: वॉटरमेलन मिंट लेमन मोजितो :
मोजितो हे उन्हाळ्यात सर्वांचे लाडके असे एक मॉकटेल आहे. कलिंगड्याचा लाल सुरेख रंग,लिंबाचा पिवळा तर पुदिन्याच्या हिरवगार रंग याची सुंदरता..आकर्षकता खूपच वाढवतो.पाहूनच पिण्याची तीव्र इच्छा होते. स्वाद तर अफलातूनच जबरदस्त असतो. लिंबाचा आंबटपणा, कलिंगडाची गोडी, पुदिन्याचा खमंग स्वाद यांचा त्रिवेणी संगमच आहे जणू! स्वाद, सुगंध, रंग यामुळे पाहून आणि पिऊन मन फ्रेश आणि तृप्त होते. बनवायला पण अगदीच सोप्पे आहे. उन्हाळ्यात घरातील येणारे पाहुणे नक्कीच खुश होऊन वाहवा करतील. पहायचे ना मग कसे बनवायचे ते !
चला मग..
साहित्य :
1 रसदार मोट्ठे लिंबू , 1 वाटी साल व बिया काढून बारीक कट केलेल्या लाल कलिंगड्याचे तुकडे, 1 पेपरमिंट गोळीचा चुरा, 5..6 पुदिन्याची पाने,1वाटी बर्फाचाचुरा,चाटमसाला स्प्राईट.
कृती :
प्रथम काचेच्या उंच ग्लासमध्ये लिंबाचे बारीक करून 5..6 तुकडे घालावेत. मग त्यात 2..4 पुदिन्याची पाने घालून ते लाकडी दांड्याने थोडेसे क्रश करावेत म्हणजे त्यांचा मस्त फ्लेवर येईल. मग त्यात कलिंगडयाचे तुकडे घालून पुन्हा थोडेसे क्रश करावे म्हणजे त्यातील लाल रस निघेल. आता त्यात बर्फाचा चुरा घालावा. जवळ जवळ पाऊण ग्लास भरला असेल.आता त्यात चाट मसाला घालून सावकाशपणे स्प्राईट घालुन ग्लास पूर्ण भरावा. शेवटी ग्लासच्या काठाला लिंबाची पातळ चकती लावून थंडगार सर्व्ह करण्यासाठी तय्यार आहे आपले सुरेख वॉटरमेलन मिंट लेमन मॉकटेल!लगेंच सर्व्ह करा …
वैशिष्टय :
हे पित्तनाशक, अनेक व्हिटॅमिन्स, विविध गुणांनी परिपूर्ण असे एक सुरेख मॉकटेल आहे. यातील लिंबू , पुदिना, स्प्राईट, कलिंगडे आणि चाट मसाला यांच्या विविध चवी एकत्र आल्यामुळे खूपच मस्त टेस्ट येते. उत्साह वाढवणारे, पाण्याची पातळी व्यवस्थित राखून शरीरास थंडावा देणारे असे हे गुणकारी शीतपेय आहे. उन्हाळ्यातील विविध विकार दूर ठेवून पाचक असे हे मॉकटेल आहे .बनवायला सोपे आणि झटपट होणारे असल्यामुळे घरातील छोट्या पार्टीच्या वेळी वेलकम ड्रिंक म्हणूनही हे बनवा आणि शाबासकी मिळवा . याचं प्रमाणे आंबा, संत्रा किंवा तुमच्या आवडीचे फळ, ज्यूसेस घालून सुद्धा वेगवेगळ्या रंगांचे,फ्लेवरचे मोजितो बनवा. नक्की आवडतील.

: स्वीट मँगो लस्सी विथ फ्रेश क्रीम :
उन्हाळा म्हटला की फळांचा राजा आंबा याचे घरोघरी मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते. याच्यापुढे कोणतेही पक्वान्न फिके पडते. मग याचे तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ बनवले जातात. तसेच थंडगार पदार्थ पण बनवून सेवन केले जातात.
लस्सी हा प्रकार भारतातील पंजाब येथे प्रथम सुरु झाला .अजूनही तिथे वर्षभर लस्सींचे विविध प्रकार आनंदाने बनवले जातात. पाहुण्यांचे स्वागत आपल्याकडे चहा ,कॉफीने करतात तसे तिथे लस्सी ,छाच म्हणजेच ताक यांनी करण्याची पद्धत आहे. साधी लस्सी तर आपणही बनवतोच पण उन्हाळ्यात आंब्याच्या खास सिझनमध्ये ही स्पेशल लस्सी करून पहाच..सर्वजण तृप्त , खुश होऊन नक्कीच प्रशंसा करतील. करूया ना मग सुरुवात ?
साहित्य :
2 कप आंब्याच्या फोडी ,2 कप स्वीट ,घट्ट दही, अर्धा कप फ्रेश क्रीम किंवा व्हीप्ड क्रीम , 7..8 वेलदोडे , 7..8 केशर काड्या ,2..3 चमचे साखर, 2..4 आईस क्युब्ज.
कृती :
प्रथम दिड कप आंब्याच्या फोडी मिक्सरमध्ये घालून व्यवस्थित फिरवून घ्याव्यात. बाकीच्या फोडीन्चे बारीक तुकडे करावेत.
आता मिक्सरमधील आंब्याच्या पल्प मध्ये दही, 2 चमचे साखर व वेलदोडे सोलून घालावेत व 2 आईसक्युब्ज घालून मस्त ब्लेंड करावे.आता काचेच्या ग्लासमध्ये हे मिक्सर मधून ब्लेंड केलेले घालून त्यावर आंब्याच्या फोडींचे तुकडे घालावेत. आता थोडे आईसक्युब्ज व 1 चमचा साखर घालून व्हिप्ड् क्रीम किंवा फ्रेश क्रीम ब्लेंडरने व्यवस्थित भरपूर फेटून हलके झाल्यावर ग्लासमध्ये घालावे . शेवटी त्यावर केशर काड्या घालून सजवावे .आवडत असेल तर ड्रायफ्रुट्सचे पातळ काप घालावेत . व थंडगार सर्व्ह करावी.

वैशिष्टय :
ही स्वीट मँगो लस्सी दिसायलाही तितकीच स्वीट दिसते. वरून मँगो आईस्क्रीम घातल्यास आणखी मज्जा येते. मधूनच लागणारी आंब्याची फोड लज्जत वाढवते तर क्रीममुळे वेगळाच रिचनेस येतो. ही लस्सी घट्टसर असते त्यामुळे लगेंच पोट भरते.उपवासासाठी तर ही एक पर्वणीच आहे. लहानापासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच आवडेल. उन्हाळ्यात जेवण, मसाल्याचे , गरम पदार्थ खाणे नकोसे होते. अशावेळी लगेच पोटभरण्यासाठी थंडगार , टेस्टी स्वीट लस्सी हा उत्तम पर्याय आहे. याचप्रमाणे स्ट्रॉबेरी, बनाना, चिकू,पपई, सीताफळ, खरबूज, अननस …अशा विविध आवडेल त्या फळाची आपण लस्सी बनवू शकतो.सर्वच लस्सी एकापेक्षा एक स्वादिष्ट बनतात.
— रचना : सौ.स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
खूप छान रेसिपी आणि वर्णन 👌👌👌👌👌