Saturday, April 20, 2024
Homeलेखस्थलांतरीत पक्षी

स्थलांतरीत पक्षी

माणूस एकटा राहू शकतं नाही, तो कायम समाजात, कुटूंबात रहाणं पसंत करतो. तसेच काही पक्षी आणि काही प्राणीही एकत्र कळप करून रहाणे पसंत करतात.
असे सुंदर पक्षी, थव्यानी रोज दिसत असले आजूबाजूला, तर दिवस किती छान जातो, ह्याचा अनुभव सध्या घेत आहे.
ह्या पक्ष्यांचे दिसणे, त्यांच्या लकबी, पाण्यात डुबकी घेणं, एकत्र लयीत पोहणं, कलकलाट करत उडणं हे इतकं सुंदर असतं, कि किती वेळ गेला ते कळत नाही.
“एका तळ्यात होती बदके पिले सुरेख” ऐकत आपण मोठे झालो. पण कुरूप बदक, मला काही अजून दिसलं नाहीये……विविध रंगाची बदकं एकत्र आरामात रमत गंमत करत, खेळतांना दिसतात, फिरतांना दिसतात. त्यांच्या पायाबद्दल लहानपणापासून माहित होतं, पण बदकाला डोळ्यावर ३ पापण्या असतात हे मला माहित नव्हतं.

“बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात”हे गाणे ऐकतांना उडणारे बगळे नजरेसमोर यायचे, पण ते असे v आकारात कां उडतात ते काही कळायचं नाही.
मग कळले एक पुढारी पक्षी असतो. दमला कि तो मागे जातो. दुसरा त्याची जागा घेतो. इतर पक्षी थोडे अंतर सोडून, पहिल्या पक्ष्याच्या वर v आकारात असतात. त्यांच्या पखांच्या हालचाली मुळे हवेचा जो दाब, अडथळा त्यांना जाणवतो तो, असे जाण्यांनी मागच्यांना कमी होतो. त्यांची उर्जा वाचते. असे उडण्याने सगळ्या पक्ष्यांवर लक्ष रहाते. ते आवाज (कलकलाट) करत जातात, कोणी मागचा पक्षी दिशा चुकला तर त्याला कळावे म्हणून..काही अडचण वाटली तर सगळे एकाच जागी खाली उतरतात.
पक्ष्यांचे निरीक्षण करणारे, अभ्यास करणारे, त्यांचा इतका वेळ, वर्ष त्या मागे घालवतात, म्हणून आपल्याला त्यांची माहिती मिळते. त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानायलाच हवेत.

पक्षी स्थलांतर का करतात …. तर थंडीत खाद्य मिळत नाही म्हणून !…खूप ऊन ,थंडी सहन होत नाही म्हणून….तिथे मग घरटी करता येत नाहीत!…झाडच नसतात तीव्र हवामानात..घरटी नाहीत तर पिल्लं वाढविण्यासाठी सुरक्षित आसरे तरी कुठे मिळणार ?…इतर पक्ष्यांमुळे निर्माण होणाऱ्या जगण्याच्या स्पर्धेत टिकाव लागावा म्हणूनही पक्षी स्थलांतर करतात.
ऋतू बदलला कि सूर्यप्रकाशाच्या बदलत्या उपलब्धतेला, बदलत्या तापमानाला पक्षी संवेदनशील असतात. त्यांच्या शरीरात स्रवणारी संप्रेरके त्यांना स्थलांतराची वेळ जवळ आल्याची जाणीव करून देतात. स्थलांतर करण्यापूर्वी पक्षी त्यासाठी तयारी करतात. प्रवास सुरू करण्याची वेळ जवळ आली की पक्षी सातत्याने खातात. त्यांचे शरीर खाल्लेल्या अन्नाचे मेदात रूपांतर करून त्याचा साठा करून ठेवते. काही पक्षी प्रत्यक्ष प्रवास सुरू करण्यापूर्वी कमी अंतर प्रवास करून सराव करीत असल्याची निरीक्षणे पक्षी अभ्यासकांनी नोंदविली आहेत. तयारी पूर्ण झाली की पक्षी स्थलांतर सुरू करतात.

वर्षानुवर्षे स्थलांतराचा नेमका काळ कायम राहिल्याचे माणसाच्या अनुभवास आले आहे. ही वेळ चुकली; तर पक्ष्यांच्या जीवावर बेतते. ठराविक ठिकाणी ठराविक वेळेला पोहोचले नाही; तर अन्न मिळण्याची शाश्वती नसते; तसेच वाटेत धोकादायक हवामानाचा सामना करावा लागू शकतो.काही पक्षी दिवसा; तर काही रात्री प्रवास करतात. दिवसा सूर्य, रात्री आकाशातील तारे यांवरून पक्ष्यांना प्रवासाची दिशा समजत असावी, असे काही प्रयोगांती दिसून आले आहे.

बदकांसारखे इतरही छोटे पक्षी थव्यानी उडतांना दिसतात..
आणि नकळत आपले मनही त्याबरोबर आनंदानी उडत असते.
तुम्हाला आलाय का असा अनुभव ?

— लेखन : चित्रा मेहेंदळे. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Vilas Baburao Sarode,Chh.sambhajinagar, Aurangabad on प्रेरणेचा झरा : अलका भुजबळ
विजय पवार, नासिक on प्रेरणेचा झरा : अलका भुजबळ