Wednesday, April 23, 2025
Homeकला"स्नेहाची रेसिपी" : ८

“स्नेहाची रेसिपी” : ८

“उन्हाळा स्पेशल”

नमस्कार मंडळी.
दिवसेंदिवस उन्ह चांगलेच तापत चालले आहे. त्यामुळे आजच्या भागात उन्हाळा लक्षात घेऊन ४ रेसिपी सादर करण्यात येत आहेत. एकाच वेळी ४ रेसिपी लिहून दिल्याबद्दल सौ स्नेहा मुसरीफ यांचे मनःपूर्वक आभार.या रेसिपी बनवाल, त्यावेळी आम्हाला बोलवायला विसरू नका!☺️
        — संपादक

१. “वर्जिन मोजितो मॉकटेल्स”

मॉकटेल मधील सर्वांत जास्त मागणी असणारा. सर्वांनाचा लाडका हा कोल्ड्रिंकचा प्रकार असून हे तसे एनर्जी ड्रिंक , रिफ्रेशमेंट ड्रिंक , डायजेशन साठी बेस्ट असलेले बहुगुणी  शीतपेय आहे . जेवताना ,जेवण्यापूर्वी किंवा नंतर कधीही हे पिण्यासाठी उत्तमच असते . खास करून उन्हाळ्यात तरी शरीरातील पाणी कमी होऊ नये म्हणून आणि थंडावा निर्माण करण्यासाठी हे आवर्जून प्यायले जाते .हॉटेल्समध्ये जेवताना बहुतेक टेबलवर ही दिसतातच. पण खरंतर ही बनवायला खूपच सोपी असतात . घरी झटपट बनवू शकतो ते पण अनेक प्रकारे आणि अगदी स्वस्तात . उन्हाळ्यात  घरात काही सॉफ्ट कोल्ड्रिंक्स , लिंबे ,पुदिना , फ्रुट्स असतातच त्यातुन आपण विविध कॉम्बिनेशनस् करून विविध  प्रकारची मॉकटेल्स बनवू शकतो. पहायचे मग..
  मिंटलेमन मोजितो :

साहित्य :
2..3 रसदार लिंबे,थोडा पुदिना , पेपरमिंटच्या 2  गोळ्यान्ची पावडर ,  सोडा  , चाट मसाला , साखर , भरपूर बर्फाचा चुरा , मिठ  .

कृती :
प्रथम एका लिंबाच्या एकदम पातळ चकत्या करून ठेवू त्या सजावटी साठी उपयोगी पडतील . 2..3  लिंबांचे बारीक तुकडे बनवून ठेवू .
आता एका काचेच्या उंच ग्लासमध्ये 5..6 लिंबाच्या फोडी ,8..10 पुदिन्याची पाने घालून ती लाकडी दांड्याने किंवा लाटणे..रविच्या दांड्याने थोडीशी ठेचावीत म्हणजे सालीसकट लिंबू आणी पुदिना यांचा छान एकत्र फ्रेश सुगंध येईल . मग त्यात 1 चिमूटभर पेपरमिंटच्या गोळ्यांची पावडर घालावी .याचा खूपच सुरेख आणि वेगळा फ्लेवर येईल . नंतर त्यात 1चमचा साखर घालून थोडासा चाट मसाला घालावा त्याचा स्वाद आणि टेस्ट खूपच सुरेख लागते .आवडत नसेल तर चिमूटभर मिठ  चवीसाठी घालावे .त्यानंतर त्यात भरपूर म्हणजे पाऊण ग्लास भरेपर्यंत बर्फाचा चुरा घालावा व हे सर्व सुरी किंवा चमच्याने छान मिक्स करावे .शेवटी एका बाजूने उंचावरून  न घालता सावकाशपणे ग्लास भरेपर्यंत सोडा घालावा .म्हणजे तो फेस होऊन बाहेर सांडणार नाही . आता ग्लासला सजावटी साठी लिंबाची एक पातळ चकती ग्लासच्या काठावर  लावावी आणि लगेंच थंडगार सर्व्ह करावे .

