Saturday, April 20, 2024
Homeबातम्या"स्वानंदाच्या झुल्यात", "गंध प्राजक्त" प्रकाशित

“स्वानंदाच्या झुल्यात”, “गंध प्राजक्त” प्रकाशित

कांचन नेवे यांच्या “स्वानंदाच्या झुल्यात”, “गंध प्राजक्त ” या दोन पुस्तकांचे नुकतेच चिंचवड येथे प्रकाशन झाले. स्वामी प्रतिमा पूजन, दीपप्रज्वलन करून, कवयित्री सौ. योगिता कोठेकरांनी स्वागतगीत म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ८९ व्या साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष श्री. राजन लाखे, नवयुग चे संस्थापक अध्यक्ष राज आहेरराव, लेखिका रजनी आहेरराव, कवयित्री सौ. ललिता सबनीस, ज्येष्ठ कवी बाबू डिसोजा होते.

कांचन नेवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, ३५ जणांचे एकत्र कुटुंब होते. प्रतिकूल परिस्थितीत त्यांचे अडावद ला राहणे होते. आई अशिक्षित होती. लहानपणी तिच्या ओव्या त्या ऐकत. त्यामुळे नकळतपणे कविता मनात रूजत गेली.
गोडी लागली. कवितांनी सावरले. मोठे बंधू श्री रमेश नेवेवाणी आणि कुटुंबियांनी प्रोत्साहन दिले. थोरले पुत्र अजय नेवे यांनी आईच्या वात्सल्याबद्दल बोलताना हृद्य आठवणी सांगितल्या.

कांचन नेवे यांच्या बद्दल बोलताना ज्येष्ठ कवी बाबू डिसोजा म्हणाले की, त्या माझ्या रमेश नेवेवाणी या बँक सहकारी मित्राच्या धाकट्या बहिण आहेत. पुण्यात आल्यावर त्यांचा परिचय त्याने करून दिला. कांचनताईला स्थानिक साहित्यिक वर्तुळात मी आणले. आज त्यांची पुस्तके प्रकाशित होताहेत.

जळगाव म्हटले की बालकवी, ना धों महानोर, बहिणाबाई या खानदेशातील कवींची हमखास आठवण येते. कांचनताई यांच्यावर त्यामुळे नकळतपणे जबाबदारी येते. कांचनताई यांच्या स्वानंदाच्या झुल्यात संग्रहात स्वानंदी, संस्कारी, संसारी स्त्रीच्या भावनांचे प्रतिबिंब दर्शविणाऱ्या कविता आहेत. साध्या सोप्या भाषेत त्या कवितेतून व्यक्त होतात. त्यांच्या प्रगल्भ प्रतिभेची चुणूक अनेक कवितांमध्ये दिसते. विशेषतः त्यांच्या निसर्गावरील कविता अधिक भावतात. भुरळ, रे फुलपाखरा, संध्येची पाकळी या संग्रहातील कविता भविष्याचा विसार देतात.

त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली म्हणजे त्या आता नवोदित नाहीत. त्यामुळे आता अधिक जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. व्हॉटसअॅप एक आभासी माध्यम आहे. डिजिटल प्रमाणपत्रांमध्ये त्यांनी गुंतता कामा नये. विषयनुसारी कविता पाडण्यात अर्थ नाही.
श्री. श्रीकृष्ण नेवे यांनी कांचन ताईंना पाठबळ दिले. दोन्ही मुले, सूना यांच्या सहकार्याने हा दुग्ध शर्करा योग आला.

नवयुग चे संस्थापक अध्यक्ष श्री. राज अहेरराव यांनी म्हटले की, पूर्ण नेवे कुटुंब साहित्यात रमले आहे. कवयित्री ने आपल्या कवितांमधून खानदेश बोलीभाषेचा वापर केला आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष श्री. राजन लाखे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आनंदी जीवनाचे, निसर्गचित्रण आपल्या कवितांमधून वर्णन केले आहे.

सौ. माधुरी वैद्य डिसोजा यांनी संग्रहातील एका कवितेचे वाचन केले. मोठा भाऊ म्हणून बाबू डिसोजा आणि सौ. माधुरीने कांचन नेवे यांना माहेरचा आहेर दिला.

आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री. श्रीपाल सबनीस यांनी कांचन नेवे यांच्या कवितांचे पैलू उलगडून दाखविले. ते म्हणाले की, कल्पना विलासातून सौंदर्य अविष्कार ही कवितेची ताकद असते, सामर्थ्य असते. सुंदर प्रतिमांनी त्यांच्या कविता नटल्या आहेत. पौराणिक संदर्भ आहेत, तसेच आधुनिकता ही आहे.

कवयित्री ची कवितेवरील निष्ठा प्रशंसनीय आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सीमा गांधींनी समय सूचकता पाळून, रंजकपणे, समर्थपणे केले. स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य, नेवे परिवाराचे आप्तेष्ट, स्थानिक नागरिक, पत्रकार प्रदीप गांधलीकर, राजेंद्र घावटे, सुरेश कंक, वर्षा बालगोपाल, योगिता कोठेकर, फुलवती जगताप, राहुल भोसले आदि कवी, साहित्यिक उपस्थित होते. श्री. विजय नेवे यांनी आभारप्रदर्शन केले.

स्वामी समर्थ प्रतिष्ठान चे श्री नारायण बहिरवाडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे श्री. हरी नारायण शेळके यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सुरेख संयोजन केले.

— टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Vilas Baburao Sarode,Chh.sambhajinagar, Aurangabad on प्रेरणेचा झरा : अलका भुजबळ
विजय पवार, नासिक on प्रेरणेचा झरा : अलका भुजबळ