Wednesday, September 11, 2024
Homeलेख‘स्वामी विवेकानंद : ज्योतिर्मय आदर्श ’

‘स्वामी विवेकानंद : ज्योतिर्मय आदर्श ’

स्वामी विवेकानंद यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने हा विशेष लेख.
स्वामी विवेकानंद यांना विनम्र अभिवादन
.
– संपादक

आपण ‘स्वामी’ या शब्दाचा उच्चार करताक्षणी आपल्या डोळ्यासमोर भगव्या वस्त्रांकित, एकाकी जंगलात किंवा गुहेत कठोर तपश्चर्या करणारे एखादे व्यक्तिमत्व उभे राहते ! जाणून बुजून स्वीकारलेल्या अशा विजनवासाचे कारण असते, या नश्वर जगातील मायेच्या मोहपाशातून मुक्ती शोधत ईश्वर प्राप्तीचे !

पण मंडळी याला एक अपवाद स्मरतो, स्वामी विवेकानंद, हिंदू धर्माच्या समृद्ध संकल्पनेचे महान वैश्विक दूत ! ‘वसुधैव कुटुंबकम’ म्हणजेच संपूर्ण वसुधा किंवा विश्व हे एका कुटुंबासारखे आहे, हा मौलिक आणि अमूल्य संदेश जगाला देणारे खरे खुरे जागतिक नेते ! मैत्रांनो, आजच्या पवित्र दिनी अर्थात, १२ जानेवारीला या महान वैश्विक नेत्याची जयंती आहे. १८६३ साली या तारखेला कोलकाता येथे जन्मलेल्या, ‘ईश्वराबद्दल पूर्ण अविश्वासी’ अशा अत्यंत जिज्ञासू नरेंद्रनाथ दत्त (स्वामीजींचे पूर्वीचे नाव) हे अनेक ज्ञानी लोकांना आणि संतांना प्रश्न विचारायचे, “तुम्ही ईश्वर पाहिलाय कां ?” दक्षिणेश्वर मंदिरातील ‘काली माँ’ चे प्रखर, अनन्य भक्त, महान संत, स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्याकडून मात्र एकमेव ‘हो’ असे उत्तर आले आणि मग गुरू आणि शिष्याचा लौकिक अणि पारलौकिक असा ऐतिहासिक समांतर प्रवास सुरू झाला. यांत नरेंद्रला देवी माँ आणि त्याच्या परम गुरूंचे शुभाशीर्वाद आणि मोक्षप्राप्ती मिळती झाली.

स्वामीजी महान भारतीय संन्यासी आणि तत्वज्ञानी होते. १९ सप्टेंबर १८९३ रोजी अमेरिकेत, शिकागो येथे जागतिक धर्माच्या संसदेत, विवेकानंदांचे सुप्रसिद्ध भाषण म्हणजे ‘हिंदू धर्म आणि आंतरधर्मीय संवादाच्या इतिहासातील एक ऐतिहासिक आणि प्रभावशाली क्षण’ होता हे स्पष्टपणे दिसून आले. जेव्हां इतर सर्व धार्मिक नेते अत्यंत औपचारिकपणे ‘सभ्य स्त्री पुरुषहो !’ म्हणून उपस्थितांना संबोधित करत होते, तेव्हां ब्रिटिश भारताच्या या युवा आणि तेजस्वी प्रतिनिधीने उपस्थित ७००० हून अधिक प्रतिष्ठित सभाजनांना ‘माझ्या बंधू आणि भगिनींनो’ असे प्रेमभराने संबोधित केले. धर्म, वंश, जात अन पंथ ही सर्व बंधने झुगारून या अलौकिक बुद्धिमत्तेच्या स्वयंप्रकाशित तरुणाने मानवतेच्या समान धाग्याने सभागृहातील प्रत्येक व्यक्तीशी अनवट नातं जोडलं. त्यानंतर तीन मिनिटांहून अधिक काळ हे सर्वस्वी परके लोक त्याला टाळ्यांचा कडकडाट करत प्रतिसाद देते झाले यात नवल ते काय ? म्हणून त्याला भाषणासाठी दिलेला अल्पावधी मोठ्या आनंदाने वाढवला गेला. या प्रथम दिव्य भाषणाचे अनोखे प्रतीक म्हणून ‘दि आर्ट इन्स्टिट्यूट ऑफ शिकागो’ मध्ये आजही हे ‘४७३ प्रकाशमय शब्द’ अभिमानाने प्रदर्शित केले जात आहेत. या एका भाषणाने जणू या तेजस्वी भारतपुत्राने अखिल जग पादाक्रांत केले आणि नंतर जगभरातील अनेक ठिकाणी त्याला अति सन्मानाने मार्गदर्शन वक्ता म्हणून आमंत्रित केले गेले.