वैशिष्टय:
यातील लिंबू आणि पुदिना फ्रेश स्वादाबरोबरंच आरोग्यासाठी उपयुक्त आहेत . लिंबातून भरपूर  व्हिटॅमिन सी मिळते .त्यात रोगप्रतिकारक शक्ती असते ,त्वचेसाठी, केसासाठी,अपचन ,ऍसिडिटी, वजन कमी करण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी ,उत्साह ,  ऊर्जा वाढवण्यासाठी  खुप उपयोगी असते .पुदिना तर उत्तम आरोग्यासाठी खजिनाच आहे. याचे खूप फायदे आहेत . अगदी केसापासून पायाच्या नखांपर्यंत सर्व शरीरासाठी हे उत्तम टॉनिक आहे . संधीवातापासून ते पोटाच्या विविध तक्रारी , रक्तदोषांतक , त्वचेचे विकार , दात ,  हार्ट यान्च्या तक्रारी दूर करतो  . स्त्रियांसाठी तर हा परीसच आहे . हा ताजा उपलब्ध नसेल तरी वाळवुन ठेवलेला वापरला तरी चालतो पण खाणे खूप फायद्याचे आहे .सर्वांत महत्वाचे म्हणजे दिसायलाही  आकर्षक असून टेस्ट तर लाजवाबच असते . सोड्यामुळेसुद्धा पचन उत्तम होण्यास मदत होते .

२.  आवळा सरबत :
उन्हाळ्यात घरोघरी, रस्त्यावर, दुकानात,कोल्ड्रिंक्स हाऊसमध्ये निरनिराळ्या प्रकारची रंगीबेरंगी, तर्हेतर्हेची सरबते उपलब्ध असतात
कारण उष्णतेमुळे शरीराला पाण्याची जास्तीत जास्त गरज भासते . म्हणूनच पाण्याचा ज्यात जास्तीत जास्त समावेश असेल ,जे शरीराला भरपूर थंडावा देऊन उष्णतेचे सर्व विकार दूर करेल , शिवाय चवदारसुद्धा असेल असे सरबत आपण आता बनवू या .

आयुर्वेदात आवळ्याला सर्वांत वरचे स्थान आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आवळा पोटात जाणे आपल्या तब्येतीसाठी .. केस..डोळे ..दात..नखें. त्वचा यापासून ते विविध आजार, जसे की पित्त जळजळ, मळमळणे , उत्तमवाढीसाठी,बुद्धीवर्धक ,
बलवर्धक , आरोग्यदायक आहे. हे आवळा सरबत वर्षभर दररोज पिण्यासारखे , झटपट आणि टेस्टी असते ..

साहित्य :
पावकिलो मोठ्ठे रसदार आवळे , दीड ते 2 वाट्या साखर ,2 मोठ्ठी रसदार  लिंबे ,  1 चमचा मीठ ,1 चमचा सैंधव , 1 चमचा मिरपूड ,पाव चमचा चाट मसाला , बर्फ , आवडत असेल तर किंचित लेमन फूड कलर .

कृती :
प्रथम आवळे मधली बी काढून कट करावेत . मग ते  मिक्सर मधून भरपूर फिरवून घ्यावेत .नंतर एका भांड्यात पातळ स्वच्छ कपडा..घालून त्यात हे मिक्सर मधून काढलेले आवळ्याचे रस सुटलेला बारीक झालेला गर घालावा व घट्ट पिळून रस काढून घ्यावा . चोथा  सुद्धा वाया न घालवता त्यात सैंधव ,ओवा ,हिंग थोडेसे खिसलेले आले घालून मिक्स करून वाळवून पाचक सुपारी बनवावी . ही पोटासाठी खूप उपयुक्त आणि टेस्टी बनते .
आता आवळ्याच्या रसात ..साधारण पाऊण वाटी असेल तर 2 वाट्या साखर घालून गॅसवर उकळण्यास ठेवावे .साखर विरघळुन गेली की साधारण एक उकळी आल्यावर त्यात मिठ, सैंधव , मिरपूड घालून  अर्धा चमचा चाट मसाला घालावा आणि  लगेंच खाली काढावे . पाक होऊ देण्याची गरज नाही .थंड झाल्यावर आवडत असेल तर तसेंच राहू द्यावे.नाही तर पुन्हा कपड्यातुन गाळून घ्यावे म्हणजे मिरपूडी चे जाडसर कण राहिले असतील तर ते गाळले जाऊन स्वच्छ सिरप मिळेल .आता लिंबाचा रस काढून तो सिरपमध्ये घालावा .आवडत असेल तर लेमन फूडकलर घालून सुंदर रंगीत सिरप बनवावे .
आता आपण त्यापासून आवळ्याचे सरबत बनवूया .
त्यासाठी एका ग्लासात बर्फाचे तुकडे घालून त्यात आवडीनुसार स्ट्रॉंग ..माईल्ड जसे आवडते त्याप्रमाणे 2 ते अडीच चमचे सिरप घालावे . आवडत असेल तर सब्जाचे भिजवलेले  बी घालावे . मग पाणी घालून त्यात चाट मसाला घालावा म्हणजे खूपच टेस्टी लागते.वरून सजावटीसाठी पुदिन्याचे किंवा तुळशीचे पान घालावे व थंडगार सरबत सर्व्ह करावे .

वैशिष्टय:
हे सिरप वर्षभरही टिकते . खूप गुणकारी असून बाराही महिने दररोज पिण्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते . लिंबाचा रस थंड झाल्यावरच मिक्स करावा .त्यामुळे कडवटपणा येणार नाही उलट आंबट चवीमुळे छान चटपटीतपणा येतो . उत्साह वाढतो .शिवाय लिंबू हे उत्तम प्रीझर्वेटीव असल्यामुळे वेगळे काही घालण्याची आवश्यकता नाही . चाटमसाल्यामुळे याची लज्जत आणखीनच वाढते . पुदिना..तुळशीचे पान.. सब्जा..आवळा  सर्वच हर्बल असल्यामुळे  शरीरासाठी हे उत्तम शीतपेय आहे .

   ३.  व्हर्जिन पिनाकोलाडा मॉकटेल :
मॉकटेल आणि कॉकटेल असे मोठ्या रेस्टोरंटसमध्ये शितपेयाचे दोन प्रकार उपलब्ध असतात . कॉकटेल मध्ये अल्कोहोल म्हणजे रम , बियर , व्हिस्की ,वाईन असे घालून किंचित नशा आणणारे पदार्थ फ्रुट्स ज्यूसेस घालून बनवले जातात. तर  मॉकटेल मध्ये अल्कोहोल आजिबात नसते .फक्त फळे ,ज्यूसेस , क्रश , आइसक्रीम असे पदार्थ वापरून हेल्दी शितपेय बनवले जाते . आरोग्यासाठी खूपच लाभदायक असते . आता मुलांनाही उन्हाळ्याच्या सुट्ट्या असणार ,त्यामुळे बाहेर जाण्याचा,सेलिब्रेशचा मस्त मूड असणार .असा खास दिवस आणखी खास सर्वांच्या आवडत्या पिनाकोलाडा मॉकटेलने सेलिब्रेट केला तर आणखी मज्जा येईल ना ? चला ,तर मग लागू या तयारीला !

साहित्य :
अर्धी वाटी अननसाचे साल काढून काटे काढून स्वच्छ करून बारीक केलेले तुकडे , अर्धी वाटी अननसाचा ज्यूस,  1 वाटी नारळाचे दूध , अर्धी वाटी शहाळ्यातील मलई , 1 मोठा स्कूप..किंवा 2 मध्यम स्कुप्स व्हनिला आईस्क्रीम , अर्धी वाटी आईसक्युब्ज , सजावटीसाठी अननसाची पातळ  चकती , एखादी चेरी , कलरफुल स्प्रिन्क्लरस् .

कृती :
साहित्य आधीच तयार करून ठेवलेले असल्यामुळे हे मॉकटेल बनवायला अगदी कमी वेळ आणि सोपे जाते . सर्वांत आधी मिक्सर किंवा ज्युसरच्या भांड्यात थोडेसे अननसाचे तुकडे बाजूला ठेवून बाकीचे सगळे घालावेत . मग त्यात टेंडर कोकोनट म्हणजेच शहाळ्यातील मलाई घालून थोडेसे ब्लेंड करून घ्यावे . मग त्यात नारळाचे दूध , 1 स्कूप व्हनिला आईस्क्रीम , अननसाचा ज्यूस , आईसक्युब्ज घालून जर जास्त गोड आवडत असेल तर थोडी आवडीनुसार साखर घातली तरी चालते .. नंतर भरपूर फेस येऊन एकजीव होईपर्यंत ब्लेंड करावे .आता एका काचेच्या सुरेख ग्लासचे काठ पाण्यात किंचित ओलसर करून एका खोलगट डिशमध्ये किंवा बाऊल मध्ये स्प्रिंकलर्स घालून त्यात ग्लासचे काठ बुडवावेत म्हणजे ग्लासला वेगळाच सुंदर आकर्षक लुक येईल आणि पिताना जास्त मजाही येईल . आता त्यात बाकीचे अननसाचे तुकडे घालून मग ब्लेंड केलेले मॉकटेल घालावे . वरून 1 आईस्क्रीमचा स्कुप घालून त्यावर चेरी ठेवावी . अननसाच्या चकतीला सुरीने छोटासा कट मारून ती ग्लासच्या काठावर अडकवावी आणि मस्त स्ट्रॉ ठेवून ट्रे मधून थंडगार सर्व्ह करावा .

वैशिष्टय :
हे उन्हाळ्यात शरीरात थंडावा निर्माण करून उत्साह वाढवणारे शीतपेय आहे . सर्व्ह करतानांच त्याचा आकर्षकपणा पाहून पिण्याची ईच्छा आणखीनच तीव्र होते . त्यात वापरलेला प्रत्येक घटक आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक आहे . अननसातुन् सी जीवनसत्व तर मिळतेच पण ते कॉलेस्ट्रॉल कमी करून हृदय निरोगी राखण्याचे महत्वाचे काम करते. शिवाय पोटाची चरबी कमी होऊन वजन कमी करते . टेंडर कोकोनट शरीरात स्निग्धता आणि थंडावा वाढवते ज्याची उन्हाळ्यात खूपच आवश्यकता असते . शिवाय बल आणि बुद्धीवर्धक असून त्यामुळे ज्यूस क्रिमी व टेस्टी बनतो . तसे हॉटेलमध्ये फक्त नारळाचे दुधच वापरतात पण यामुळे जास्त टेस्टी बनते . व्हनिला आईस्क्रीम तर मंद स्वादामुळे लज्जत आणखीनच वाढवते . लहानापासून वृद्धांपर्यंत सर्वांच पौष्टिकता देणारे आणि आवडणारच असे हे मॉकटेल आहे .

४ :   कोल्ड  मोका कॉफी :
आजपर्यंत आपण अगदी सरबतापासून ते मॉकटेल पर्यंतचे  उन्हाळ्यात बनवता येणारे आरोग्यासाठी उपयोगी , असे मस्तानी , सोलकढी , वेगवेगळया  प्रकारचे फळान्पासून, भाज्यानपासून बनणारे ज्यूसेस् , अगदी मसाला ताकापर्यंत  पारम्पारीक पद्धतीची  , नवनवीन प्रकारची  भरपुर शितपये बनवली . पण आज सर्वांची लाडकी  कोल्ड कॉफी हा प्रकार बनवू . बाहेर विशेषतः कॉफीशॉप्स  मध्ये तरी ही खूपच महाग मिळते . खरेतर  ही घरात अगदी तशीच आणि आपल्याला पाहिजे तशी स्ट्रॉंग ,माईल्ड बनवू शकतो ती सुद्धा एकदम स्वस्तात ! उत्सुकता वाटतेय ना? चलाच मग…

