भाग : १
इंग्लंड मुक्कामात दोन तीन वेळा स्काॅटलंडला जाण्याची संधी मिळाली. २०२३ मध्ये मी पहिल्यांदा सहकुटुंब स्काॅटलंडला गेलो होतो.
प्रवासात आणि प्रत्यक्ष भेटीत मला जाणवलं की, इथलं सामाजिक जीवन इंग्लंडप्रमाणे धावपळीचं असूनदेखील त्यात जीवघेणी स्पर्धा नव्हती. ऐतिहासिक संदर्भ जसे इथे जपून ठेवण्यात आले आहेत तसेच,आधुनिकीकरणही या समाजजीवनाचा अविभाज्य घटक आहे. इथे निसर्ग विलोभनीय आहे पण त्यात उगाचच भडकपणा किंवा बटबटीतपणा नाही.
स्काॅटलंड हा एक विकसित आणि समृद्ध देश. एडिंबर्ग हे स्काॅटलंडच्या राजधानीचे शहर. आमच्या पहिल्या भेटीत आमचा मुक्काम तिथल्या एका हाॅटेलात होता. चार दिवस आम्ही एडिंबर्गला होतो. सकाळीच लवकर तयार होऊन तिथल्या प्रवासी बसने सगळ्या शहराचा फेरफटका घेतल्यावर, त्यापैकी काही मोजक्या ठिकाणी जाणं हा आमचा दिनक्रम होता.
निसर्ग आणि एकूणच मानवी जीवनाचे लावण्यपूर्ण चित्र पाहून, स्काॅटलंडचा उल्लेख ‘सौंदर्यभूमी’ असाच करावा हा विचार मनात दृढ झाला.
२०२४ च्या जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात, पुनः आम्ही ही सौंदर्यभूमी पहायला गेलो. यावेळी आम्ही पूर्ण प्रवास कारने केला. म्हणून या स्वप्नभूमीला जवळून पहाता आलं. तेव्हा जे दिसलं, सुचलं ते असं;
प्रवासात कारच्या काचेच्या खिडक्यांतून प्रसन्न निसर्ग डोळ्यांसोबत इतरही ज्ञानेंद्रियांनी मनसोक्त पिताना, नेहमीप्रमाणे झोप लागत नव्हती.
डरहॅम इथलं ‘नोझल पाॅइन्ट’ हे स्काॅटलंडच्या नाॅर्थ समुद्रकिनाऱ्यावरचं एक आकर्षक ठिकाण. ‘हेरिटेज कोस्ट’ म्हणून तो भौगोलिक वारसा जतन करून ठेवला आहे.गाडीतून उतरलो तर थंड हवा अंगावर शहारे आणत होती. आपण ज्याला गुलाबी थंडी म्हणतो, त्याच्यापेक्षा ती थोडी अधिक बोचरी पण तरीदेखील अल्हाददायक वाटत होती.
दूरवर पसरलेला नितळ निळ्या रंगाचा समुद्र, माथ्यावरचं तशाच रंगाचं आकाश, हिरव्यागार जमिनीचे तुकडे त्या पाण्याशी गुजगोष्टी करत होते. त्या विशाल पार्श्वभूमीवर इकडून तिकडं घोंगावणारा वारा अशी पंचमहाभूतांपैकी, ही चार महाभूतं (आकाश, पाणी, वारा आणि जमीन) पाहून डोळे तृप्त झाले. मात्र आणखी काहीतरी पाहून ती एकाग्रता भंगली. निसर्गाची ही किमया असेल, पण या निसर्गाशी झुंज घेऊन आपलं श्रेष्ठत्व निर्माण करणाऱ्या माणसाने आचंबित करणाऱ्या अनेक गोष्टी तिथं दिसून आल्या.
समुद्रात दूरवर अनेक पवनचक्क्या फिरत होत्या. हवेपासून उर्जा निर्माण करण्याचे ते प्रयत्न होते. जमिनीतील कोळशांचे साठे मर्यादित आहेत; आणि म्हणून याला पर्याय म्हणून पवनचक्क्यांची ती योजना आहे.
समुद्र अथांग होता. काही नावा, समुद्रातील अंतर कापीत त्याच्यावर डोलत होत्या. मानवी प्रयत्नांनी समुद्राच्या या अथांगतेला दिलेले आव्हान कवि कुसुमाग्रज यांच्या ‘कोलंबसाचे गर्वगीत’कवितेतून दिसून येते. सागराला उद्देशून कोलंबसाच्या रूपाने माणूस म्हणतो,
‘अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत आशा अन्, किनारा तुला पामराला’.
जाताना रस्त्याच्या दुतर्फा उंचच उंच झाडांची हिरवीकंच टोकं आकाशात विहार करत होती. सारी झाडं कशी मिलिटरीच्या सैनिकांसारखी सरळ शिस्तीत उभी होती. जणूकाही ती कुणीतरी जमिनीवर अलगद व्यवस्थित मांडून ठेवली आहेत. या अगदी सरळ झाडांचं रहस्य पुढं उमगलं. प्लास्टिकच्या नळकांडयांत त्यांची लागवड आणि संगोपन केलं होतं. यामुळेच ती वाढतानाही सरळ रेषेत वाढली होती.
सबंध युरोपात थंडी खूप असते. यावर उपाय म्हणून घराघरांतून शेकोट्या सतत धगधगत असतात. त्यांच्यासाठी लाकडं तोडली जातात. मात्र झाडांची कशीही कत्तल केली जात नाही तर तोडलेल्या झाडांपेक्षा कितीतरी अधिक झाडं लावलीही जातात. आणि ही केलेली तोडलेल्या झाडांचे बुंधेही दिसायला आकर्षक असतात.
गाडीतून आपण मागं पळणारं निसर्गचित्र पहात असल्याचं जाणवत होतं. निसर्ग सोडून गाडी एबरडीन या शहराकडं जात असताना, आधुनिकतेची साक्ष देणाऱ्या मोठमोठ्या वास्तु आणि मानवी विकास खुणावू लागल्या.
युरोपीय देशांत सर्वसामान्य माणसं घरातली कामं स्वतःच करतात. आपल्यासारखे धुण्याभांडयाला नोकर ठेवण्याची पध्दत इथं नाही. मात्र काही घरांतून यंत्रमानव (रोबोट) अशी कामं करतात हे समजलं.कृत्रिम बुध्दीमत्तेचा (Artificial Intelligence) अर्क म्हणून हा रोबोट अनेक क्षेत्रांत माणसाची कामं हलकी करू लागला आहे. ताकद, शक्ति, स्मरणशक्ती,
अचूकता अशा अनेक बाबतीत रोबोट मानवी क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक वेगाने काम करतो. मात्र मानवी हित, नैतिकता, सहृदयता अशा मूल्यात्मक बाबींचा विवेकपूर्ण विचार रोबोट करू शकला नाही. म्हणूनच, सजीव स्वरूपातील विवेकी माणसाचं महत्त्व अद्यापपर्यंततरी टिकून आहे.
मुक्कामाच्या हाॅटेलकडं जाताना, रस्त्यावर ठिकठिकाणी, विविध रंगांची सुंदर फुलं मन मोहून घेत होती. एकदाचं हाॅटेल आलं. उतरून मी अशाच एका सुंदर फुलाच्या झाडाकडं गेलो. एक कविता आठवली ‘फुलांचं जीवन’. सुरूवातच होती की, फुल हे अल्पायुषी असतं. कवितेचा आशय होता की, आयुष्य कमी असलं तरी शेवटपर्यंत आनंदानं जगावं.
विचार म्हणून ही सकारात्मकतेची भावना ठिक आहे. पण मानवी व्यवहारात दु:ख आणि स्पष्ट शब्दांत सांगायचं तर शेवट दिसत असताना, संवेदनशीलता सर्वसामान्य माणसाच्या मनात विचारकल्लोळ निर्माण करते आणि ते स्वाभाविक आहे. अर्थात ह्या संकटाला घाबरून पळ न काढता, योग्य उपाय शोधणं हे उद्देश असावा ह्याला मी प्रॅक्टिकल पाॅझिटीव्हिटी (उचित सकारात्मकता) समजतो.
रूममध्ये सेटल होऊन हातपाय धुवून फ्रेश झालो. इकडं रात्रीचे आठ वाजून गेले तरी क्षितिजावर सूर्य होताच. खिडकीत बसून चहाचे घोट घेत मावळणारा सूर्य पहात होतो.थंडी वाढत गेली.
जे एबरडीन दिवसा सूर्याच्या प्रकाशात स्वच्छ दिसत होते, ते सूर्याच्या अनुपस्थितही लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाले होते. हिटरमुळं रूम उबदार बनली होती.
क्रमशः
— लेखन : प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ. इंग्लंड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
स्काॅटलंड:सौंदर्यभूमी
सुरेख वर्णन आणि फोटोही सुंदर