पुस्तक वाचन एकवेळ सोपं
माणसं वाचणं महा कठीण
आत एक बाहेर एक
माणसाचे चेहरे अनेक
तोंडांवर हसू मनात कोसू
दुरून मौज पाहत बसू
अजब ही दुनियादारी
जगाची ही रितच न्यारी
आपलेच अनेक घात करतात
परके मात्र साथ देतात
सोबतीचा देखावा करतात
स्वप्नांचे पंख छाटतात
प्रेमाचं नाटक करतात
डाव साधून मागे सरतात
अनेक यातना दुःखं देतात
वाईट वाटल्याचे सोंग घेतात
सोबत राहून गुपित जाणतात
गैरफायदा घेऊन फसवतात
भावनांचा खेळ होतो
बोलण्यात त्यांच्या मेळ नसतो
चेहऱ्यावर चेहरे लपवतात
गोड बोलून हेतू साधतात
काम झाले की लांब होतात
स्वार्थ साधून विसरून जातात
पाय खेचण्यात हुशार असतात
हात द्यायला कचरतात
दुसऱ्यांचे यश नाही पाहवत
इतर अपयशी यांचा आनंद द्विगुणीत
अत्यंत कठीण परिक्षा देतो
चांगुलपणाची शिक्षा भोगतो
अनुभवातून माणूस शिकतो
पण तो पर्यंत किती गमावतो
पण तो पर्यंत किती गमावतो…

— रचना : रश्मी हेडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.