काही वर्षांपूर्वीची गोष्ट…
जीवन अगदी “अळणी” वाटायला लागले…
“टाटा”, “कॅप्टन कुक” वापरून पाहिले…अगदी डोळ्यातले पाणी सुध्दा वापरले…।
पण नमकीन चव काही येईना.
मग “खमंग”, ”चमचमीत”, “झणझणीत”, “रसाळ” चव तर बाजूलाच राहिली.
सर्वच “निरस” वाटायला लागले.
घड्याळाच्या तालावर नाचतांना संसाराच्या ”गोंडस” चक्रव्यूहात अडकतांना, “चव” कुठे नी कशी हरवली, तेच कळेना. सकाळी ६ ते १० मधले, माझ्या वाट्याचे काटे तर विसरायलाच झाले,
आणि अचानक….
एकाकडे “न्यू ईअर“ पार्टीचे आमंत्रण आले.
गप्पा-टप्पा, गाणी-कविता, जोक्स, नाच, नवे -जुने, पुस्तकं, नाटकं, राजकारण, पदार्थ, दागिने, साड्या मुलं, सासर –माहेर……
सर्व प्रांतात, सर्व जण आनंदात डुंबत होते.
१२ च्या ठोक्याचा जल्लोष तर मी प्रथमच अनुभवत होते.
नवीन वर्षाच्या स्वागताचा आनंद, आसमंतात भरून राहिलेला मी प्रथमच पहात होते.
ती संपूर्ण रात्र, मी सुध्दा आनंदात भिजून निघत होते.
त्या आनंदाच्या, उत्साहाच्या, प्रकाशाच्या, उन्मादाच्या, जल्लोषाच्या
मिश्रणाच्या मसाल्यांनी, एक नविनच चव, मला मिळाली.
मिनीट नी मिनीट, दिवस नी दिवस, वर्ष नी वर्ष, मी हे चटपटीत मसालेच विसरले होते.
मीठाच्या शोधातच, मी अळणी आणि निरस बनले होते..
त्या नवीन वर्षाच्या स्वगताच्या
दिवसांनी, मला एक रसाळ चव दिली.
आता मी ही रसाळ चव बरोबर घेऊन, फक्त नवीन वर्षाचेच स्वागत करते, असे नाही, तर
प्रत्येक नवीन दिवसाचे स्वागत, नवीन वर्षाप्रमाणे, उत्साहात, आणि आनंदात करते….
— लेखन : चित्रा मेहेंदळे.. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800