अतीव आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्या या पहिल्या भाषणात स्वामीजी म्हणाले होते, ‘धर्म हा भारताचा अग्रक्रम नाही, तर गरिबी आहे !’ आपल्या गरीब भारतीय बंधुभगिनिंची हर तऱ्हेने उन्नती व्हावी हे त्यांचे मूलभूत लक्ष्य होते. याच सामाजिक कारणासाठी ‘रामकृष्ण मठ’ आणि ‘रामकृष्ण मिशन’ ची स्थापना करण्यात आली. हे मिशन जगातील २६५ केंद्रांद्वारे (२०२२ च्या आकडेवारीनुसार भारतात अशी १९८ केंद्रे आहेत) गरजू लोकांना सेवा पुरवते. धार्मिक प्रवचनांच्या पलीकडे जाऊन या संस्था बरेच कांही करतात. हे मिशन स्वामीजींचे स्वप्न पुढे नेण्यासाठी, तळागाळातील जनतेची सेवा करण्यासाठी नेहमीच अग्रस्थानी असते. स्वामीजी आणि त्यांच्या शिष्यांच्या विविध भारतीय आणि आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये प्रकाशित झालेल्या साहित्याद्वारे या उद्दिष्टांचा प्रचार आणि प्रसार करण्यात येतो. मिशनद्वारे चालवण्यात येणारी धर्मादाय रुग्णालये, फिरते दवाखाने आणि प्रसूती केंद्रे भारतभर विखुरलेली आहेत. तसेच मिशनची परिचारिकांसाठी प्रशिक्षण केंद्रे, अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम देखील आहेत. हे सामाजिक कार्य ग्रामीण आणि आदिवासी कल्याण कार्यासोबत समन्वय साधीत अव्याहतपणे सुरु आहे. शाळांमध्ये शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश, अल्पाहार आणि पुस्तके दिली जातात.

मानवतेची मूर्तिमंत प्रतिमा, निस्वार्थी सामाजिक नेते आणि हिंदू धर्माचे कट्टर अनुयायी असलेल्या स्वामीजींनी प्रत्येक भारतीयात देव पाहिला. त्यांनी संपूर्ण देशाचा पायी प्रवास केला. जनतेशी जवळीक साधत त्यांनी भारतीयांचे प्रश्न समजावून घेतले, आत्मसात केले अन त्यांच्या या प्रश्नांचा गुंता सोडवण्यात आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले. त्यांचे दिव्य प्रतिभासंपन्न गुरु परमहंस यांच्या सांगण्यावरून त्यांनी हा संपूर्ण भारत-प्रवास केला. परमहंसांनी स्वामीजींना बहुमोल सल्ला दिला होता, “हिमालयाच्या गुहांमध्ये ध्यान करीत केवळ स्वतःची मुक्ती साधण्यापेक्षा भारतातील सकल गरीब लोकांची सेवा कर.” आपल्या गुरूंची आज्ञा शिरोधार्थ मानीत प्रकृती अस्वास्थ्य असतानाही विवेकानंदांचे हे सेवाव्रत सुरूच होते.

स्वामीजी ४ जुलै १९०२ रोजी वयाच्या जेमतेम ३९ व्या वर्षी बेलूर मठ, हावडा येथे महा-समाधीत लीन झाले.

मैत्रांनो, स्वामीजींच्या प्रेरणादायी उद्धरणांची वारंवार आवर्तने होता असतात. त्यांपैकीच माझ्या आवडीची त्यांची काही अनमोल वचने उद्धृत करते:

*परमेश्वराची लेकरे असल्याचा आत्मविश्वास
“तू सर्वशक्तिमान आहेस. तू कांहीही आणि सर्व काही करू शकतोस”

*आत्मचिंतन
“दिवसातून किमान एकदा स्वत:शी बोला, नाहीतर तुम्ही या जगातील एका बुद्धिमान व्यक्तीला भेटण्याची संधी गमवाल”

*अडथळे आणि प्रगती
“ज्या दिवशी तुम्हाला कोणतीही समस्या भेडसावत नाही, तेव्हा तुम्ही खात्री बाळगू शकता की, तुम्ही चुकीच्या मार्गाने प्रवास करत आहात”

प्रिय वाचकांनो, आजच्या या विशेष दिनी भारताचे महान सुपुत्र, प्रभावशाली तत्त्वज्ञ, समाजसुधारक आणि संपूर्ण जगाला वंदनीय असलेले वेदांताचे विश्व प्रचारक अशा स्वामी विवेकानंदांच्या स्मृती-चरणी विनम्र प्रणाम करून त्यांचे प्रेरणादायी तत्वज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करू या !
धन्यवाद !

डॉ मीना श्रीवास्तव

— लेखन : डॉ मीना श्रीवास्तव. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. धन्यवाद गोकुळ सर! खरे पाहिले तर स्वामीजी माझे आदर्श! नागपूरच्या रामकृष्ण मिशनच्या विशाल वाचनालयातील ग्रंथसंपदेने त्यांची ओळख झाली, आणि वृद्धिंगत होत गेली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सोहरा (चेरापुंजी) सारख्या पहाडी प्रदेशातील राम कृष्ण मिशनची शाळा, ग्रंथालय आणि तिथली विविध संग्रहालये बघून मी चकित झाले. एक गोष्ट नक्की, कुठलेही ध्येय साध्य करायला तसेच समर्पित लोक हवेत. या संस्थांत तसेच लोक आहेत. त्यांचे हे समर्पण स्वामीजींच्याविषयी श्रद्धा आणि प्रेम असल्यानेच आहे! परत एकदा तुम्हाला खूप धन्यवाद!

  2. डाॅक्टर मिना श्रीवास्तव ह्यांना ह्या लेखाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद देत आहे कारण कमीत कमी शब्दात त्यांनी अनेक गोष्टी मांडल्या आहेत. अभिनंदन.

  3. स्वामीजींचा जीवनपट आकड्यांमधे बोलायचा झाला तर किती अल्पकाळ होता पण त्यांचे कार्य आजही हजारो लोकांना प्रेरणादायक आहे आणि भविष्यातही ते असेच राहणार आहे ह्यात शंकाच नाही. म्हणूनच डाॅक्टर मिना श्रीवास्तव ह्यांना ह्या लेखाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद देत आहे कारण कमीत कमी शब्दात त्यांनी अनेक गोष्टी मांडल्या आहेत. अभिनंदन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments