Saturday, October 5, 2024
Homeलेखस्नेहालय : तेथे कर माझे जुळती

स्नेहालय : तेथे कर माझे जुळती

जळापरी मन निर्मळ ज्यांचे,
गेले तेथे मिळले हो
चराचरांचे हो‍उनि जीवन
स्‍नेहासम पाजळले हो
जीवन त्यांना कळले हो

ह्या कविवर्य बा भ बोरकरांच्या कवितेतील ओळी ज्या व्यक्तीला लागू पडतात ती व्यक्ती म्हणजे स्नेहालय चे संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी सर. एक हसरं, प्रसन्न, उमदं व्यक्तीमत्व. बालमनाला पडलेले प्रश्न त्या प्रश्नांची तरुण वयात झालेली उकल आणि त्यावर झपाटल्याप्रमाणे, वेड्यासारखे गेली ३५ वर्षे केलेले अथक कार्य. सर्वच असामान्य, अनाकलनीय, अद्भभूत. सर्वसामान्य लोकांच्या शब्दात सांगायचे तर ग्रेट.

डॉ प्रशांत थोरात ह्यांच्या प्रभात चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आयोजित प्रभात यात्रेच्या निमित्ताने नुकताच नगर जिल्ह्यातील स्नेहालय या सेवाभावी संस्थेला भेट देण्याचा योग आला. संपूर्ण संस्थेची माहिती व आमचे आदरातिथ्य करणारे भरत कुलकर्णी यांच्याकडून स्नेहालयचा विस्तार, विविध प्रकल्प व अनेक सामाजिक पातळ्यांवर काम करण्याचा आवेग पाहता आश्चर्य व कौतुक वाटलं.

१९८९ साली स्थापन झालेली स्नेहालय ही संस्था एचआयव्ही आणि एड्स, तस्करी, लैंगिक हिंसाचारग्रस्त मुले, देहविक्री करण्याऱ्या महिला आणि एलजीबीटी समुदायांना आधार देण्याचे कार्य करीत आहे. पुण्यात व भारतात तसेच परदेशात स्वतंत्रपणे व अनेक सेवाभावी संस्थांशी संलग्न काम करत आहे. अनाथ, दिव्यांग, एड्सग्रस्त, एच आय व्ही बाधित मुलामुलींचे योग्य संगोपन, शिक्षण, रोजगार व पुढे त्यांचे विवाह लावून देणे व त्यांच्या आयुष्याला स्थैर्य प्राप्त करून देण्याचे महान कार्य स्नेहालय करत आहे.

बालमाता, बलात्कारीत महिला त्यांची मुले विविध आजार अपघातात नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीमुळे अनाथ निराधार झालेले मुले, अपंगत्व किंवा फक्त स्त्रीभ्रूण आहे म्हणून जन्मदात्यांना नकोशी झालेली बालके अशी सगळी एक दिवसापासून अनेक मोठ्या बालकांपर्यंत स्नेहालयाचे स्नेहांकुर ह्या मुलांवर मायेची पाखर घालून त्यांचं संगोपन करुन आणि कायदेशीररित्या दत्तक देण्याचे कार्य करत आहे.
परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील वृद्ध एड्स आणि कॅन्सरग्रस्त ,अर्धांगवायू, विस्मृती इत्यादी रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा व सुश्रुषा देणे, व्यसनाधीन व्यक्तींकरीता मनोबल व्यसनमुक्ती केंद्र उपचार, समुपदेशन व पुनर्वसन करण्याच‌ तसेच वेश्याव्यवसायातून बाहेर पडलेल्या, एड्स बाधित लाभार्थिंना पडिक नापिक जमिनीतून सैंद्रिय शेती व दुग्ध व्यवसाय उपलब्ध करून रोजगार देण्याच काम करत आहे. त्यामुळे स्नेहालयातील बालकांना सकस आहार मिळतो.
आंबा, चिकू, पेरू, निरा देणारी झाडांची लागवड, वृक्षारोपण व त्यांची जोपासणी, अशा अनेक आघाड्यांवर स्नेहालय यशस्वीपणे कार्य करत आहे.

दिव्यांग मुकबधीर अंध मुलांकरिता स्नेहालयचा अनामप्रेम प्रोजेक्ट हा त्यांच्या आयुष्यातील एक आशेचा किरण आहे.

स्नेहालयची इंग्लिश मीडियम स्कूल ही एक धर्मादाय शाळा आहे. ‘प्रतिकूल परिस्थितीवर मात’ या श्रेणीत T4 Education संस्थेने जगातील सर्वोत्कृष्ट पहिल्या तीन शाळेमध्ये स्नेहालयची‌ निवड केली आहे. इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये अनाथ, वंचित मुलं, सेक्सवर्कर्स यांची मुलं तसेच एचआयव्ही बाधित मुलं शिक्षण घेतात. ह्यात तेथील शिक्षकांचे ही मोलाचं योगदान आहे.प्रतिकूल परिस्थितीशी झगडणाऱ्या मुलांसमोर गुंतागुंतीचे सामाजिक, भावनिक प्रश्न असतात. त्यासाठी त्यांना या स्थितीला योग्य प्रतिसाद देण्याचे आणि अनुरूप कौशल्यांचे शिक्षण स्नेहालयने दिले आहे.

नगर जिल्ह्यातील झोपडपट्ट्यांमध्ये आरोग्य, शिक्षण रोजगार ह्या पातळींवर पुनर्वसन करून तेथे इमारत उभी करून तेथील जनतेला आपले हक्काचे घर देण्याच काम स्नेहालय करत आहे.

भारताच्या अमृत महोत्सव निमित्ताने भारत-बांगलादेश सद्भावना सायकल यात्रा आयोजित करण्याचे काम स्नेहालयने केले आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, ओरिसा, झारखंड, बंगाल या राज्यांतून प्रवास करत ५५ दिवसांत ४२८० किलोमीटरचा प्रवास करून नौखालीतील महात्मा गांधी आश्रमात या यात्रेची सांगता झाली.

स्नेहालयचे अनेक प्रकल्प सुरू आहेत. समाजातील प्रत्येक घटकांसाठी प्रकल्प स्नेहालयकडे आहे. हे प्रकल्प व ह्या कल्पना प्रत्यक्षात आणण्याचे श्रेय डॉ गिरीश कुलकर्णी सर स्नेहालयच्या टीमची कल्पकता, चिकाटी, समान दृष्टी आणि सांघिक कार्य ह्याला देतात. स्नेहालय ही जगासाठी संस्था असेल पण माझ्यासाठी ते माझे कुटुंब आहे. वाटचाल सोपी नव्हती संघर्ष करावा लागला. समाज काय म्हणेल याची परवा न करता मला आनंद ज्याच्यात वाटतो ती गोष्ट मी करणार हा विश्वास मनात ठेवून दृढ निश्चयाने सरांनी स्नेहालयाचे बीज पेरले व आज त्याचा महान वटवृक्ष झाला आहे.

गिरीश सरांसोबत संवाद साधताना त्यांच्या वागण्यातली अकृत्रिमता आणि सहजपणाने जाणवतं होती प्रगल्भता. आयुष्य जगताना फार कमी लोकांना आयुष्याच्या अर्थ समजतो, उमगतो आणि ते तसं आयुष्य जगतात.

मी पण ज्यांचे
पक्व फळापरी गळले हो
सिंधूसम हृदयांत जयांच्या
रस सगळे आकळले हो
आपत्काली अन्‌ दीनांवर
घन हो‍उनि जे वळले हो
जीवन त्यांना कळले हो…

— लेखन : डॉ वंदना कुचिक. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

वैशाली कोंडाजी on “माध्यम पन्नाशी” : ९
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” : ९