: रव्याच्या कुरडयाचा चिक :
उन्हाळा सुरु झाला की लहानपणीचे गोड दिवस आठवतात. शाळेला सुट्टी सुरु झाली की आईची उन्हाळी कामे सुरु करण्याची लगबग सुरु व्हायची. आम्हा मुलांना तर पर्वणीच वाटायची. पापडाच्या बोट्या, लाट्या, मुरांबे, लोणची, कैरीची चटणी.. खारवड्या, चिंचेचे बॉम्बगोळे करून खायचे, ज्वारीच्या, कोंड्याच्या पापड्या, सांडगे, कुरडया, कुल्फी, आईस्क्रीम, साबुदाण्याच्या पापड्या, वेगवेगळे पापड, शेवया असे कित्तीतरी पदार्थ दररोज एकेकांच्या घरातले बनवले जायचे. आमचा वाडा मोठा होता. मध्यभागी मोठे अंगण, सुंदर तुळशी वृंदावन, मोठ्ठी गच्ची होती.
वाडा म्हणजे एक कुटुंबाच होते जणू. सकाळी नळावर पाण्यासाठी भांडण झालेले पाणी गेले की लगेंच विसरून पुढच्या कामाला हसत खेळत लागायचे. मग उन्हाळी कामे एकमेकींच्या मदतीने व्हायची. त्यात अर्धवट वाळलेल्या पापड्या, सांडगे, किंवा कुरडया दुपारी गुपचूप खाण्यात काही औरच गंमत वाटायची. कुरडयाचा तर जंगी प्रोग्रामच असायचा. पीठ शिजवलेले मोठ्ठे पातेले पुरुषांनी गच्चीवर आणून द्यायचे. मग सोऱ्या, डाव, एका भांड्यात पाणी .. पीठ सोऱ्यात भरताना हाताला चटके बसू नयेत म्हणून आणि कुरडया घालण्यासाठी लुगडी किंवा धोतर नाहीतर पुढे प्लास्टिकचा मोठा कागद, वाऱ्याने, हवेने उडू नये म्हणुन बाजूंनी ठेवायला दगड, विटा .. आणि आम्ही मुले आपापल्या घरातून बशा आणायचो. दूध, साखर आणि साजूक तुपाचे भरलेले तामले असायचे सोबत.
बशीत मग गरमगरम चिक प्रत्येकाला पोटभर मिळायचा. त्यावर कुणाला तूप नाहीतर कोणाला दूध साखर जे आवडेल ते घालून मनसोक्त ताव मारायचो. ‘गेले ते दिन गेले..’ आता ते सारे नाही मिळाले तरी आवडणारी सर्वांत आवडणारी एक गोष्ट मात्र नक्की मिळेल ती म्हणजे कुरडयाचा चीक! आता वाळवण्यासाठी पुरेशी जागा नसल्यामुळे करणे शक्य होत नाही पण खाण्यासाठी आपण अगदी तस्साच शिवाय आटापिटा न् करता सोप्प्या पद्धतीने चीक बनवू शकतो. पाहायचे मग ?
साहित्य :
1 वाटी रवा, चिमूटभर हिंग, 1 चमचा खसखस, चवीनुसार मीठ, साजूक तूप किंवा आवडत असेल तर दिड वाटी दूध, पाव वाटी साखर.
कृती :
रवा 2 दिवस भरपुर पाण्यात भिजवून ठेवावा. कारण तो फुगत असतो. दररोज त्यातील पाणी बदलावे. म्हणजे त्यातील आंबलेले पाणी आणि तांब म्हणजे रव्यात असलेले गव्हाचे असलेले एकदम बारीक लालसर रंगाचे कण निघून जातात आणि चीक छान पांढराशुभ्र होतो.
नंतर तिसऱ्या दिवशी करण्याच्या वेळी पुन्हा वरचे सर्व पाणी काढून रवा मिक्सर मधून फिरवून घ्यावा. थोडाच फिरवावा लागतो. एकदम बारीक रवा असेल तर नाही फिरवला तरी चालतो, पण एखादेवेळी रवा किंचीत जाड असण्याची शक्यता असते. अशावेळी चीक रवाळ होतो. एकदम सॉफ्ट झाला की छान टेस्टी बनतो.
मग त्यात हिंग, चवीनुसार मिठ घालून मिक्स करून ठेवावे. आता गॅसवर जाड बुडाची कढई किंवा पातेले आतून तुपाचा हात लावून ठेवावे म्हणजे चीक चिकटत नाही आणि थोडासा बुडाला लागला तरी खरपड छान आणि लगेंच निघते. मग त्यात दीड वाटी पाणी घालून उकळायला ठेवावे. गव्हाच्या चिकाला दुप्पट पाणी लागते पण रव्याच्या चिकाला कमी पाणी लागते. पाण्याला उकळी आली की त्यात आवडत असेल तर खसखस घालावी. अगदी गरजेचीच आहे असे नाही पण मध्ये मध्ये छान कण चमकदार दिसतात. मग आच मंद करुन त्यात सावकाशपणे चीक घालावा आणि लगेंच लाकडी चाटू .. डावाने किंवा लाटण्याने भराभरा घोटावा म्हणजे गाठी होणार नाहीत आणि पोळत पण नाही. आपण कस्टर्ड बनवताना जशी काळजी घेतो तसेंच याचे पण आहे. एकदा सर्व चीक एकजीव झाला गाठी नं होता की मग डाव बाहेर काढून व्यवस्थीत झाकण ठेवावे. मंद गॅसच ठेवावा. एक ..दोन वाफा दणकून आल्या की चिकाचा रंग बदलतो. सिल्व्हर कलरचा चमकदार रंग सुरेख आला की आपला चीक खाण्यासाठी तयार झाला असे समजावे.
छान डिशमध्ये खाण्यासाठी घेऊन त्यावर भरपूर साजूक तूप घालून खूपच टेस्टी लागतो. आंबट, नमकीन अशी मस्त चव लागते. हिंगाचा आणि साजूक तुपाचा खमंग स्वाद त्यावर खूपच लज्जत आणतो.
काहीजण दूध आणि साखर घालून त्याला उकळी आली की त्यात पाण्यात जसा शिजवतो तसा शिजवतात आणि तूप घालून खातात. आंबट, गोड, नमकीन अशी चव सुद्धा छानच हलव्यासारखी लागते.
वैशिष्टय :
गव्हाचा चीक करणे म्हणजे खूपच अवघड, किचकट, रामरगाड्याचे काम वाटते. पुन्हा ते खूप चिकट असल्याने भरपूर भांडी, गाळण्यासाठी तलम कापडे किंवा गाळणी लागतात. त्यांना गव्हाचा कोंडा चिकटू नये म्हणून भरपूर तेल लावावे लागते. इतके सारे करूनसुद्धा कधी कधी गव्हाची तांब उतरतेच. त्यापेक्षा हा रव्याचा चीक करणे एकदम सोपे आहे. कमीतकमी कष्टात अगदी तस्सा चीक बनतो. थंड हवा असेल तर एखादा दिवस जास्त पाण्यात ठेवावा. इतका सोपा आहे, पोटभरीची दमदार आणि हेल्दी डिश आहे. चावायला सोपी आणि पौष्टिक डिश नक्की करून पहाच एकदा. याच चिकाच्या कुरडयाही बनवता येतात. फक्त कुरडया करण्यासाठी मात्र घट्ट चीक शिजवावा लागतो. नाहीतर तार चपटी येते आणि त्या तळल्यानंतर फुलत नाहीत. खाण्यासाठी थोडासा सैलसर असला तरी चालतो.

— लेखन : सौ. स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800