Saturday, July 27, 2024
Homeलेखसोशल मीडिया किती "सोशल" ?

सोशल मीडिया किती “सोशल” ?

परवा एक पत्रकार मित्र वारला. माणूस गेला की त्याच्या फक्त आठवणी शिल्लक राहतात. अशा आठवणींच्या पडसाद प्रहारात मित्र परिवाराने त्यांचे अंतिम कर्तव्य पार पाडले. त्यानिमित्ताने थोडा अंतर्मुख झालो.

आजचा (आपला) सोशल मीडिया खरंच किती सोशल (आणि सोशिक) आहे, याचा विचार करू लागलो.
खरंतर तो सोशिकही नाही आणि सोशल तर अजिबात नाही. या मीडियानेच आज आपल्यामध्ये एक सोशल ब्लॉक, एक सामाजिक भिंत किंवा दरी निर्माण केली आहे हे आपणा सर्वांना समजतं तरी, हनाआंच्या शब्दात “पण लक्षात कोण घेतो” अशी आज परिस्थिती आहे.

आपला भवताल आज आभासी बनला आहे. आपण किती आभासी जगत आहोत याचे भान सुद्धा आपण सोडून दिले आहे. पूर्वी आपण वेगवेगळ्या प्रसंगांची छायाचित्रे कॅमेऱ्याद्वारे टिपत असू त्यावेळेचा रोल, त्याचं निगेटिव्ह पॉझिटिव्ह करणं, त्या फोटोंचे जतन करणे हा खर्चिक भाग होता. परंतु आज ते जुने सेपिया टोनमधले फोटो पाहत असताना आपण पुन्हा भूतकाळात जातो, स्मृतीशरण होतो. आपल्या हे आजही लक्षात आलेले नाही की मोबाईलमधल्या छायाचित्रांमध्ये आपण आपली छाया गमावून बसलो आहोत. मोबाईल छायाचित्रात कोणाला जर आपली सावली दिसते का हे शोधण्याचा प्रयत्न करावा. ती शोधून सापडणार नाही. शोधा म्हणजे सापडेल ही बायबल उक्ती या दिजिटल युगाने कालबाह्य ठरवली आहे. छाया गमावलेल्या आपल्या अस्तित्वाला काय अर्थ !

आपण या “असोशल” गटावर, समूहावर जेव्हा प्रतिसाद, प्रतिक्रिया व्यक्त करत असतो त्या वेळेला आपण आभासी अवकाशात वावरत असतो. आपण एखाद्याशी, त्याच्या विचारांशी सहमत असल्याचे सांगणे किंवा त्याच्या विचारांशी असहमत असल्याचे प्रत्यक्ष बोलण्यात आणि या मीडियाद्वारे कळविण्यात बोलण्यात खूप तफावत आहे, हे आपल्याला ते करत असताना जाणवत नाही कारण आपल्यासमोर त्या व्यक्तीची एक आभासी प्रतिमा उभी राहते जिच्या मताशी आपण सहमत अथवा असहमत असल्याचे मत मांडत असतो. ज्यासाठी आपण एका प्राचीन चित्रलिपीचा उपयोग करतो आणि आपल्याला आधुनिक मानून घेतो.

चित्रलिपी ही त्या काळाची गरज होती ज्यावेळी माणूस बोलू अथवा लिहू शकत नव्हता परंतु त्याला व्यक्त व्हावेसे वाटत होते. आज आपल्याकडे व्यक्त होण्यासाठी भाषा आहे, लिपी आहे आणि अनेक माध्यमे आहेत तरीही आपण चित्रलिपीचाच उपयोग करत आहोत तर मग आपण प्रगत की प्राचीन ?
सहमत असू तर अंगठा आकाशाच्या दिशेने, असहमत असू तर अंगठा पाताळाच्या दिशेने आणि धन्यवाद वगैरे म्हणण्यासाठी केवळ हात जोडलेलं चित्र. एखाद्याच्या चांगल्या गुणाची कदर करण्याची गुणग्राहकता हा स्वभाव त्या चित्रातून नाही प्रकट होत. शब्दांमधून प्रकटतो.

एखाद्याच्या वाढदिवसानिमित्त सुद्धा आपण गुलाब पुष्प किंवा पुष्पगुच्छ प्रतिमा फक्त ठेवतो मोबाईल स्क्रीनवर, प्लास्टिकची कृत्रिम फुले ठेवावी अगदी तशीच ही मोबाईलवरली फुले कृत्रिम आणि निर्बंध असतात हेही आपण जाणतो; परंतु त्याच फोनचा थेट संवाद साधण्यासाठी आपण दुर्दैवाने उपयोग करत नाही. आवाजाला गंध नसला तरीही आत्मीयतेचा ओलावा असतो. ज्ञानदेवांनी म्हटल्याप्रमाणे एक आर्त असतो. त्या आर्ताला अर्थ असतो, भाव असतो, खूप खोलवरला ओलावा असतो.
प्रत्यक्ष बोलताना आपण केवळ शुभेच्छा देत नाही तर थोडीफार खाली खुशाली विचारतो आणि हे बोलत असताना सुद्धा आभासी परंतु मनाने आपण परस्परांच्या खूप जवळ जातो.

तर यापुढे किमान जवळच्या मित्राच्या वाढदिवशी त्याला प्रत्यक्ष फोन करूनच शुभेच्छा देऊया आणि या आभासी कृत्रिम जीवनातून थोडेसे बाहेर येऊया.

माझ्या एका मित्राचा उपक्रम येथे मला सांगावासा वाटतो. तो सुगंध विकण्याचा अर्थात अगरबत्ती विकण्याचा छोटासा व्यवसाय करतो. कार्यालयात बसला असता पोस्टकार्डवर तो ब्रशने हलके रंग चढवत असतो. मग त्याला छान चौकट वगैरे रेखाटून त्यावर शुभेच्छा संदेश देतो बरे हे शुभेच्छा संदेश, तो ज्या व्यक्तींना जाणतो त्यांनाच केवळ पाठवतो असे नाही, तर वृत्तपत्रात किंवा अन्य माध्यमाद्वारे एखाद्या व्यक्तीला कुठलासा पुरस्कार मिळाला हे त्याच्या वाचनात आले तरीसुद्धा त्या व्यक्तीचा तो पत्ता शोधून काढतो आणि त्याला हे कार्ड पाठवतो. आजवर या मित्राने पन्नास हजाराहून अधिक कार्ड्स पाठवले आहेत. तो सांगतो, हे कार्ड ज्याला मिळते त्याच्याशी मैत्री नसली तरी सुद्धा आपल्याला न जाणाऱ्या माणसाने पाठवलेला हा शुभेच्छा संदेश, अभिनंदन संदेश म्हणून हे कार्ड तो जपून ठेवतो.

नकळत या मित्राने मला जनसंपर्क तंत्र आणि जनसंपर्क वृद्धिंगत करण्याचा मंत्रच दिला. मला वाटतं हे तंत्र आणि हा मंत्र आचरणालाही अत्यंत सोपा आहे तर मग तो आचरणात आणूया का आजपासून.
आभास या शब्दात दांभिक शब्दाची अर्थच्छटा अनुस्यूत आहेच. माणूस मूलतःच, स्वभावतःच दांभिक आहे.

सदानंद रेगे गेले त्यावेळची ही गोष्ट. रुईया महाविद्यालयात श्रद्धांजली सभा झाली. वक्ती होते रेगेंचे एकचषक यार दि.पू. चित्रे आणि नामदेव ढसाळ. दोघांचेही आठवणींचे उमाळे काढणारे लेख प्रकाशित झाले होते. तो सगळा सोहळा पाहताना मला जणू भास झाला – प्यासा मधल्या गुरुदत्तच्या रुपात जणू रेगे सभागृहाच्या एका दारात उभे आहेत. या श्रद्धांजलीवरले “दांभिकते नंतरच्या दांभिकते नंतरची दांभिकता” माझे पत्रवजा टिपण नवशक्तीत प्रकशित झाले. त्यावर आतल्या आत थोडा गहजब झाला. श्रद्धांजली वाहणाऱ्या मित्रांनी तरी सदू रेगेची किती दाखल घेतली होती त्याच्या हयातीत? असा प्रश्न मी उपस्थिती केला होता. हा संदर्भ एवढ्यासाठीच की ही परिस्थिती आजही बदलली नाही.

नाही म्हटलं तरी सत्यकथाकार लेखकांनी असे दखलपात्र गुन्हे बरेच केलेत.
लच्छीच्या गोष्टीत तात्पर्य नसले तरी ते इथे आहे: आज लेखक लिहितात पण वाचक नाही ही ओऽरड आहे. वाचकाने काय वाचावे, का वाचावे हे जाणून घेण्यासाठी ज्यांची प्रतीक्षा केली जात असे अशी माध्यमे आज नाहीत. विचारशक्तीला चालना मिळेल असे काही वाचायला मिळत नाही. असं शोधून वाचण्या आधीच वाचू नये असं बराच काही तळव्यावर उमटलेलं असतं. सब घोडे बारा टक्के.

मित्रांचा संपर्क फक्त “कुठे काय” (व्हॉट्स अॅप) वर. तो मित्र अकार्यक्षम. कोण कशाला पुसतोय आपल्याला म्हणून तो निराश हताश. फोन करण्याचे भान कोणाला !
विनय खरे त्याचे नाव. खरे काय… खोटे काय हे प्रश्नचिन्ह ठेऊन गेला मागे.
माझ्या मित्राच्या आत्म्यास शांती लाभो.

सुधीर ब्रह्मे

— लेखन : सुधीर ब्रह्मे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments