Monday, February 17, 2025
Homeसेवा'स्नेहा'ची रेसिपी - १

‘स्नेहा’ची रेसिपी – १

“उकडीचे मोदक”

नमस्कार मंडळी.
आजच्या, गुरुवार पासून आपण पाक शास्त्र, पाक कलेविषयक “‘स्नेहा’ची रेसिपी” ही लेखमाला सुरू करीत आहोत.

ही लेखमाला पुणे येथील स्नेहा मुसरीफ या  लिहिणार आहेत. त्यांना स्वयंपाक करणे, वाचन आणि लेखनाची आवड आहे. त्यांचे पाककले विषयक कार्यक्रम या पूर्वी झी टिव्ही, ई टिव्ही मराठी, साम इत्यादी वाहिन्यांवर झाले आहेत. पाक कलेच्या विविध ठिकाणी स्पर्धांमध्ये त्या परिक्षक म्हणून ही जात असतात. अशा कित्येक स्पर्धेत स्वतः त्यांना अनेक बक्षीसे मिळाली आहेत. त्यांनी आजवर त्यांचे रेसिपी विषयक ११७५ लेख  प्रकाशित झाले आहेत.

येत्या शनिवारी, १ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री गणेश जयंती आहे. हा मुहूर्त साधून आपण सौ स्नेहा मुसरीफ यांचा, श्री गणेशालाच नव्हे तर आपल्या सर्वांना आवडणारे” *उकडीचे मोदक* ” हा पहिला भाग प्रसिद्ध करीत आहोत.

सौ स्नेहा मुसरीफ यांचे न्यूज स्टोरी टुडे परिवारात हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
               – संपादक

श्री गणेश जयंतीसाठी आता साऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी मंडप घालून, व्यवस्था करणे सुरु झाले आहे, तर महिलांची तऱ्हेतऱ्हेचे मोदक बनवण्यासाठी सुरुवात झाली आहे. बाजारात अनेक मिठायांच्या दुकानात तर मोदकांसाठी झुंबड पडते. असंख्य प्रकारचे मोदक मिळतातही, पण उकडीच्या मोदकाची, गरम गरम .. पांढरेशुभ्र मोदक .. त्यावर साजूक तुपाची धार सोडून खाण्यात एक आगळेच स्वर्गसुखच असते.
आपण हे सुंदर मोदक घरी सुद्धा बनवू शकतो. गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी त्यांच्या आवडीचे खास पांढरेशुभ्र मोदक आता आपण घरीच बनवूया आणि भरपुर बनवुन मनसोक्त ताव मारुया. हे मोदक खाऊन बाप्पा पण नक्कीच खुश होणार आणि भरभरून आशीर्वाद  देणार. चला, तर मग लागायचे तयारीला ?

साहित्य : सारणासाठी….
१ वाटी गच्च दाबून भरून मोठी वाटी नारळाचा  चव, अर्धी वाटी बारीक केलेला गुळ, 1 चमचा खसखस, 1 चमचा वेलची पावडर, 1 चमचा साजूक तूप.

पारी साठी साहित्य :
1 वाटी बासमती तांदुळाची पिठी, 1 चमचा मैदा, पाव वाटी वरून लावण्यासाठी तांदुळाची पिठी, चवीनुसार् पारीसाठी थोडेसे मीठ,  3..4 चमचे साजूक तूप, 1 वाटी पाणी, केशरांच्या काड्या, वरून खाण्यासाठी साजूक तूप.

कृती : सारण बनवण्याची :
1 नारळ फोडून कुकर मध्ये 1 शिट्टी देऊन कोमट झाला की सुरीने झटपट सुटतो. मग त्याची साल काढण्याने साल काढून बारीक तुकडे करून मिक्सर मधून बारीक फिरवून घ्यावेत. गॅसवर कढई ठेवून ती गरम झाली की आधी खसखस थोडीशी भाजून घ्यावी व किंचित ठेचावी म्हणजे तिचा स्वाद खूप मस्त येतो. नंतर त्याच कढई मध्ये 1 चमचा तूप घालून त्यात नारळाचा चव थोडासा ओलसरपणा जाईपर्यंत परतावा. तसे नारळाचे पण तेल असते पण ते सुटेपर्यंत परतायचे नाही शिवाय तुपामुळे सारणाला खुप् सुरेख स्वाद येतो. आता त्यात गुळ घालावा. मग वेलची पावडर घालावी. गुळ पूर्ण विरघळेपर्यंत व्यवस्थित परतावे आणि मग गॅस बंद करावा. सारण खूप ओलसरही नसावे आणि अगदी कोरडेही नसावे. चुकून जास्त कोरडे झाले तर चिंता न करता मिक्सर मधून थोडेसे फिरवावे म्हणजे मोकळे होईल, आणी खूप मोकळे झाले असेल तर अगदी किंचित दूध घालावे. म्हणजे सारण ओलसर होईल व मोदक छान लागतात.
आता हे सारण होऊ द्यावे. तोपर्यंत पारीची तयारी करू.

