Saturday, July 27, 2024
Homeलेखस्त्री, अबला नव्हे तर सबला !

स्त्री, अबला नव्हे तर सबला !

आपल्या पोर्टलवर प्रसिध्द झालेले लता गायकर यांचे अनुभव वाचून मलाही आलेले असेच काही अनुभव पुढे द्यावेसे वाटतात. या अनुभवांवरून एकच म्हणावेसे वाटते की, स्त्री ने स्वतःला अबला न समजता सबला म्हणून समजले पाहिजे तर नको त्या परिस्थितीचा योग्य सामना निश्चित करता येतो.

१९८०-८१ च्या दरम्यान ची गोष्ट. आम्ही एम टी एन एल (बॉम्बे टेलिफोन) मध्ये कामाला होतो.

एकदा आम्ही १० ची ड्युटी करणार्या मैत्रिणी साधारण तीन वाजण्याच्या दरम्यान फोर्ट मधील ललीत हॉटेल मध्ये चहा ला जायचो. गप्पांच्या नादात बाजूने कोण गेले आले या कडे लक्षच नसायचं. एकदा असेच जात असताना माझी मैत्रीण अनू सुर्वे मला म्हणाली, “पुष्पें तुला माहीत आहे का ?” ”काय ?’ माझा प्रती प्रश्न ! “अगं तो समोरून भैय्या येतोय तो ना नेहमी बायकांना धक्का मारून पुढे जातो !” मी तिला म्हणाले “ठीक आहे, आज मीच त्याला धक्का देते तु गंमत बघ ! तुम्ही नेहमी प्रमाणे गप्पा मारत रहा मी काय करायचे ते बघते !”

आम्ही चालत होतो. तो भैय्या समोरून येत असताना, जवळ आल्यावर मी स्वतःच त्याच्या जवळ गेली आणि त्याला विचारलं, भैय्या जी ‘क्यो आप अपनी बिबी को गावं में रखते हो, और दुसरोंकी बिबीओंको धक्का मारते हो ? यहाँ पेट भरने, पैसा कमाने को आये हो तो कमावो और गाव जाके अपने बिबी बच्चोंको खिलाओ अगर आइंदा अगर दुसरे की बिबी को धक्का मारने की कोशीश की तो वही हात तोडके दुसरे हात में दूंगी फिर कमाने के लायक नही रहोगे और फिर हमेशा के लिए गाव अपने बिबी बच्चोंको पास जाना पडेगा ! आइंदा यहाँ आस पास में नजर मत आना, आज छोड रहीं हूं, कल नहीं छोडूंगी !

अनपेक्षितपणे झालेला धक्का सहन न होऊन भैय्या धुम पळत पळत सुटला आणि परत कधी च नजरेस पडला नाही !

खरं तर असे हे आंबट शौकीन लोक खूपच भित्रे असतात कारण त्यांच्या मनात चोर लपलेला असतो. फक्त त्यांना विरोध करण्याची, हिसका दाखवण्याची हिम्मत आपल्यात हवी ! मी असे अनेक अनुभव, किस्से अनुभवले आहेत आणि धैर्याने तोंड देऊन, चिखलात राहूनही कमळा सारखं स्वच्छ राहीले याचा मला सार्थ अभिमान आहे !

एकदा नाईट ड्यूटी(डबल)ला असताना, तेव्हा रात्री सात ते साडेसात ला चहा प्यायला सोडायचे. सहज जरा फेरफटका मारावा म्हणून मी आणि माझी मैत्रीण विद्या बाहेर पडलो आणि हळूहळू चालत चालत सिद्धार्थ कॉलेजकडे जाता जाता गप्पा मारत जात होतो. एवढ्यात मला शंका आली की कोणी तरी आपल्या मागे मागे हळूहळू काहीतरी बोलत येत आहे. मी गप्प झाले आणि पटकन मागे वळुन पाहिले तर एक गलिच्छ माणूस पँट ची चेन उघडी ठेवून आणि आपले भांडवल हातात धरून गलिच्छ चाळे करत, घाणेरडे हावभाव करत मागे मागे येत होता. मी रागाने विद्या ला म्हणाले, ‘अगं तो पर्स मधला चाकू काढ. ह्याचं कापुनच टाकते ‘ तसा तो मागे वळून ही न बघता धूम पळत सुटला !

नंतर तिथेच खाली झोपडी वजा घरात रहाणारी बाई मला म्हणाली, ‘मॅडम तुम्ही चांगले केलेत हा माणूस रोज खिडकीत येऊन मला असाच त्रास देतो. म्हणून मी खिडकी बंद करून ठेवते. पण त्यामुळे घरात खूपच काळोख येतो !’ मी म्हटलं, ‘तुम्ही कशाला घाबरता, तेल चांगले उकळवून त्याच्यावर ओता, तो परत कधीच त्रास देणार नाही.’

हे असेच अनेक किस्से आहेत. आपण न घाबरता, धीराने आणि प्रसंगावधान राखून तोंड दिले की कोणी आपल्या वाटेला जात नाही. मला कॉलेजमध्ये “लवंगी मिरची कोल्हापूरची” आणि पवई एक्सचेंजला “कडक लक्ष्मी” असा फिशपाँड् मिळाला होता. मी म्हटलं, चालेल कुणी चालू बाई आहे किंवा मी वाईट चालीची आहे असे म्हणण्या पेक्षा हे बरे !

१९७८ ची घटना आहे. त्या वेळी माझं लग्न झालं नव्हतं आणि मी माझे मामा श्री अशोक बेंडखळे यांच्या कडे अंधेरी ला रहायला होते. मी, सी अँन्ड आय, चरणजीत राय मार्ग येथील ऑफीस मध्ये काम करत होते. अंधेरी वरुन चर्चगेटला उतरून जावे लागे. एक टीसी मला रोज पास विचारायचा (उगाचच). पहिले दोन दिवस इमानदारीत पास दाखवला. तिसऱ्या दिवशी मात्र हसतच त्याला उत्तर दिलं ‘नही दिखाऊंगी जावो जो करना है करो !’ टीसी ही हसला आणि त्याने मला पास न बघताच जावू दिलं. त्यानंतर मात्र त्याने मला कधीच पास विचारला नाही. दूरुनच फक्त बघायचा पण माझी नजर त्याला बरोबर उत्तर देत होती, तो फक्त बघायचा आणि लागलीच नजर फिरवायचा !

पुरुष बायकांना कसे कोपर मारुन जातात याचा अनुभव मला आला होता. आता मीच तयारीत रहायचे, समोरून येणारा आपल्याला धक्का मारायला येणार हे लक्षात येताच मी आधीच त्याला कोपर मारायची वर रागाने बघताच तो पसार व्हायचा. एकदा एकजण मागुन आला आणि धक्का मारून पुढे गेला. मी त्याच्या मागून गेले आणि हातातली फोल्डींग ची छत्री जोरात त्याच्या डोक्यात घातली. त्याने मागे वळून पाहिले पण माझी नजर बघुन चुपचाप पुढे निघून गेला. ठकास महाठक होवून वागले की सहसा कोणी परत आपल्या वाटेला जात नाही आणि गेलाच तर, ‘चिल्लाऊ क्या ?’ म्हणताच धुम ठोकतो.

स्त्री अबला नाही सबला आहे आणि प्रसंगी चंडीकाही आहे हे समोरच्याला दाखवून दिले की तो परत आपल्या वाटेला जात नाही, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.

पुष्पा गांगण

— लेखन : पुष्पा गांगण. ठाणे
— संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments