वृत्त-चंद्रकांत
(८+८+८+२)
नकोच सखये रुसवा असला वद ना तू राणी
साहत नाही तुझा अबोला मम नयनी पाणी
आम्रतरूवर कोकिळकूजन ऐक ना प्रिये तू
कुठे हरवला पंचम स्वर तव सांग ना सखे तू
चुकले माझे काय तरी गे स्मरत नसे मजला
गाल फुगवुनी बैसलीस तू शोभे ना तुजला
पहा प्रियतमे तुजसाठी मी चाफा आणियला
अबोल त्याची प्रीत जाणुनी गजरा माळियला
पुरे जाहला लटका रुसवा थकलो मी आता
समजुन घे मज माझे राणी तुझाच मी भर्ता
तुझ्यावाचुनी नसे कोण मज कोमल तव वाणी
तिलोत्तमा तू अप्सराच जणु ह्रदयाची राणी
किती प्रतीक्षा करू सांग ना अधीर तव बोला
पुरे जाहली थट्टा आता सोड ना अबोला
— रचना : अरूणा मुल्हेरकर. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
छान रचना.