Saturday, July 27, 2024
Homeलेखस्त्री स्वातंत्र्य : दुरुपयोग होत आहे का ?

स्त्री स्वातंत्र्य : दुरुपयोग होत आहे का ?

एका साहित्यिक समूहाच्या ‘महिला दिनानिमित्त विशेष’ लेखन उपक्रमात हा विषय देण्यात आला होता आणि हा विषय वाचताच माझ्या मनात ह्या विषयावर लिहिण्याची खूप इच्छा निर्माण झाली, ते फक्त शीर्षकामुळे !

“स्त्री स्वातंत्र्य” ह्या शब्दप्रयोगाने मला कुतूहल वाटले आणि मला प्रथम प्रश्न पडला की “पुरुष स्वातंत्र्य” असेही काही असते का? कदाचित नाही! केवळ स्त्रियांनाच जाहीरपणे स्वातंत्र्य देण्याची गरज आपल्याला जाणीवपूर्वक वाटली आणि म्हणूनच हा शब्दप्रयोग निर्माण झाला. तर उलट, पुरुषांना युगानुयुगे स्वातंत्र्य आहेच! किशोरवयाचा उंबरठा ओलांडताच त्यांना पूर्ण स्वातंत्र्य असतेच! पण एका स्त्रीला मात्र कॉलेज, ट्यूशन क्लासेस, नोकऱ्यांना जाण्यासाठी किंवा साधं शॉपिंगला बाहेर जाण्यासाठी किंवा मित्र-मैत्रिणींसोबत सहलीचा आनंद घेण्यासाठी ही परवानगी मागावी लागते. आणि जेव्हा स्त्रिया अशा विभिन्न कारणांनी घराबाहेर पडतात, तेव्हा हाच समाज त्यांना त्यांच्या स्वातंत्र्याचा गैरवापर होत असल्याचे वारंवार जाणवून देतो.

आपल्या वडिलांकडून नवीन बाईक मिळवलेला एखादा तरुण मुलगा जेव्हा आपल्या बाईकच्या मागच्या सीटवर मुलींना बसवून शहरभर आपली स्टाईल व कूलनेस चे प्रदर्शन करत फिरतो, तेव्हा पाहणाऱ्यांपैकी कोणालाही असे वाटत नाही की ह्याला खूपच स्वातंत्र्य मिळालेले आहे आणि तो त्याचा गैरउपयोग करत आहे. पण तोच समाज त्याच मुलाच्या मागच्या सीटवर बसलेल्या मुलीविषयी टिप्पणी करण्यात अग्रेसर असतो; तिला मिळालेल्या स्वातंत्र्याला नावे ठेवतो. तिच्या आई-वडिलांनाही, ज्यांनी तिला स्वतंत्रपणे घराबाहेर फिरण्याची परवानगी दिली आहे, त्यांना ही दोष देतो. अर्थात, मुळातच, मुलींना, स्त्रियांना आणि त्यांच्या स्वातंत्र्यालाच कोणत्याही परिस्थितीत दोष देणे, हे ह्या समाजाला सोपे वाटते, आणि खरे तर, आता हीच आपल्या समाजाची सर्वसामान्य मानसिकता बनली आहे.

आता मी थोडं प्राचीन युगाकडे व पूर्वकालखंडाकडे वळते, जे आज वर्तमानावरही आपले प्रतिबिंब पाडत आहे. “न स्त्री स्वातंत्र्यम् अर्हति!” हे ब्रीद वाक्य जपणाऱ्या प्राचीन भारतीय समाजाविषयी बोलते.आपण सर्वांनी स्प्रिंग पाहिली असेलच ना? स्प्रिंगला कसे खूप वेळ दाबून ठेवले, आणि मग बऱ्याच वेळाने सोडले की ती तितक्याच ताकदीने वर येत आपल्या दाबून ठेवलेल्या हातालाच जोरात लागते. गेल्या कित्येक शतकांपासून दाबून ठेवलेल्या भारतीय स्त्रियांची स्थिती ह्याच स्प्रिंगसारखी झाली आहे. आपल्या भारतीय स्त्रियांच्या दडपशाहीचे युग अनेक दशके नव्हे, तर शतकानुशतके चालत आलेले आहे. आणि आज, ते दमन करणाऱ्यांचे हात हळूहळू सोडले जात असताना, ती स्प्रिंग आपल्या संपूर्ण ताकदीने वर येण्याचा प्रयत्न करीत आहे.

आधुनिक स्त्रिया, ज्या समाजाच्या नजरेत आपल्या स्वातंत्र्याचा गैरवापर करत आहेत त्या बरोबर आहेत असे माझे अजिबात म्हणणे नाही; पण स्त्रीजातीची उत्क्रांती होणे व ज्या कोशात आपण स्त्रिया शतकानुशतके बंदिस्त होतो, त्यातून बाहेर पडण्याचीही एकूणच सामाजिक गरज आहे.

आता, देशातील विभिन्न स्त्रियांच्या विभिन्न कौटुंबिक व सामाजिक परिस्थितींमुळे, प्रत्येक स्त्रीचे वर्तन वेगळे आहे, प्रत्येक स्त्री वेगळ्या पद्धतीने आपले हे आधुनिक स्वातंत्र्य जगत आहे. काही स्त्रिया अजूनही घराच्या चौकटीत मर्यादित राहणे पसंत करतात, तर काहींना परंपरेच्या सर्वच साखळ्या तोडून संपूर्णपणे मुक्त होऊन विहरण्याची इच्छा असते. आणि अशाही बऱ्याच आहेत ज्या ह्या दोनही टोकांवर नसून, ह्या वर्तणुकीच्या परिघाच्या मध्यभागी कुठेतरी असणे पसंत करतात. आणि काही स्त्रिया तर वर उल्लेख केलेल्या सर्वच प्रकारच्या स्त्रियांवर टिप्पणी करत त्यांची आलोचना करण्यातही धन्यता मानतात.

