नमस्कार प्रिय मैत्रांनो !
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः।।”
(अर्थ- जेथे स्त्रियांची पूजा केली जाते, अर्थात त्यांना मान दिला जातो, तेथे देवता आनंदपूर्वक निवास करतात. जेथे त्यांची पूजा होत नाही, अर्थात त्यांचा मान राखला जात नाही तेथील सर्व चांगली कर्मे देखील निष्फळ होतात.) हा अर्थपूर्ण श्लोक चिरंतन आहे, म्हणूनच आजच्या काळात देखील तितकाच प्रासंगिक आहे.
८ मार्च या अंतर्राष्ट्रीय महिला दिनानिमित्य अभिनंदन आणि शुभेच्छा या सर्वांनाच लागू होतात. कारण आजचा काळ असा आहे की पुरुषांची म्हणून लेबल लावलेली कामे महिला बिनधास्तपणे करतात, तर या उलट स्त्रियांची पारंपारिक कामे कधी कधी पुरुषमंडळी अगदी निगुतीने करतात. (यासाठी पुरावा म्हणून मास्टर शेफचे एपिसोड आहेतच).
जागतिक महिला दिनाचा इतिहास
मंडळी, जागतिक महिला दिनाचा इतिहास थोडक्यात सांगते. अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ संपूर्ण जगातील स्त्रियांना २० व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. १९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली. त्यात क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने `सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे.’ अशी घोषणा केली. ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड निदर्शने केली. त्यात दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या प्रमुख मागण्या होत्या. सोबतच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक स्तरावर समानता आणि सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क हे देखील मुद्दे होते.
१९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत ८ मार्च १९०८ रोजी या अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन’ म्हणून स्वीकारावा असा क्लाराचा मंजूर झाला.
नंतर युरोप, अमेरिका आणि इतर देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले.
भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्री संघटनांना बळकटी आली. जसजसे बदलत्या कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तसतशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो.
स्त्रियांचे सक्षमीकरण- माझा अनुभव
या निमित्याने मी महिला सशक्तीकरणाची एक आठवण शेअर करीत आहे. प्रवासात असतांना त्या त्या प्रदेशातल्या स्त्रिया कशा वागतात, त्यांचे व्यक्तिस्वातंत्र्य कितपत विकसित आहे, हे मी उत्सुकता म्हणून बघत असे. साधारण २००३ चा काळ होता. ( हे लक्षात असू द्या की, हा काळ वीस वर्षे जुना आहे.) मी केरळ येथे फिरायला गेले होते, देवभूमीचा हा सुंदर प्रवास रम्य अशा हिरवाईतून करीत होते. नारळांच्या वृक्षांच्या लांब रांगा अन लगत समुद्राचे निळेशार जल (समुद्र कुठला ते विचारू नका प्लीज)! बसमधून असे विहंगम दृश्य दिसत होते. बस कंडक्टर एक मुलगी होती, विशीतली असावी असे मला वाटले. अत्यंत आत्मविश्वासाने ती आपले काम करीत होती. बस मध्ये फक्त महिलांसाठी असे समोरचे २-३ बेंच आरक्षित होते. त्यावर तसे स्पष्ट लिहिले होते. कांही तरुण त्यावर बसले होते. एका स्टॉपवर कांही स्त्रिया बसमध्ये चढल्या. नियमानुसार त्या राखीव जागांवरून तरुणांनी उठून जायला हवे होते. त्यांनी तसे केले नाही. त्या स्त्रिया उभ्याच होत्या. तेवढ्यात ती कंडक्टर आली आणि मल्याळम भाषेत त्यांना जागा रिकामी करा असे तिने सांगितले, मात्र ते तरुण हसत होते आणि तसेच बसले होते. मी आता बघितले की, ती रोडकीशी मुलगी रागाने लाल झाली. तिने त्यांच्यापैकी एकाची कॉलर पकडली अन त्याला जबरदस्तीने उभे केले. बाकीचे तरुण आपोआप उठले. तिने नम्रपणे त्या स्त्रियांना बसायला जागा करून दिली, अन जणू कांही झालेच नाही असे दाखवत आपले काम करू लागली.
