही केलंत की नाही ?’ आता फेसबुकवर किती लाईक्स आले ते ब्रेकफास्टनंतर बघू म्हटलं.

आम्ही जवळच्या पूजा रेस्टॉरंटमधे नाश्ता करायला रिक्षानेच गेलो. पाहतो तर ही गर्दी! मतदानाला रांगा लावतात तशा इथे रेस्टॉरंटमधेही रांगा लावल्या होत्या. बहुदा आम्हाला जी आयडिया सुचली तीच अनेकांनाही सुचली असावी. मतदानानंतर सगळेच विथ फॅमिली, नाश्ता करायला हॉटेलमध्ये आले होते. तीन रेस्टॉरंट्स मधे रिक्षाने फिरलो. सगळीकडे तोच प्रकार ! आज कोणीच नाश्ता घरी बनवणार नव्हते का? शेवटी एका ठिकाणी रेस्टॉरंट सापडलं. पाचीजणींना एकत्र बसायलापण मिळालं. मेनूकार्ड बघायला पण वेळ नव्हता. सर्वांनी डायरेक्ट बटाटेवड्याची फर्माईश केली. हल्ली माझं वजन वाढल्यामुळे घरी बटाटेवडे, सामोसे हे करणं बंदच झालं होतं. मग आज जरा चीटिंग करावं म्हटलं.

आम्ही नाश्ता संपवून कॉफी पीत होतो. तेवढ्यात आमच्या शेजारून एक शुभ्र दाढी असलेले काका जाताना दिसले. आमच्या टेबलजवळ थांबून त्यांनी विचारलं, “तू मीनाक्षी देशपांडे का गं ?” माझ्या माहेरच्या नावाने मला कोणी हाक मारली म्हणून मी आश्चर्यचकित झाले. मी क्षणात ओळखलं, “अय्या, दोंदे सर? कित्ती वर्षांनी दिसताय?” सरांनी मला इतक्या वर्षांनी ओळखावं याचं आश्चर्य वाटलं.
“तुझा आवाज ऐकला आणि एकदम, तू शाळेत केलेलं ‘पुढारी’ विषयावरचं भाषण आठवलं. म्हटलं हीच ती दिसतेय. काय, मतदान करून आलात ना?” सरांनी विचारले.
“हो, सर.” आम्ही पाचजणींनी एकदमच उत्तर दिले. पुराव्यादाखल बोटावरची शाईदेखील दाखवली !
“छान! महाराष्ट्राचं भवितव्य तुमच्या हातात आहे. मतदान केलंत हे चांगलं केलंत.” असं म्हणून ते सुहास्य वदनाने निघून गेले. आमच्या वर्गातून निघतानाही असंच काहीतरी महत्त्वाचं वाक्य बोलून निघून जायचे. पण तेव्हा त्या वाक्यांचं महत्त्व कुठे कळत असता म्हणा? सगळं लक्ष घंटेकडे लागून राहिलेलं असायचं. तेव्हा मधली सुट्टी महत्त्वाची असायची.

आता नोकरीला लागल्यावरही आम्हाला सुट्ट्या महत्त्वाच्या वाटतात म्हणा. इलेक्शन ही आमच्यादृष्टीने एक सुट्टीच होती. घरी गेले. तर यांनी त्रस्त चेहऱ्याने दरवाजा उघडला. “का ? बाई कामावर आली नाही का ?” मी विचारले.
“आली होती. पण जुजबी कामं करून निघून गेली. तिला मतदानाला जायचं होतं.”
“एवढी काय घाई होती ? मतदान तर दिवसभर चालू आहे.” मी तणतणले.
“अगं, ती म्हणाली. सरकारच्या आधीच्या योजना सुरूच राहाव्यात यासाठी आम्हाला मतदान केलंच पाहीजे. फार महत्त्वाचं आहे ते.” ते ऐकून आदळआपट करत मी स्वैपाकाला लागले.

मेघना साने

— लेखन : मेघना साने. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

राजेंद्र वाणी दहिसर मुंबई on “प्रतिभा”ला वय नसतं !
नलिनी कापरे on आरशात पाहू जरा …
सौ.मृदुलाराजे on आरशात पाहू जरा …
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : २६
सौ.मृदुलाराजे on वाचक लिहितात…
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
शारदा शेरकर on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !