शाही स्वीट सँडविच
साधारणपणे सँडविच म्हटले की डोळ्यांसमोर चटपटीत , स्पायसी असे एक तर क्लब सँडविच नाहीतर ग्रिल्ड सँडविच येते. चौकोनी ब्रेड मध्ये कट करून केलेले त्रिकोणी आकाराचे ,चटण्या , सॉसेस , भाज्या ,कधी तर कडधान्य वापरूनही केले जाणारे सँडविच . पण आजचे आपले हे शाही सँडविच नावाप्रमाणे खरोखरच शाही, खूपच वेगळे असे आहे .चला तर मग लगेंच लागू या तयारीला ..
साहित्य :
8 सँडविच ब्रेड स्लाईस,
अर्धी वाटी साखर , केशर काड्या ,1 चमचा वेलची पूड , पाव चमचा लिंबाचा रस , अर्धी वाटी फ्रेश क्रीम ,
अर्धी वाटी व्हाईट बटर ,
25 बदाम ,25 काजू यांचे पातळ कट केलेले तुकडे किंवा आवडीनुसार चुरा , 2 चमचे मनुका किंवा 4..5 अंजीर क्रश केलेले , सजावटीसाठी 10 पिस्त्यांचे तुकडे , किंवा स्पार्कल्स .
कृती :
प्रथम ब्रेड स्लाईस धारदार गोल झाकण किंवा वाटीने कट करून घ्यावे . मधला गोल ठेवून बाजूच्या कडा मिक्सरमध्ये तुकडे करून फिरवून घ्यावेत व सुकवून ब्रेडक्रम्स बनवून ठेवावेत . भरपूर दिवस छान टिकतात आणि विविध पदार्थ बनवताना उपयोगी पडतात .
आता गॅसवर कढईत साखर घालून त्यात अर्धी वाटी पाणी घालून पाक करण्यास ठेवावा .त्यात केशर व अर्धी वेलची पूड घालून सतत ढवळत राहावे .कडेने बुडबुडे येऊन पाक घट्ट होत आला की गॅस बंद करून त्यात लिंबाचा रस घालावा म्हणजे साखरचे कण बनणार नाहीत .हा पाक थंड करण्यास ठेवावा .
आता मोठ्ठया बाऊलमध्ये क्रीम घालून त्यात सजावटी साठी थोडे थोडे काजू व बदाम बाजूला ठेवून बाकी सर्व त्यात घालावेत .मनुका किंवा अंजीर सुद्धा त्यात घालून व्यवस्थित मिक्स करावे व अर्धी वेलची पूड घालून स्टफींग बनवून घ्यावे .नंतर सर्व ब्रेड स्लाईसना बटर् लावून घ्यावे .मग त्यावर स्टफींग स्प्रेड करावे व वरून पुन्हा दुसरा स्लाईस ठेवून सँडविच बनवून घ्यावे .मग हे सँडविच पाकात व्यवस्थित डिप करून पाक निथळला की सर्व्हिंग डिश मध्ये ठेवावे . शेवटी काजू ,बदाम ,पिस्ते यांचे काप ,स्पार्कल्स यांनी सुंदर सजवावे व खाण्यास तयार आहे आपले शाही स्वीट सँडविच .
वैशिष्ट्य :
नावावरूनच याच्या खास शाही थाटाची कल्पना येते. यातील सर्व साहित्य , देखणेपणा ,सर्वच खास दरबारी थाट असलेले दिसतेच .पाहूनच खाऊन बघण्याची जबरदस्त उर्मी होते . गोड असल्यामुळे पित्त होत नाही ,ड्रायफ्रुट्स मुळे शक्तीवर्धक ,आरोग्यदायी आहे .केवळ मुलांनाच नाही तर तुम्हाला देखील हे नक्कीच आवडेल .

— लेखन : सौ .स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
छान आणि सोपी पाककृती !!👌🏻