मैत्रांनो मला आपल्या ‘जय महाराष्ट्राची’ आठवण आली. असे वाटले की इथं काय झाले असते ? केरळात साक्षरतेचे प्रमाण १०० टक्के आहे ! (तेव्हां आणि आत्ताही) मेघालयच्या प्रवासाचे वर्णन मी नुकतेच एका लेख मालिकेत केले, तिथे देखील स्त्रियांच्या संपूर्ण साक्षरतेमुळे आणि आर्थिक स्वातंत्र्यामुळे जे स्त्री शक्तीचे अद्भुत रूप मी ठायी ठायी अनुभवले, ते वारंवार नमूद केले आहेच.
मंडळी, यात कुठलीच शंका नाही की, मतदानाचा हक्क तर महत्त्वाचाच, पण त्या योगे स्त्री स्वतंत्र झाली असे समजायचे कां ? तो तर दर पाच वर्षांनी मिळणारा अधिकार आहे. स्त्रीला घरात आपले मत मांडण्याचा अधिकार आहे का ? बरे, मांडले तरी ते विचारात घेतल्या जाते कां ? हे सुद्धा बघायला नको कां ? अगदी साडी खरेदी करायची असेल तर आर्थिक स्वातंत्र्य आहे कां, अन ते असले तरी स्वतःच्या पसंतीची साडी घेता येते कां ? मंडळी प्रश्न साधा आहे पण उत्तर तितके सोपे आहे कां ? ‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, हृदयी अमृत नयनी पाणी’ हे शब्द अजूनही जिवंत कां आहेत ? १९५० साली आलेल्या ‘बाळा जो जो रे’ या सिनेमातील ग दि माडगूळकरांची ही रचना आज देखील सत्याशी निगडित कां वाटावी ? जिथं स्त्रीला देवीच्या रूपात पुजल्या जाते तिथे तिची अशी अवस्था कां व्हावी ?
युनायटेड नेशन्सच्या ८ मार्च २०२४ च्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम आहे, “महिलांमध्ये गुंतवणूक करा: प्रगतीचा वेग वाढवा”. यात स्त्री अंकुराचे रक्षण, स्त्री आरोग्य, स्त्रियांच्या शैक्षणिक, आर्थिक आणि व्यावसायिक प्रगतीचा आलेख जलदगतीने उंचावणे हे सर्व मुद्दे आहेत. पण स्त्रियांचे सबलीकरण करण्याच्या दृष्टीने त्यांच्यावरील अन्याय आणि अत्याचार रोखणे आणि ते झाल्यास अपराध करणाऱ्याला कठोर शिक्षा करणे, या बाबी तितक्याच महत्वाच्या आहेत. समाजात स्त्रीचे स्थान अजूनही दुय्यम कां आहे ? यावर सामाजिक विचारमंथन होणे आवश्यक आहे. भलेही संविधानात नमूद केल्याप्रमाणे कुठल्याही स्तरावर लिंगभेद नसावा हे स्पष्ट आहे, पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे हे समाजातील प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे.
मला या दिनाविषयी इतकेच वाटते की, स्त्रीला देवी म्हणून मखरात बसवू नये तसेच तिला ‘पायाची दासी’ देखील बनवू नये. पुरुषाइतकाच तिचा समाजात मान असावा. ‘चूल आणि मूल’ या सेवाभावाकरता सकल आयुष्य खर्ची घालणाऱ्या स्त्रीचे कौटुंबिक आणि सामाजिक स्थान ते सर्वमान्य व्हावे. तिच्या भावभावना, बुद्धी आणि विचारांचा सदोदित सन्मान झाला पाहिजे. खरे पाहिलॆ तर हे साध्य करण्यासाठी ८ मार्चचाच ‘प्राणप्रतिष्ठेचा दिवस’ नसावा तर ‘प्रत्येक दिवस माझा’ असे समस्त महिलावर्गाने समजावे. त्यासाठी पुरुषमंडळींकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घ्यायची गरज असू नये. असा निकोप अन निरोगी सुदिन केव्हां येणार ? प्रतीक्षा करावी, लवकरच हे स्वप्न पूर्ण होईल !
“Human rights are women’s rights, and women’s rights are human rights.”
Hillary Clinton.
(“मानवी हक्क हे स्त्रियांचे हक्क आहेत आणि स्त्रियांचे हक्क हे मानवी हक्क आहेत.” हिलरी क्लिंटन)
धन्यवाद !
— लेखन : डॉ. मीना श्रीवास्तव. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800