साहित्य :
कोणतीही  कोल्ड कॉफी बनवताना सर्वांत आधी त्याचा बेस म्हणजेच कॉफी सिरप म्हणा किंवा कॉफीचा अर्क  तो बनवून ठेवावा .म्हणजे एकतर कॉफीची टेस्ट खूप सुरेख येते ,आणि साखर विरघळून त्याचा पाक झाल्यामुळे चमक मस्त येऊन कलरसुद्धा बेस्ट येतो . कॉफीही उकळली गेल्यामुळे मस्त स्ट्रॉंग अर्क मिळतो . आणि विशेष म्हणजे तो बराच टिकतो त्यामुळे कधीही वाटली की लगेंच झटपट कॉफी बनवू शकतो . ती सुद्धा अनेक प्रकारांनी.
कॉफीचा बेस करण्यासाठी प्रथम 1 कप पाणी उकळण्यास ठेवावे . मग त्यात 1कप साखर घालावी व अर्धा कप कॉफी पावडर घालावी व1 वेलदोडा  किंवा 1 चिमूट दालचिनी पावडर घालून  हे भरपूर उकळू द्यावे . साखर पूर्ण विरघळली की एक उकळी येऊ द्यावी .मग गॅस बंद करावा . हा अर्क ..सिरप थंड झाला की गाळण्याने गाळून घट्ट झाकणाच्या बाटलीत भरून ठेवावा.

आता मोका कॉफीसाठी लागणारे साहित्य :
1 चमचा चॉकलेट चिप्स , 1 चमचा कोको पावडर , 3 चमचे फ्रेश क्रीम ,  अर्धा कप दूध , 3..5 चमचे  साखर आणि कॉफीचा  बनवलेला अर्क , 1 मोठा स्कूप व्हॅनिलाआईस्क्रीम, २..3 चमचे कॉफी सिरप , आइसक़्युब्ज , सजावटी साठी चोकोचिप्स , चॉकलेट सॉस .

कृती :
प्रथम एका  मोठ्या जाड प्लस्टिकच्या  बाटलीमध्ये किन्वा शेकर मध्ये कॉफीचा अर्क घालावा . मग त्यात चिमूटभर कॉफी पावडर घालावी .यामुळे या कॉफीची टेस्ट वाढते . मग त्यात 1 चमचा चॉकलेट चिप्स घालावेत . 1 चमचा कोको पावडर घालून 2 आईसक्युब्ज घालावेत . नंतर त्यात अर्धा कप दूध घालून 1 चमचा फ्रेश क्रीम घालून  2..3 मिनिटे भरपुर  हलवावे म्हणजे छान मिक्स होऊन क्रिमी आणि फेसाळ होइल . आता हे सर्व काचेच्या ग्लास मघ्ये घालावे . नंतर त्यावर  2 चमचे क्रीम घालून स्ट्रॉंग कॉफी आवडत असेल तर थोडे सिरप घालावे . मग त्यावर व्हॅनिला आईस्क्रीमचा स्कूप घालावा .चॉकलेट सॉस असेल तर घालावा व शेवटी त्यावर थोडीशी कोको पावडर भुरभुरून चोको चिप्स सजावटीसाठी घालावेत . स्ट्रॉ ठेवून थंडगार मोका कोल्ड कॉफी लगेंच सर्व्ह करावी .

वैशिष्टय:
चॉकलेट आणि  कॉफी यांचे कॉम्बिनेशन  न म्हणजे मोका कॉफी .
ही कॉफी अगदी नावाजलेल्या कॉफी शॉप्स मधील कॉफीसारखीच लागते . कोको ,चॉकलेट ,क्रीम आणि व्हॅनिला आइसक्रीम  यांचे जबरदस्त कॉम्बिनेशन आहे ही कॉफी म्हणजे . नक्की करून पहा आणि मग नक्कीच म्हणाल ,’व्वा ! ..’
क्रमशः

— लेखन : सौ.स्नेहा मुसरीफ , पुणे
— संपादन:देवेंद्र भुजबळ.
— निर्माती:सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अहेर on सखी अलका
अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री डॉ.सँड्रा देसा सूझा
सुरेश काचावार, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी on चला, कास पठार पाहू या !
शितल अहेर on काही अ ल क