खरे सांगायचे तर, आपण इतरांच्या वागणुकीतील दोष शोधण्याचा प्रयत्न करतो, त्याचे कारणच असे असते की ते जे काहीतरी वागत असतात, ते आपल्याला वैयक्तिकरित्या आवडत नाही. उदाहरणार्थ, बऱ्याच कुटुंबांना मुलींनी जीन्स घातलेले ही मान्य नसते, पण आपल्या सारखी साक्षर कुटुंबे त्याला वाईट मानत नाहीत. तसेच, जर आपल्याला मुलींचे रात्री उशिरापर्यंत पार्ट्यांना किंवा क्लबमध्ये जाणे, रात्री अवेळी बाहेर फिरणे, मद्यपान करणे अतिशय घृणास्पद वाटत असले, तरी समाजाच्या काही घटकांना त्या वागणुकीत काहीच गैर वाटत नाही. हे त्यांना कदाचित त्यांच्या जीवनशैली प्रमाणे सर्वसाधारण वाटत असेल, असेही असू शकते.

तर, माझा मुख्य मुद्दा असा आहे की “स्वातंत्र्याची व्याख्या ही व्यक्तिनिष्ठ आहे” आणि माझा आणखी एक मुद्दा असा आहे की “आपण बोलत असलेल्या ह्या स्त्री स्वातंत्र्याची व्याख्या कोणी आखली?” आणि जेव्हा आपण स्त्री-पुरुष समानतेबद्दल उघडपणे बोलतो किंवा महिला दिन साजरा करताना ‘जेंडर इक्वालिटी’ वर भाष्य करतो, तेव्हा हे स्वातंत्र्याचे नियम पुरुषांनाही लागू व्हायला हवेत ना? त्यांना सामाजिकदृष्ट्या चुकीच्या गोष्टी करण्यापासून देखील प्रतिबंधित केले पाहिजे. जर पार्टी करणे, मद्यपान करणे, अवेळी घराबाहेर मित्रांबरोबर फिरणे चुकीचे असेल तर ते दोन्ही लिंगांसाठी चुकीचे आहे आणि असे करून पुरुष देखील त्यांच्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करत आहेत, हे लक्षात घ्यायलाच हवे! सर्व बंधने आणि सांस्कृतिक पूर्तता केवळ महिला वर्गावर टाकणे अजिबात समर्थनीय नाही, असे मला प्रकर्षाने वाटते.

मला वैयक्तिकरीत्या असे वाटते की प्रत्येक व्यक्तीने आपल्या स्वातंत्र्याचे मोजमाप स्वतः समजून निश्चित करणे आवश्यक आहे आणि अर्थातच ह्यात आपल्या प्रियजनांचा (पालक, जीवनसाथी, इतर जवळच्या कुटुंबीयांचा) विचार करणे ही निश्चितपणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक स्त्रीला हे स्वतःलाच माहिती असावे की तिच्यासाठी खरोखर कोणत्या स्तरावर स्वातंत्र्य आवश्यक आहे. तिला स्वतःला आपल्या स्वातंत्र्याचा गैरउपयोग होत असल्यास, त्याची जाणीव असणे आणि त्यातून तिने वेळेवर सावरणे हे महत्त्वाचे आहे. समाजाने ह्याबाबतीत निकष लावणे योग्य वाटत नाही. प्रत्येक महिलेने स्वतःच्या कृत्यांसाठी स्वतःच जबाबदार असले पाहिजे आणि स्वतःसाठी व आपल्या कुटुंबियांसाठी आपल्या सारासार विवेकबुद्धीच्या आधारावर वेळोवेळी योग्य ते निर्णय स्वतःच घेतले पाहिजेत. ह्यात समाज म्हणून आपण सर्वांनीच “नैतिकतेचे रक्षक” बनून स्त्रियांवर बंधन घालणे खरोखरच आवश्यक नाही.

पुन्हा एकदा आपल्या आजच्या विषयाकडे परत येते; “स्त्री स्वातंत्र्याचा दुरुपयोग होत आहे का?”. माझ्या मते नाही; माझ्या आजूबाजूच्या बहुसंख्य महिलांकडे बघून मला असं वाटत नाही. माझ्या ओळखीतल्या व माहितीतल्या सर्व वयोगटातील स्त्रिया स्वत:चे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आपल्या अधिकारांचा योग्य वापर करत, अत्यंत जबाबदारीने व संवेदनशीलपणे वागत, आपलाच नव्हे, तर आपल्या कुटुंबाचाही उध्दार करत आहेत, प्रगती करत आहेत.
होय, समाजातील काही टक्के स्त्रिया अशा नसतीलही !
ह्या जगात काही अनिष्ट प्रवृत्तीच्या व्यक्ती तर सगळी कडेच असतात आणि अशा व्यक्ती विवेकशून्य वागतात, हे सत्य आहेच! परंतु भारतीय स्त्री खरोखर कशी आहे आणि ती किती समंजस व सक्षम आहे हे स्त्रियांच्या ह्या छोट्याशा तुकडीवरून निर्धारित करू नये.

धन्यवाद !!

— लेखन : प्राची राजे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments