Saturday, July 27, 2024
Homeलेखस्वप्न उतरले सत्यात !

स्वप्न उतरले सत्यात !

भाग्य रामभक्तांचे, स्वप्न सत्यात उतरले..
मंदिर प्रभु श्रीरामांचे, शरयू तिरी साकारले..
धन्य ती अयोध्यानगरी, धन्य ती भारतभूमी..
जिच्या पावन कुशीत श्रीराम जन्मले…..

भारत देशाच्या हिंदु अस्मितेचा किंवा राष्ट्रीय अस्मितेचा लढा गेली जवळपास पाच शतके अयोध्येच्या राममंदिर लढ्याभोवती गुंफला गेला होता.यासाठी प्रदीर्घ संघर्ष आणि शर्थीचे प्रयत्न,अनेक रामभक्तांचे बलिदान कारणी लागले. सोमवारी दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12.29 वाजता अयोध्या येथील भव्यदिव्य मंदिरात प्रभु श्री रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना होत आहे. जगभरातील हिंदु बांधवासाठी हा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते व देशभरातून येणारे साधू, संत, महंत व अतिविशिष्ट मान्यवरांच्या उपस्थितीत हा संस्मरणीय सोहळा पार पडत आहे. या दिवशी तमाम देशवासीयांचे, रामभक्तांचे कित्येक वर्षांपासूनचे स्वप्न सत्यात उतरणार आहे.

रामजन्मभूमी, राममंदिर आणि विवादित ढाचा याबद्दल अनेक वर्षे वादविवाद, दावे, प्रतिदावे सुरु होते. जवळपास पाचशे वर्षांपूर्वी परकिय आक्रमकांनी अयोध्येतील राममंदिर पाडून तिथे एक ढाचा उभा केला. तो आपल्या हिंदू अस्मितेवर मोठा आघात होता. तेव्हापासून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत जवळपास 76 लढाया झाल्या, त्यात अनेक हिंदु धारातीर्थी पडले. त्यानंतर इंग्रजांच्या काळातही राममंदिरचा लढा सुरूच होता. 1984 साली विश्व हिंदु परिषदेने रामजन्मभूमी मुक्ती समितीची स्थापना केली. त्यांच्याकडून गंगामाता भारत माता, श्रीराम ज्योत यात्रा, श्रीराम शिलापुजन असे अनेक कार्यक्रम देशभर घेण्यात आले व जनजागृती करण्यात आली.6 डिसेम्बर 1992 रोजी कारसेवा करण्यासाठी रामभक्तांना साद घातली आणि तेथे जमलेल्या लाखो कारसेवकांनी हा विवादित ढाचा ध्वस्त केला. त्यावेळेपासून रामजन्मभूमि आणि पर्यायाने राममंदिर वाद धुमसत राहिला.

पण आता पाचशे वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर तसेच न्यायालयीन लढाई पार करुन हि भूमि रामजन्मभूमी आहे हे सिद्ध झाले आहे. त्यासाठी अनेक दाखले, पुरावे न्यायालयाने तपासून पाहिले. महत्वाचे म्हणजे तिथे झालेल्या पुरातत्व खात्याच्या उत्खननात मंदिराचे अवशेष मिळाले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालानुसार आणि आदेशाने श्रीराममंदिर निर्माण ट्रस्ट तयार करण्यात आला. त्यांच्या गठीत केलेल्या समितीच्या देखरेखेखाली भव्यदिव्य अशा राममंदिराचे निर्माण होत आहे. श्रीराम मंदिराचा भूमिपुजन कार्यक्रम 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संपन्न झाला होता. आता 22 जानेवारी 2024 ला मंदिरामध्ये 12.29 रामलल्लाचा प्रवेश होणार आहे. तो सुवर्णक्षण साजरा करण्यासाठी तमाम रामभक्त आतुर आहेत.

संपूर्ण राममंदिराचा परिसर 70 एकरमध्ये पसरलेला आहे.त्यातील 2.7 एकरमध्ये मंदिर उभे राहत आहे. राममंदिर हे राष्ट्रमंदिर व्हावे या उदात्त हेतूने संपूर्ण देशातून 15 जानेवारी ते 27 फेब्रुवारी 2021 या दरम्यान निधी संकलन अभियान राबविण्यात आले. अगदी दहा रुपयापासून अनेक कोटी रुपये रामभक्तांनी दान दिले. खर्चाच्या जवळपास चौपट म्हणजेच 3400 कोटी रुपये संकलित झाले. यामुळे अगदी गरीब रामभक्तांचा हात या मंदिर उभारणीत आहे हा भाव निर्माण झाला आहे.

या मंदिराची रचना प्राचीन नागर शैलीत असणार आहे. मुख्य वास्तूविशारद चंद्रकांत सोमपुरा यांनी यासाठी काम केले आहे. तसेच टाटा कन्सलटंसी इंजिनिअर्स लि.व लार्सन अँड टूब्रो यांच्यावर बांधकामाची व परिसर सुविधा विकसित करण्याची जबाबदारी आहे. यात भविकांसाठी भक्त निवास, पर्यटक सुविधा केंद्र, माहिती केंद्र इ. सेवा समविष्ठ आहेत. मंदिराची लांबी 360 फूट, रुंदी 235 फूट तर उंची 161 फूट असणार आहे. मंदिराला एकूण 392 खांब व 44 दरवाजे असणार आहेत. मंदिराचे आयुर्मान 1000 पेक्षा जास्त वर्षे असणार आहे. यासाठी लागणारे बांधकाम साहित्य देशातील विविध राज्यातून आणले आहे.

देशातील प्रत्येक गावातील एक एक घरात दिवे लावून, रांगोळ्या घालुन, घरावर गुढी उभारून एखाद्या सणासारखा हा सोहळा साजरा होणार आहे. जणू काही प्रतिदिवाळीच साजरी होणार आहे. अयोध्याहून आलेल्या अभिमंत्रित अक्षता, प्रतिमा आणि माहितीपत्रक म्हणजेच श्रीराममंदिर आणि प्रभु श्रीराम दर्शनाचे आमंत्रण प्रत्येक घरात रामभक्तांकडुन दिले जात आहे.

देशातील प्रत्येक मंदिरात 22 जानेवारीला भजन, कीर्तन, होम हवन, दीपोस्तव, महाप्रसाद, रामनाम सप्ताह, भव्य दिव्य शोभायात्रा, पालखी सोहळा असे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. अशा प्रकारे 22 जानेवारीला संपुर्ण देश राममय होणार आहे. देशवासीयांच्या मनातील स्वप्न पूर्णत्वास जात आहे.

कोणत्याही देशाची, प्रदेशाची, भूमीची प्राचीन मूळ संस्कृती ही त्यांची प्रतीके असतात. त्यांचा त्यांना खुप अभिमान असतो. तेच त्यांच्या जगण्याची आणि पुढे जाण्याची ऊर्जा, चेतना, प्रेरणा असतात. जगताना प्रत्येक क्षण त्यांचे स्मरण होत राहते. प्रभु श्रीराम हे आपल्या प्राचीन सनातन संस्कृतीचे प्रतिक आहेत. प्रत्येक मानवाच्या मनात, श्वासात तसेच भारतभूमिचा प्रत्येक कणात श्रीराम वसले आहेत हि आस्था,vभावना आहे.प्रभु श्रीराम हे प्रत्येक भारतीयांची अस्मिता आहेत.

आपली अर्वाचीन हिंदू संस्कृती हि आदर्श जीवनपध्द्ती जगण्याचे शास्त्र, कला आहे. एका चौकटीत संकुचित न राहता त्याची व्याप्ती खुप मोठी आहे.प्रत्येक युगात झालेले विविध अवतार हे त्या संस्कृतीची प्रतीकं आहेत. त्यामुळे प्रभु श्रीराम आणि राममंदिर हा सर्व हिंदूंसाठी आणि भारतीयांसाठी आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय आहेत. येत्या 22 जानेवारीला त्याची पूर्तता होत आहे असे म्हणावे लागेल.

महर्षी वाल्मिकींनी रामायण हे महाकाव्य लिहीले. यात त्यांनी प्रभु श्रीराम यांचे समग्र जीवनचरित्र मांडले आहे. प्रत्येक युगात मानवजातीला योग्य मार्ग दाखवण्यासाठी अधर्माचा नाश करण्यासाठी तसेच धर्माचे, संरक्षण, संवर्धन करण्यासाठी एका अवताराची निर्मिती झाली. त्रेतायुगात प्रभु श्रीरामचंद्रांनी श्रीविष्णूचा सातव्या अवताराच्या रूपात पृथ्वीतलावर जन्म घेतला. चैत्र शु.नवमीला राजा दशरथ व माता कौशल्या यांच्या पोटी प्रभु श्रीरामाचा अयोध्यानगरी येथे जन्म झाला. त्याच पवित्र भूमीवर आता भव्य राममंदिर निर्माण होत आहे.

प्रभु श्रीराम यांचे संपुर्ण जीवनाचा मागोवा घेतला तर असे लक्षात येईल की एक आज्ञाधारक आदर्श मुलगा, लहान भावांना सांभाळून घेणारा, त्यांना योग्य मार्गदर्शन करणारा वडीलधारा भाऊ, एकवचनी एकपत्नी पती, करुणेचा सागर असणारा राजा, शत्रूलाही आपल्या अपार मायेने प्रेमाने जिंकणारा, त्यांच्याप्रती आदरभाव असणारा योध्दा तसेच आपल्या कुटुंबाविषयी, सहकार्यांविषयी अपार प्रेम, करुणा असणारा राजा अशा अनेक गुणांनी, रूपांनी प्रभु श्रीराम सर्वांना आपलेसे करतात. स्वतःच्या आदर्श विचारांनी, कर्माने अधर्म, असत्याविरुद्ध युद्ध पुकारून धर्म आणि सत्याचे राज्य स्थापित करतात. जिथे सर्वजण गुण्यागोविंदाने, सुखसमृद्धीने राहतात म्हणुन यालाच रामराज्य असे संबोधले जाते. हे सर्व करत असताना प्रभु श्रीरामांनी कधीही आपला संयम, मर्यादा याचे उल्लंघन केले नाही म्हणुन त्यांना मर्यादापुरुषोत्तम असे संबोधिले जाते.

रामायणातील चौदा वर्षाच्या वनवासात प्रभु श्रीराम, माता सीता आणि बंधु लक्ष्मण हे भारतातील अनेक ठिकाणी गेले. त्यांच्या पदस्पर्शाने अनेक ठिकाणे पावन झाली आहेत. यादरम्यान त्यांच्यावर अनेक संकटे आली, अनेक यातना, हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या पण अत्यंत धीराने, संयमाने प्रभु श्रीराम याला सामोरे गेले. त्यांच्या पदस्पर्शाने, अधिवासाने अनेक ठिकाणे पवित्र झाली आहेत. आजही संपूर्ण भारतात अयोध्या, प्रयागराज, दंडकारण्य, सतना, रामटेक, पंचवटी, भंडारदरा, तुळजापूर, सुरेबन, कार्डीगुड, कोप्पल, हंपी, पंपासरोवर, तिरुचिरापल्ली, रामनाथपुरम, रामेश्वरम, धनुष्यकोडी तसेच श्रीलंकेतील नुयावारा उद्दीच पर्वत (अशोक वाटिका) इ प्रमुख ठिकाणी तसेच, अनेक लहानमोठ्या क्षेत्रावर प्रभु श्रीरामांच्या संचाराचे आणि अस्तित्व जाणवते. मंदिरे, धार्मिक अनुष्ठाने यांच्या रूपात आजही भाविक, रामभक्त प्रभु श्रीराम या भूमीत आहेत असे मानतात. यादरम्यान ते अनेक ऋषीमुनींच्या सहवासात आले. त्यांच्याकडून त्यांनी ज्ञान प्राप्त केले. आदिवासी, वनवासी लोकांना एकत्र करुन धर्माचा मार्ग दाखवला. त्यांना एकाच विचारांच्या धाग्यात बांधले. अधर्माचा नाश करुन धर्माचे रामराज्य स्थापित केले. म्हणुनच रामभक्तांच्या प्रत्येक श्वासात, मनात व या भूमीच्या प्रत्येक कणाकणात प्रभु श्रीराम वास करुन आहेत. याच अपार श्रद्धेमुळे हजारो वर्षे होऊनही प्रभु श्रीरामचंद्र प्रत्येकाच्या रोमारोमात, नसानसात सामावले आहेत.

सोमवारी 22 तारखेच्या प्रभु रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्यानगरी एखाद्या नववधूसारखी नटली आहे. त्यादिवशी सर्वत्र दिवे लाऊन दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे. पवित्र शरयू नदी, तिचे घाट आणि काठावरील मंदिरांना सजवले जात आहे. फुलांची तोरणे, रोषणाई केली जात आहे. संपूर्ण अयोध्यानगरी उत्कर्षाच्या दिव्य प्रकाशाने झगमगून गेली आहे. प्रत्येक अयोध्यावासी दारात रांगोळी काढुन घरी दीप प्रज्वलित करुन आणि दारात गुढी उभारून हा आनंदाचा, मांगल्याचा सोहळा साजरा करत आहे. त्याला कारणही तसेच आहे. तब्बल पाचशे वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर प्रभु श्रीरामांचे भव्य मंदिर साकारत आहे व रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना होत आहे. तमाम भारतीयांचे स्वप्न साकार होत आहे. या मंदिराच्या रूपाने जणु रामराज्य परत स्थापित होणार आहे असे भक्तिमय वातावरण संपूर्ण देशात आहे.

प्रभु श्रीरामांचे हे मंदिर फक्त दगड मातीची इमारत नसुन सदभावना, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय चेतना, अखंडता तसेच सनातन संस्कृतीचे प्रतीक असणार आहे. आपल्या, सहिष्णु, प्रगल्भ सनातन संस्कृतीचे अस्तित्व विश्वात इतरत्रही आहे. त्याचे सबळ पुरावे मिळत आहेत. त्यामुळे या मंदिर निर्माणामुळे नव्याने महत्त्व प्राप्त होणार आहे. विश्वकल्याणाचा मार्ग प्रशस्त होणार आहे. मानवाने कितीही भौतिक प्रगती केली, स्वतःला विकसित केले तरी तरी त्याचा पाया हा संस्कृती तिची अस्मिता असते. त्यामुळे आपल्या जगण्याला एक वेगळी ओळख प्राप्त होते व तेच तुमचे वेगळे अस्तित्व अधोरेखित करते. त्यामुळे हा क्षण प्रत्येक भारतवासीयांसाठी अत्युच्च आनंदाचा, अभिमानाचा आणि गर्वाचा आहे. भारतभूमी हि संपूर्ण विश्वाला दिशादर्शक ठरणार आहे. त्यामुळे सर्व देशवासीयांनी हा परमोच्च आनंदाचा क्षण प्रभु श्रीरामचंद्रांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे संयमाने, शिस्त पाळून, रामलल्लाच्या भक्तिरसात चिंब होऊन साजरा करू या. या दिवशी संपूर्ण विश्वकल्याणाची प्रार्थना करुन प्रभु श्रीरामांचे कल्याणकारी, सुखसमृद्धीचे रामराज्य स्थापित व्हावे हि प्रभु श्रीराम चरणी अंतःकरणातून मनोकामना करू या.

मनी वसे राम, स्वप्नी दिसे राम,
मुखी आज आमच्या श्रीराम जयराम,
जय जय राम !!

— लेखन : अमर कुलकर्णी, हुपरी.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८