पारीची कृती :
गॅसवर एका जाड बुडाच्या भांड्यात 1 वाटी पाणी उकळायला ठेवू. मग त्यात 1 चमचा तूप घालून  ते वितळले की चवीसाठी पाव ते अर्धा चमचा मीठ  घालावे. नंतर त्यात  1 वाटी तांदुळाची पिठी व 1 वाटी मैदा घालावा व लाकडाच्या दांड्याने किंवा लाटणे. रवी यांनी
भराभर घोटून व्यवस्थित मिक्स करावे व लगेंच झाकण ठेवून गॅस बंद करावा. 10 मिनिटे तसेच ठेवावे. त्यानंतर ते पसरट थाळी किंवा तसराळ्यात काढून घेऊन असेल तर पोळी भाजण्याच्या दाबण्याने‌ किंवा ग्लास, वाटी यांनी छान दाबून घोटावे म्हणजे छान नरम होईल. मग ते चिकटू नये म्हणून  1..2 चमचे तूप घालून  लागेल तसे थोडेसे पाणी लावत भरपूर घोटावे. जेवढे जास्त मळले ..घोटले जाईल तेवढी पारी पातळ, न तुटणारी आणि तुपामुळे एकदम सॉफ्ट, मुलायम होते. मग त्याचा एक छोटा गोळा करून पारीसारखा बनवून पहावा. तो चिकट न होता सॉफ्ट आणि  चिरा न पडणारी पारी बनली तर ते परफेक्ट झाले असे समजावे. मग त्याचे टेनिसच्या बॉलपेक्षा थोडेसे छोटे बॉल्स बनवून ते पोळपाटावर थोडी तांदुळाची पिठी लावून छान पातळ पारी बनवावी. मैदा घातल्यामुळे पारी पातळ होते आणि तुटत सुद्धा नाही आणि तुपामुळे चमकदार मोदक सुरेख दिसतात. स्वाद सुद्धा खूप मस्त येतो.
मग त्या पारीमध्ये थंड झालेले सारण भरपूर  भरावे. मग साडीच्या निर्याप्रमाणे वरपासून जास्तीतजास्त खालपर्यंत कळ्या पाडून वरती  हलक्या हाताने सर्व टोके एकत्र करून व्यवस्थित बंद करून मस्त टोक काढावे. प्रत्येक मोदकावर एकेक केशराची काडी ठेवावी. अशाप्रकारे सर्व मोदक बनवून घ्यावेत. मग गॅसवर मोदकपात्र ठेवून त्यात पाणी उकळण्यास ठेवावे. मोदकपात्रातील जाळीच्या डिशमध्ये थोडेसे तूप लावून त्यावर सर्व मोदक ठेवावेत. पाणी छान उकळायला लागले की त्यात ही डिश  ठेवून पंधरा मिनिटे दणकून वाफ द्यावी. आता मोदकांचा रंग छान वाफल्यामुळे चमकदार, पांढराशुभ्र  झालेला असेल. वरच्या केशरकाड्यान्चा छान केशरी रंग टोकाला दिसत असेल.

हे मोदक पात्रातून सर्व्हिंग डिश मध्ये काढून  गरम गरम मोदक थोडासा फोडून त्यावर भरपूर साजूक तूप घालून घ्यावे व गरमगरमच खायला द्यावेत. गुळामुळे खूप मस्त खमंग गोडाची चव येते.

वैशिष्टय :
हे मोदक या पद्धतीने  बनवले तर खात्रीने सुरेखच होतात. रंग, स्वाद, चव सर्वच उत्तम जमते. मीठामुळे पारीला छान चव येते. वेलची पावडर, केशर, गुळ, तूप आणि  खसखस यांच्या सुरेख संगमामुळे  आणि एकदम पातळ, एकदम पांढरीशुभ्र, किंचित नमकीन पारी यामुळे हा मोदक खाणे म्हणजे स्वर्गसुखच. गणपती बाप्पा  तर नक्कीच खुश होणार . या साहित्यात साधारण 10 ते 12 मोदक बनतात.
क्रमशः

— लेखन : सौ स्नेहा मुसरीफ. पुणे
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. स्नेहा, मोदक खूपच सुरेख झालेले दिसताहेत. खायला नक्कीच येणार.😋😋 आणि कृती सुद्धा सोपी वाटते आणि समजाऊन सांगायची पद्धत सुद्धा सुंदर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments